अरण्य ः निसर्गसंपत्तीचे आगर

0
370
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

जंगलसंपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ती आपल्या चिरस्थायी स्वरूपाच्या सौख्यासाठी आहे. या जाणिवेच्या अभावामुळे नव्या वस्त्यांच्या उभारणीसाठी वनप्रदेशावर अनेक जण प्रहार करायला निघाले आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक सुबुद्ध नागरिक जागरूक राहील अशी आशा बाळगूया.

जे नैसर्गिक असते त्याचे सौंदर्य अभिजात असते आणि जे मानवनिर्मित असते त्याला कृत्रिमतेचा स्पर्श जडतो. जगातील जंगलसंपत्तीचे अवलोकन करताना आपल्याला याचा प्रत्यय आल्यावाचून राहणार नाही. जलस्रोत, जंगले आणि प्राणिमात्रांचे जीवन यांचा किती निकटचा संबंध असतो हे काही वेगळे सांगायला नको. कितीतरी चतुष्पाद पशूंचे निवासाचे स्थान जंगलच असते. त्यात वाघ, सिंह, अस्वल, रानडुक्कर, गवारेडा यांसारखे हिंस्र पशू असतात. हत्तीसारखा प्राणी किती हिंस्र होऊ शकतो आणि शेती-बागायतीची किती नासाडी करू शकतो याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. हरणाच्या सांबर, चितळ आणि कितीतरी प्रजाती अरण्यात सुखेनैव नांदत असतात. तेही हिंस्र पशूंपासून धोका पत्करून. कारण ‘बलिष्टच टिकून राहतो; बाकीचे सारे कसेबसे जगतात’ हा तर सृष्टीचा नियमच आहे. डार्विनचा उत्क्रान्तिवाद दुसरे काय सांगतो? जंगलात साळिंदर, घोरपड आणि अन्य प्रजाती अस्तित्वात असतात. वानरांच्या उपजाती आढळतात. शिवाय घनदाट झाडीच्या आधाराने पक्षीही वास करतात. पशुपक्ष्यांच्या अस्तिवाने सारे जंगल गजबजून गेलेले असते.

सहस्रावधी वर्षांपूर्वी संस्कृतीचा विकास होत असताना माणसे जंगलात राहणे पसंत करीत होती. पूर्वीच्या ऋषिमुनींचे आश्रम हे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले होते. लोकान्तापेक्षा त्यांना एकान्त प्रिय असे. लोकानुनय करणे त्यांना मान्य नसे, पण लोकांच्या अभ्युदयाची त्यांना चाड होती. त्यांनी अरण्यवासात निर्माण केलेली आचार्यकुले ही तत्कालीन ज्ञानकेंद्रे होती. ‘शापादपि शरादपि’ तेजःसामर्थ्य असलेले वसिष्ठ ऋषी, शकुंतलेचे पालनपोषण करणारे कण्वऋषी, विद्याव्यासंगी पतंजली, याज्ञवल्क्य, धौम्य, अत्री, अंगिरस, गौतम, भृगू, जमदग्नी, वाल्मीकी अशी कितीतरी नावे घेता येतील. ‘ऋषिर्दर्शनात्‌|’ अशी ऋषीची व्याख्या केली जाते. दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान. या ऋषिमुनींना तत्त्वचिंतनाची, अध्ययन-अध्यापनाची आवड होती. त्यांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे वेद रचले. मागाहून उपनिषदे रचली. म्हणून त्यांना ‘वेदान्त’ असे म्हटले जाते. ऋषिमुनींनी देवतावर्णन करणार्‍या ऋचा रचल्या. उषस्, मित्र, अग्नी या सर्व देवता प्रकाश देणार्‍या, तमोनिरास करणार्‍या. पशु-वनस्पतिरूप देवतांचे त्यांनी स्तवन केले. त्यांनी सुक्ते रचली. संहिता लिहिल्या. ‘ब्राह्मण’ नावाचे ग्रंथ लिहिले.

‘आरण्यके’ लिहिली. ‘मुण्डकोपनिषद’सारख्या उपनिषदात जो उपदेश केला आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे ः
आत्मज्ञान हेच श्रेष्ठ प्रतीचे ज्ञान आहे, बाकीचे ज्ञान म्हणजे केवळ अविद्या होय. यज्ञयागादी कर्मांनी आत्मप्राप्ती होत नाही, ब्रह्मज्ञानाने होते. आत्मज्ञानासाठी संन्यस्त वृत्ती हवी. एकान्ताचे सेवन, गुरूचे मार्गदर्शन व आत्म्याचे अनुसंधान या तीन गोष्टींमुळे ब्रह्मप्राप्ती होते. पाणिनीचे ‘अष्टाध्यायी’ हे व्याकरणावरील पुस्तक आणि यास्काचार्यांचे ‘निरुक्त’ हे व्युत्पत्तिशास्त्राविषयीचे पुस्तक एकान्त साधनेतूनच निर्माण झाले. ही परंपरा नंतरच्या कालखंडात चालू राहिली. रामदासांनी ज्ञानसाधना कुठे केली? शिवथर घळीच्या परिसरात ते राहिले. ‘दास डोंगरीं राहतो| चिंता विश्‍वाची वाहतो|’ असे त्यांनी म्हटलेले आहे. तुकाराम देहूजवळच्या भंडारा डोंगरात जाऊन एकान्तवासात अभंगरचना करीत. हे सारे विवेचन झाले जीवनसाधनेबाबत आणि ग्रंथनिर्मितीबाबत. पण आपले भौतिक जीवनदेखील जंगलांमुळे, पर्वतरागांच्या सान्निध्यामुळे कसे समृद्ध होऊ शकते हे पाहणे जरूरीचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल सांभाळला जातो. सदाहरित जंगलामुळे पर्यावरणात शीतलता राहते. ती आपल्या शरीरस्वास्थ्यास पोषक ठरते; तशीच ती चित्तवृत्ती प्रसन्न ठेवते. आपण आपल्याला लाभलेल्या सह्याद्रीचेच उदाहरण घेऊ. एकीकडे आपल्याला दीर्घ असा समुद्रकिनारा लाभला आहे. पूर्वेकडे सह्य पर्वताची रांग आहे. अशाच उत्तुंग पर्वतराजीतून आणि घनदाट वृक्षराजीतून दूधसागरचा शुभ्र प्रवाह अनेक धारांनी जोरदारपणे कोसळतो. त्याच्या या अहर्निश मंत्रघोषामुळे आपल्या जीवनात जे चैतन्य निर्माण केले आहे ते व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात.

सह्याद्रीच्या या रांगा गोव्यापुरत्या मर्यादित नाहीत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळपर्यंत त्या पसरल्या आहेत. सर्वसामान्यतः आपण त्याला ‘पश्‍चिम घाट’ असे संबोधतो. त्यातील बराचसा प्रदेश दाट जंगलांनी व्यापलेला आहे. सत्तरी, सांगे, केपे आणि काणकोण परिसर या दृष्टीने न्याहाळावा. मानवच मानवाचा शत्रू झाला आहे. तो आत्मनाश करायला निघालेला आहे असे चित्र आपल्या देशात सर्वत्र दिसते. तेच वारे गोमंतकातही वाहायला लागले आहेत. जंगलसंपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ती आपल्या चिरस्थायी स्वरूपाच्या सौख्यासाठी आहे. या जाणिवेच्या अभावामुळे नव्या वस्त्यांच्या उभारणीसाठी वनप्रदेशावर अनेक जण प्रहार करायला निघाले आहेत. बर्‍याच वर्षांपूर्वी याच देशात झालेल्या सुंदरलाल बहुगुणा यांच्या ‘चिपको’ आंदोलनापासून आपण कोणताच धडा घेतला नाही असा त्याचा अर्थ आहे.

पश्‍चिम घाट हा जैविक संपत्तीचा मोठा साठा आहे. खरोखर त्याच्या अंतरंगात अगणितता आहे. त्याची निर्मितीच मुळी ज्वालामुखीतून प्राचीन काळी झालेली होती. याचे अनेक पुरावे दृष्टोत्पत्तीस येतात. येथील ऐतिहासिक नैसर्गिकतेचा र्‍हास आपल्या हातून तर होणार नाही ना याची काळजी आधुनिकीकरण करणार्‍यांनी घेतली पाहिजे. आज अग्रक्रम आहे तो निकोप आणि अबाधित निसर्गाचा. विकासाची चक्रे गतिमान करताना याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यकाळात कोणते चित्र दिसेल याची कल्पना करवत नाही.

औषधी गुण असलेल्या अनेकविध वनस्पती पश्‍चिम घाटात आहेत. यादृष्टीने महाबळेश्‍वराचे खोरे, नायरी, साखरपा आणि आंबा घाट या भूभागांचा उल्लेख करता येईल. मार्लेश्‍वराचे शेकरूचे जंगल, राधानगरीचे गवा जंगल, आंबोलीच्या नितांत रमणीय प्रदेशातील राखीव जंगल हे देशी-परदेशी विद्यार्थ्यांचे संशोधनाचे स्थळ आहे. दोडामार्ग-मांगेलीचे जंगल हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. या जंगलात सरडा, कोळी, बेडूक यांच्या विविध प्रकारच्या दुर्मीळ प्रजाती आहेत. पश्‍चिम घाटातील जंगलपट्‌ट्यात अनेक रंगांची, अनेक प्रकारची फुलपाखरे आहेत.

चार वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध संशोधक डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी लिहिलेले १०० वेलीफुले हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानफुलांवरचे पुस्तक मी वाचले. रंगकर्मी आणि निसर्ग अभ्यासक वामन पंडित यांची आणि डॉ. गावडे यांची उत्तम प्रकारची छायाचित्रे त्यात आहेत. हे पुस्तक वाचून मी स्तिमित झालो. हे फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते झाले. अन्य ठिकाणी ही वनस्पतींची संपत्ती किती प्रमाणात असेल बरे! आपले गोव्याचे पर्यावरणतज्ज्ञ आणि इतिहाससंशोधक प्रा. राजेंद्र केरकर तर ध्यासपूर्वक आणि अभ्यासपूर्वक पश्‍चिम घाटाविषयीचे संशोधन करताहेत. पर्यावरणरक्षणाविषयी दक्षता बाळगून आहेत.

आपल्या गोमंतकात आज एकीकडे जंगलसंपत्तीचे संहारपर्व चाललेले आहे. त्याला अनेक कारणे आहेत. तो स्वतंत्र विवेचनाचा विषय होऊ शकेल. पण दुसरीकडे तरुणवर्गामध्ये पर्यावरणाविषयीची नवी जाणीव निर्माण होताना दिसते. ही काळ्या ढगावरची रुपेरी कडा मानायला हवी. गोव्यात आज अनेक ठिकाणी अभयारण्ये आहेत. त्यामुळे नष्टप्राय झालेल्या पशुपक्ष्यांच्या प्रजातींना संरक्षण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चोडण बेटात आज डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य आहे. सांगे तालुक्यात नेत्रावळी परिसरात ‘नेत्रावळी अभयारण्य’ आहे. सत्तरी तालुक्यात ‘महादयी अभयारण्य’ आहे. बोंडला येथील अभयारण्य बर्‍याच वर्षांपूर्वी उभे राहिले होते.

धारबांदोडा येथे ‘महावीर अभयारण्य’ आहे, काणकोण तालुक्यात ‘खोतीगाव अभयारण्य’ आहे व मोले येथेही राष्ट्रीय उद्यान आहे.
जंगले आणि मनुष्यजीवन याविषयीच्या अनुबंंधाची जाणीव बाहेरून न लादता अंतःप्रेरणेतून यायला हवी असे प्रांजळपणे वाटते. याबाबतीत संभ्रम मनात असताना पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे विचार आठवतात ः
‘‘गौतमबुद्ध म्हणाला होता की त्याने समाधानाच्या रथाला उत्साहाचे घोडे जोडले आहेत आणि विवेकाचा चाबूक वापरत तो रथ धिम्या गतीने पण योग्य दिशेने चालला आहे. आज बुद्धाच्या मायदेशात असंतोषाच्या रथाला संघर्षाचे घोडे जुंपले गेले आहेत. आणि आपली केंद्र व राज्य सरकारे दिवाळखोरीचा चाबूक फडकावत तो रथ चुकीच्या दिशेने भरधाव घेऊन चालले आहेत. सुबुद्ध, जागरूक सह्य प्रदेशाची जनता आपल्या राष्ट्ररथाला योग्य मार्गावर आणण्यात पुढाकार घेईल अशी मला आशा आहे. निकोप निसर्ग हा मानवी जीवनानंदाचा, आरोग्याचा, अनेकांच्या उपजीविकेचा आधारस्तंभ आहे.’’
डॉ. गाडगीळांच्या उद्गारांचे मर्म जाणून केवळ पश्‍चिम घाटाच्या नव्हे तर एकूण पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक सुबुद्ध नागरिक जागरूक राहील अशी आशा बाळगूया.