Home बातम्या आम आदमी पक्ष ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर

आम आदमी पक्ष ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर

0

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेली ‘इंडिया’ आघाडी आता खिळखिळी होताना दिसून येत आहे. त्यातच काल आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीसोबतचे आपले संबंध संपुष्टात आल्याचे जाहीर केले. आम आदमी पक्षाने उचललेल्या या पावलामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांचे ऐक्य कमकुवत होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीपासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीसह अनेक निवडणुका आपने स्वबळावर लढल्या होत्या. काल आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीपासून फारकत घेण्याची औपचारिक घोषणा केली. याबाबत आपचे नेते संजय सिंह यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. आमचा पक्ष इंडिया आघाडीने बोलावलेल्या बैठकीमध्ये सहभागी होणार नाही. अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, तरीही आम आदमी पक्ष संसदीय प्रश्नांवर तृणमूल काँग्रेस, डीएमके यांसारख्या विरोधी पक्षांसोबत समन्वय राखून त्यांना पाठिंबा देईल, असे संजय सिंह म्हणाले.गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी ‘अबकी बार 400 पार’ची गर्जना करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि एनडीएने निर्विवाद बहुमत मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती; मात्र इंडिया आघाडीने भाजपला 240 जागांवर तर एनडीएला 300 जागांच्या आत रोखले होते.