अमृतसिंग व इतरांवरील हल्लाप्रकरणी एकास अटक

0
92

संशयित साखळी उपनगराध्यक्षांचा भाऊ
गुरुवारी रात्री अमृत सिंग गोरक्षा अभियानाचे प्रमुख हनुमंत परब व वासुदेव झरेकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी वाळपई पोलिसांनी काल इम्रान हमीद खान (वय ३३, साखळी) या साखळीचे उपनगराध्यक्ष रियाज खान यांच्या भावाला अटक केली. त्याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.सविस्तर माहितीनुसार वरील तिघेजण गुरुवारी सकाळी गोमांस तस्करी प्रकरणी तक्रार नोंदविण्यासाठी बेळगाव येथे हनुमंत परब यांची गाडी घेऊन गेले होते. बेळगावला गोमांस तस्करी करताना बोगस दाखले दिल्याने त्या विरोधात तक्रार करण्यासाठी बेळगावला गेले होते. त्यांना गोव्यात परतायला रात्री ९.३० वाजले. गोवा हद्दीत जांभळीकडे या ठिकाणी पोहचले असता इनोव्हा गाडीने अचानक गाडी आडवी घातली व त्यातून पाचजण बाहेर येऊन अचानक दंडुक्यांनी हल्ला केला. गाडीची तोडफोड करून त्यानंतर अमृतसिंग, हनुमंत परब व वासुदेव झरेकर यांच्यावर हल्ला केला. त्यात अमृतसिंगच्या डोक्याला जबर मार बसला. तसेच हनुमंत परब व वासुदेव झरेकर हेही जखमी झाले. त्यानंतर त्याच दरम्यान गोव्यात येणार्‍या गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्या असता त्या हल्लेखोरांनी त्याठिकाणाहून पळ काढला.
साखळी उपनगराध्यक्षाच्या भावास अटक
मारहाण प्रकरणी साखळी उपनगराध्यक्ष रियाज खान याच्या भावावर संशय असल्याने वाळपई पोलिसांनी त्यानंतर रात्री बेळगांव गाठले व त्याला अटक केली. वाळपई पोलीस निरिक्षक संजय दळवी अधिक तपास करीत आहे.
गोमांस तस्करांवर संशय
बेळगांवहून गोमांस तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून अमृतसिंग व तिघेजण त्यासंबंधी तक्रार देण्यासाठी बेळगांवला गेले होते. त्याचसाठी नियोजित कट करून हल्ला केला असल्याचा संशय गोरक्षा अभियानाचे कार्यकर्ते करीत आहेत. पंतजली योग समितीचे प्रमुख कमलेश बांदेकर यानी गोमांस तस्कर्‍यावर कडक कारवाई कारवी अशी मागणी केली आहे. हनुमंत परब यांनी गोमांस तस्करांनीच आपणावर हल्ला केला असून वाळपई पोलिसानी त्यांचा शोध लवकर लावावा असे म्हटले आहे.
साखळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा
साखळीचे उपनगराध्यक्ष रियाज खान यांच्या भावाला अटक केल्याप्रकरणी जाब विचारण्यासाठी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी व रियाज खान यांच्यासह त्यांचे सुमारे ५० ते ६० समर्थक काल रात्री ८ वा.च्या सुमारास वाळपई पोलीस स्थानकावर गेले. उपनगराध्यक्षांच्या भावाला केलेल्या अटकेमागे राजकारण असल्याचा दावा यावेळी सगलानी यानी केला.