अमली पदार्थविरोधी पोलीस दलाची स्थापना ः ढवळीकर

0
183

राज्यातील अमली पदार्थांचा व्यवहार हा आम्हाला पूर्णपणे बंद पाडायचा आहे. त्यासाठी सरकारने अमली पदार्थ विरोधी पोलीस दलाची स्थापना केली आहे, असे गृहमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गैरहजेरीत गृहखात्यावरील प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल सांगितले.

अमली पदार्थ हा गंभीर विषय आहे. अमली पदार्थांचे सेवन करून युवा पिढी बरबाद होऊ लागली आहे. अमली पदार्थांचे सेवन करणारे युवक-युवती चाळीशीपर्यंत मृत्यूपंथाला लागतात. आमची युवा पिढी अशी बरबाद झालेली आम्हाला नको आहे. त्यामुळे अमली पदार्थ राज्यातून समूळ नाहीसे करण्यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करीत आहे, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार क्लाफासियो डायस, दिगंबर कामत, आंतोनियो फर्नांडिस, विल्फ्रेड डिसा व इजिदोर फर्नांडिस यांनी अमली पदार्थांसंबंधीचा प्रश्‍न विधानसभेत विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना ढवळीकर यांनी वरील स्पष्टीकरण केले. गोव्यात कोणकोणत्या प्रकारच्या अमली पदार्थांची विक्री होते हे सरकारला माहीत आहे काय, असा सवाल यावेळी आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी केला.

त्यावर ढवळीकर यांनी, चरस, हशीश, हेरॉईन, कोकेन, एनडीएमए आदी विविध प्रकारच्या अमली पदार्थाची राज्यात विक्री होत असल्याची माहिती दिली. यावेळी बोलताना इजिदोर यांनी अमली पदार्थांची विक्री राज्यातील विद्यालयांतूनही होऊ लागलेली असून ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सरकारच्या नजरेस आणून दिले. यावर बोलताना ढवळीकर यांनी, आम्ही सर्व विद्यालयांना पत्रे लिहून विद्यालयांत अमली पदार्थांची विक्री होत असेल तर ती बाब सरकारच्या नजरेत आणून द्यावी, अशी सूचना विद्यालयांच्या व्यवस्थापनांना, शिक्षकांना, पालक-शिक्षक संघांना पत्रे लिहून केलेली आहे. मात्र, या पत्रांना कुणीही उत्तरे पाठवली नसल्याचे सांगितले.

यावर बोलताना विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी, बांबोळी येथील कुजिरा शैक्षणिक प्रकल्पातून पोलिसांना अमली पदार्थांच्या प्रश्‍नी तीन पत्रे पाठवण्यात आलेली आहेत. तीन प्राचार्यांनी ही गोपनीय पत्रे पोलिसांना पाठवलेली आहेत. मात्र, त्याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही असे सांगितले.

यावेळी ऍलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील एका विद्यार्थ्यालाही अमली पदार्थांचे व्यसन जडले होते. त्यासंबंधी पालकांनी त्याला विचारले असता, आपण ड्रग्ज घेण्यास नकार दिला तेव्हा मित्रांनी आपली थट्टा करायला सुरुवात केली. त्यामुळे आपण त्यांचे म्हणणे ऐकून ड्रग्ज घेण्यास सुरूवात केल्याचे त्या विद्यार्थ्याने पालकांना सांगितल्याचे रेजिनाल्ड म्हणाले. राजेश पाटणेकर म्हणाले की, नायजेरियातून स्टुडंट व्हिसा घेऊन मुले गोव्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात ते अमली पदार्थांचा व्यवहारच करण्यास येथे येतात. त्यांच्यावर नजर ठेवण्याची गरज आहे. केवळ महाविद्यालये व अन्य विद्यालयांवर नजर ठेवण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पोलिसांचे एक वेगळे दल स्थापन करण्यात यावे अशी सूचना यावेळी कवळेकर यांनी केली.

यावर उत्तर देताना अमली पदार्थांचा व्यवहार बंद पाडण्यासाठी आवश्यक ते सगळे करू, असे आश्‍वासन ढवळीकर यांनी दिले.