अन्यथा मंगळवारपासून तीव्र आंदोलन

0
15

>> अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा सरकारला इशारा

राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या धरणे आंदोलनाची सरकारने सोमवारपर्यंत दखल न घेतल्यास मंगळवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अखिल गोवा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष देवयानी तामसे यांनी काल दिला.

राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांनी मागील चार दिवसांपासून येथील आझाद मैदानावर आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनाची सरकारच्या महिला व बालकल्याण खात्याने अद्याप दखल घेतलेली नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांत संतापाचे वातावरण आहे. सोमवारी सकाळी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. या दिवशी आमच्या आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्यास मंगळवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, असे देवयानी तामसे यांनी सांगितले.

अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांना पगारवाढ, सेवा निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना पेन्शन योजना लागू करणे, निवृत्ती मानधनात वाढ करणे आदी प्रमुख मागण्या आहेत.

राज्य सरकारने १५०० रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे, ही पगारवाढ अंगणवाडी कर्मचार्‍यांना मान्य नाही. अंगणवाडी कर्मचार्‍यांनी धरणे आंदोलन सुरू केल्याने खात्याच्या अधिकार्‍यांकडून कर्मचार्‍यांची सतावणूक केली जात आहे. पणजी येथील महिला व बाल कल्याण कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची भेट होत नाही, असा आरोप तामसे यांनी केला.