विधानसभा निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता : विजय सरदेसाई

0
8

राज्यात सद्यःस्थितीत भाजपला पोषक वातावरण नसल्याने कोविडबाधितांच्या वाढत्या संख्येचा मुद्दा पुढे करून गोवा विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना गोवा वेल्हा येथे काल केला.
सांत आंद्रे मतदारसंघातील गोवा फॉरवर्डचे संभाव्य उमेदवार जगदीश भोबे यांच्या घरोघरी प्रचार मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक पुढे ढकलली जाणार आहे. त्याच धर्तीवर गोव्यातील विधानसभा निवडणूक पुढे ढकलली जाऊ शकते, असेही आमदार सरदेसाई यांनी सांगितले.
गोवा फॉरवर्ड आणि कॉंग्रेस पक्ष यांच्यात निवडणूक आघाडीचा निर्णय घेण्यात आलेला आहे; मात्र मतदारसंघ वाटप करण्यात आलेले नाही. गोवा फॉरवर्डचे सांत आंद्रेतील संभाव्य उमेदवार जगदीश भोबे यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.

मतदारसंघ वाटप झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात केल्यास प्रचारासाठी आवश्यक वेळ मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवारांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले.