अनासक्तीचा आदर्श ः ‘कमळ’

0
292

योगसाधना – ५००
अंतरंग योग – ८५

  • डॉ. सीताकांत घाणेकर

शास्त्रीजी कमळाबद्दल सारांश करताना म्हणतात- कमळ म्हणजे अनासक्तीचा आदर्श, मांगल्याचा महिमा, प्रकाशाचे पूजन, सौंदर्याची निर्मिती आणि जीवनाचे दर्शन – म्हणूनच कदाचित आपल्या देवांनी कमळाचा पूर्णतः स्वीकार केला असावा.

भारतीय संस्कृतीमध्ये फार गहन तत्त्वज्ञान आहे. सामान्य व्यक्तीला सहज समजणे अत्यंत कठीण जाते. म्हणून आपल्या ऋषीमहर्षींनी विविध गोष्टी सांगितल्या. त्यातच रामायण, महाभारत यांसारखी महाकाव्ये, भागवतातील श्रीकृष्णाच्या विविध लीला, पुराणातील कथा… सामावलेल्या आहेत. या अशा कथा ऐकल्या व सांगितल्या की व्यक्तीला आपण कसे वागायला हवे याचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळते. त्यातील किती जण ते सिद्धांत आपल्या आचरणात आणतात हा संशोधनाचा विषय आहे.

आमचे प्राथमिक शाळेचे गुरुजी नेहमी म्हणायचे, ‘‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’’.
योगसाधनेमधील अंतरंग योगामध्ये ‘कमळ’ या प्रतीकाबद्दल विचार करताना एक पौराणिक दंतकथा आठवते ती अशी…

  • एक दिवस दुर्वास ऋषींचे भोजन बनवायला जाणार्‍या गोपींचा मार्ग यमुना नदीने अडवला. या घटनेबद्दल त्यांनी श्रीकृष्णाला निवेदन दिले. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही सर्वजण यमुनेच्या किनार्‍यावर उभे राहून सांगा की….
    ‘जर कृष्ण ब्रह्मचारी असेल तर हे नदी, आम्हाला मार्ग दे.’’
    आणि काय आश्‍चर्य? यमुना नदीने मार्ग दिला. परत येताना पुन्हा तीच समस्या आली. त्यावेळी दुर्वासांनी त्यांना सांगितले- ‘‘नदीला सांगा की दुर्वास पूर्णतः उपाशी असतील तर आम्हाला मार्ग दे‘’ आणि त्यांना मार्ग मिळाला. हेही महदाश्‍चर्य!
    पू. पांडुरंगशास्त्री सांगतात – ‘‘जलकमलाप्रमाणे संसारात राहण्याची कला कमळाकडून शिकण्यासारखी आहे. करूनही न करण्याची किमया ही गीतेची अकर्मण्यावस्थेची पराकाष्ठा आहे. क्रीडा करूनही क्रीडा न करणारा कृष्ण, जेवूनही न जेवलेले दुर्वास आपल्याला संसारामध्ये जलकमलाप्रमाणे राहण्याचे शिक्षण स्वतःच्या जीवनाद्वारे देतात.

खरेच, हीच तर खासीयत आहे आपल्या श्रेष्ठ, अत्युच्च भारतीय तत्त्वज्ञानाची. गोष्ट माहीत होऊनही त्यामागील तत्त्वज्ञान व भाव आमच्यासारख्या सामान्यांना समजणार नाही. त्यासाठी शास्त्रीजींसारख्या प्रखर बुद्धीवंताचे मार्गदर्शन लागते.
आपल्यातील प्रत्येकाच्या जीवनात विविध लहानमोठ्या समस्या, संकटे असतातच. त्याला कुणीही अपवाद नाही- मग तो कुणीही असू दे… सामान्य व्यक्ती, समर्थ व्यक्ती, संतमहात्मा, महापुरुष अथवा स्वतः ईश्‍वर. दैवाचे भोग कुणालाही चुकत नाही. चहुकडे जणुकाय चिखलच पसरला आहे. त्यात जगणेदेखील कठीण होऊन जाते.
इथेच कमळाचे जीवन समजायला हवे. ते तर चिखलातच जन्मते व त्याचे वास्तव्यदेखील चिखलातच आहे. त्याच्या आजुबाजूला सर्वत्र चिखलच दिसतो. पण कमळ ती जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाही. उलट त्याच परिस्थितीत राहून स्वतःचा विकास साधते. ते रडत बसत नाही.

शास्त्रीजी सांगतात की कमळाची दृष्टी नेहमी वर असते. सूर्याकडे पाहून ते स्वतःचे जीवन फुलवते. सूर्यप्रकाशातच कमळाचे जीवन आहे- सूर्योदयाच्या वेळी उमलायचे आणि सूर्यास्ताच्या वेळी मिटून जायचे. केवढी आगळी सूर्यभक्ती!
ते पुढे आपल्याला उत्तम मार्गदर्शन करतात- ‘‘आपल्या जीवनातही अशी अनन्य ईशभक्ती असेल तर वाटेल तसल्या दूषित वातावरणातही आपला यथोचित विकास साधू शकतो.’’
भक्त प्रल्हाद याचे उदाहरण अत्यंत उद्बोधक आहे. राक्षस कुळातील राजा हिरण्यकश्यपूचा तो पुत्र- जन्मापासूनच महान विष्णुभक्त. तो राणी कयादूचा (नागकुळातील कन्या) पुत्र. ती नारदाची शिष्या होती. त्यामुळे प्रल्हादाला तो गर्भात असतानाच श्रीविष्णूच्या भक्तीचे शिक्षण नारदाकडून मिळाले. हिरण्यकश्यपू श्रीविष्णुंचा कट्टर द्वेषी व शत्रू होता. तो स्वतःलाच भगवान मानत होता. त्याने म्हणे स्वतःच्याच मूर्ती राज्यात लोकांना पूजेसाठी वाटल्या होत्या.

विविध तर्‍हेने प्रल्हादाला समजावूनदेखील प्रल्हादविष्णूभक्ती सोडेना. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याचा वध करण्याचे विविध प्रयोग केले- डोंगरावरून कडेलोट, स्वतःची बहीण होलिका हिच्या मांडीवर बसवून अग्नीमध्ये होरपळून टाकण्याचा प्रयत्न. पण दरवेळी भगवान विष्णुनी त्याचे स्वतः रक्षण केले आणि शेवटी नरसिंहावतार घेऊन भगवंतांनी हिरण्यकश्यपुचा वध केला.
सारांश काय? तर प्रल्हादाच्या आजुबाजूला चिखल होता. समस्यांचे पहाड होते. पण निष्पाप प्रल्हाद विष्णूभक्तीत शांत होता. आपल्या अज्ञानी वडलांबद्दल थोडादेखील राग, द्वेश त्याच्या मनात नव्हता. त्याला म्हणूनच प्रभुचरण प्राप्त झाले.

आज विविध परिस्थितीमुळे बहुतेक व्यक्ती हतबल झालेल्या दिसतात. पण परवशता व परिस्थितीचा गुलाम अशी निराशाजनक व नकारात्मक विचारधारा भारतीय संस्कृती मानतच नाही. आसपासचे वातावरण कितीही वाईट असले तरी प्रत्येक मानवाने उन्नत दृष्टी व उच्च ध्येय ठेवले तर त्याची प्रगती मांगल्याकडे होऊ शकते. भारतीय तत्त्वज्ञान विविध प्रकारे हेच तत्त्वज्ञान शिकवते.
पू. शास्त्रीजी कमळाबद्दल बोलताना सांगतात, ‘‘चिखलात राहूनही उर्ध्व दृष्टी राखून सूर्योपासना करणारे कमळ ही गोष्ट अगदी सरळपणाने समजावते. अंधारात वाढलेला मानव प्रकाश प्राप्त करू शकतो त्या गोष्टीची प्रतीती कमळाशिवाय दुसरा कोण देऊ शकणार? ’’
भारतीय संस्कृतीची सुंदरता ही आहे की इथे विविधतेत एकता आहे. जसे कमळसुद्धा शतदल अथवा सहस्त्रदल असते तसे भारतात अनेक संप्रदाय, वर्ण, पंथ, भाषा आहेत.

शास्त्रीजी या संदर्भात एक अत्यंत सुंदर उपमा देतात- भ्रमराची.
‘‘पद्मपरागावर आकृष्ट होऊन विश्‍वातील मानव भ्रमर भारतीय संस्कृतीच्या आसपास फिरत आहेत. या संस्कृतीचे अमृतपान करणारे नरवीर विश्‍वाच्या कानाकोपर्‍यातही तिचे महिमा गान करताना थकले नाहीत आणि म्हणून भारतीय संस्कृतीला आत्मश्लाघ्येचा दोष स्वतःवर घ्यावा लागत नाही.

  • वरैः प्रोक्ता गुणाः यस्य निर्गुणोऽपि गुणी भवेत्‌|
    शास्त्रीजींचे हे विधान अत्यंत रास्त व गोड आहे. भारतातील विविध सण विश्‍वात अनेक राष्ट्रात अत्यंत प्रेमाने साजरे केले जातात. पण सर्वांत अभिमानाची गोष्ट म्हणजे योगशास्त्र आता विश्‍वमान्य झालेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘जागतिक योग दिवस’ म्हणून मानला आहे.

कमळ- सौंदर्याचे प्रतीक आहे. अनेक कवींनी भगवंताच्या अवयवानाही कमळाची उपमा देऊन आपल्या ऋषीमुनींनीदेखील कमळाचे पूजन केलेले आहे-

  • हस्तकमळ * चरणकमळ * हृदयकमळ * नयन कमळ * वदनकमळ
    भारतातील अनेक प्राचीन मंदिरात कमळाचे शिल्प विविध रूपात बघायला मिळते. शास्त्रीजी कमळाला देवी सरस्वतीच्या दागिन्यांची उपमा देतात. अनेक थोर व्यक्ती कमळाचे कौतुक करतात. महाकवी कालिदास. पंडितराज जगन्नाथ.

राजर्षी भर्तृहरी म्हणतात- ‘‘कमळाशिवाय असलेले सरोवर माझ्या हृदयाला शूळासारख्या वेदना देते.
पयसा कमलं कमलेन पयः|
पयसा कमलेन विभाति सरः ॥

  • पाण्यामुळे कमळ शोभते, कमळामुळे पाणी. पाणी व कमळ या दोघांमुळे सरोवर शोभते.
    शास्त्रीजी कमळाबद्दल सारांश करताना म्हणतात- कमळ म्हणजे अनासक्तीचा आदर्श, मांगल्याचा महिमा, प्रकाशाचे पूजन, सौंदर्याची निर्मिती आणि जीवनाचे दर्शन – म्हणूनच कदाचित आपल्या देवांनी कमळाचा पूर्णतः स्वीकार केला असावा.
  • ब्रह्मा कमलासन आहे – विष्णू कमलहस्त आहे.
  • लक्ष्मी कमळजा आहे.
  • सूर्य तर स्वतःच नभाच्या नील सरोवरात असलेले रक्तकमळ आहे.
    शेवटी शास्त्रीजी एका कवीचे मन सांगतात –
    ‘‘हे पुंडरीक! लोकधात्री लक्ष्मी तुझ्यात निवास करते. जगन्मित्र सूर्याची तुझ्यावर अपार प्रीती आहे. भ्रमर एखाद्या बंदीजनाप्रमाणे तुझे यशोगान गात असतो. तुझ्याशी दुसर्‍या कोणत्याही फुलाची तुलना होऊ शकत नाही. तुझ्यासारखे तूच आहेस.’’
    यापुढे कमळ बघितले की हे सर्व विचार मनात येतील.