थर्टीन

0
184

लेख- १३ बायोस्कोप

  • प्रा. रमेश सप्रे

‘थर्टीन’ शब्दाचेही दोन पैलू आहेत. शुभ नि अशुभ! आपण अशुभ पैलू आधी पाहूया म्हणजे शेवट गोड होईल… शुभ पैलूचा विचार करत समारोप करता येईल. ‘थर्टीन’ म्हणजे तेरा. तसं पाहिलं तर संख्येला काय शुभ-अशुभ असणार? खरंय. पण शुभाशुभ संख्येला महत्त्व नसून तिच्याबद्दल माणसाच्या मनात असलेल्या भावनेला, खरं तर कल्पनेला असतं.

‘बायोस्कोप’चा हा तेरावा लेख म्हणून ‘थर्टीन’ हा विषय सुचला का? एका अर्थानं ‘हो!’ पण हे तात्कालिक कारण झालं. ‘थर्टीन’ या शब्दाभोवती एक वलय आहे. शुभ आणि अशुभ… शकुनी अन् अपशकुनी. शिवाय माणसाच्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या विकासाच्या दृष्टीनेही ‘थर्टीन’ला महत्त्व आहे.

हल्ली एक पद्धत निघालीय. ती दूरदर्शन मालिका, चित्रपट यांच्यामध्ये लोकप्रिय आहे. तो किंवा ती कुणीही त्याला किंवा तिला म्हणतं, ‘दोन बातम्या (म्हणजे मराठीत ‘न्यूज’) एक चांगली नि एक वाईट. आधी कुठली सांगू चांगली की वाईट? मग निवड केली जाते नि त्यानुसार बातम्या सांगितल्या जातात.

‘थर्टीन’ शब्दाचेही दोन पैलू आहेत. शुभ नि अशुभ! आपण अशुभ पैलू आधी पाहूया म्हणजे शेवट गोड होईल… शुभ पैलूचा विचार करत समारोप करता येईल.
‘थर्टीन’ म्हणजे तेरा. ही एक संख्या. तसं पाहिलं तर संख्येला काय शुभ-अशुभ असणार? खरंय. पण शुभाशुभ संख्येला महत्त्व नसून तिच्याबद्दल माणसाच्या मनात असलेल्या भावनेला, खरं तर कल्पनेला असतं.

मटक्याचे, लॉटरीचेही नंबरच असतात ना? अन् परीक्षेतले सर्व मार्क्स, आपल्याला मिळणारं वेतन (म्हणजे पगार), ऑलिंपिक्समधले विक्रम, मतदान, मानवाची आयुमर्यादा किंवा आयुर्मान इ. इ. सारे आकडेच तर असतात. स्टॅटिस्टिक्स! या आकडेवारीबद्दल (खरं तर आकडेबाजीबद्दल) आर्थर कोस्लर या विचावंताचं एक अप्रतिम सुवचन आहे- ‘स्टॅटिस्टिक्स नायद्र ब्लीड्‌स नॉर स्मेल्स!’ म्हणजे आकड्यांना रक्त नसतं नि गंधही नसतो. म्हणजेच आकडे जिवंत नसतात; असतात कोल्ड अँड डेड्.

‘थर्टीन’ हा असाच अंक आहे का? ‘हो’ही आणि ‘नाही’ही. तो जिवंत वाटतो कारण त्याचा विशेषतः त्याच्या अपशकुनी असण्याचा संबंध एका ऐतिहासिक घटनेशी आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनातलं शेवटचं जेवण झालं त्यावेळी १३ लोक उपस्थित होते. दुसर्‍याच दिवशी त्याला क्रूसावर मारण्यात आले. तो दिवस होता शुक्रवार. तेव्हापासून अनेक लोक १३ या संख्येला घाबरू लागले आणि शुक्रवारी १३ तारीख आली तर ही भीती अनेक पटीने वाढू लागली. इतकी की विमानात १३ क्रमांकाची सीट देणं बंद झालं, हॉस्पिटलमध्ये १३ क्रमांकाचा वॉर्ड, १३ क्रमाकांचा बेड, इमारतीचा १३ वा. मजला अशा अनेक बाबतीत क्रमांक १३ गाळण्याचा प्रघात पडला. काहींनी डोकं लढवून १२, १२ अ, १४ असा क्रमांक द्यायला सुरुवात केली. ही भीती पाश्‍चात्त्य लोकांत एवढी खोल गेली की तिच्यावर मानसशास्त्र नि मानववंशशास्त्र (अँथ्रॉपॉलॉजी) यांत (भयगंडासाठी) एक भीतीदायक शब्दही तयार झाला- ‘ट्रिस्कॅडिकॅङ्गोबिया.’

ज्ञानशाखांतले वैयक्तिक संशोधनही करू लागले. इतकंच नव्हे तर काळाच्या ओघात ही भीती खूपच कमी झाली तरी तिचे अवशेष अनेक पुढारलेल्या, बहुशिक्षित मंडळींच्या मनात अजूनही आहेत. असो.
‘थर्टीन’ म्हणजे तेरा या संख्येला आपल्या व्यक्तिमत्त्व विकास किंवा स्वभावरचनेच्या दृष्टीने महत्त्व आहे. ‘टीन एजेस’ कालखंड हा वयाच्या थर्टीन, ङ्गोर्टीन, ङ्गिफ्टीन असा नाइन्टीनपर्यंत असतो. एका दृष्टीने याला पौगंडावस्थेचा कालखंड किंवा सोपा छान शब्द अरुणावस्था (ऍडोलेसन्स) म्हणतात. सूर्योदयापूर्वी जसा त्याचा सारथी अरुण छान रंग उधळत आपल्या आगमनाची सूचना देतो तसा तरुणावस्थेपूर्वी अरुणावस्थेचा टप्पा असतो. ‘थर्टीन ते नाइन्टीन’ म्हणजे दुसर्‍या शब्दात इयत्ता आठवी ते पदवीचा उंबरठा या काळात आपण खूप संवेदनशील, उंच किंवा उदात्त स्वप्नं पाहणारे, शरीरात-मनात प्रचंड ऊर्जा असलेले असे असतो. योग्य, प्रेरक मार्गदर्शन घरी नि शाळेत मिळालं तर साधुवृत्तीचे नाहीतर सैतानीप्रवृत्तीचे बनतो. दुर्दैवाने सैतानी प्रभाव आज युवापिढीवर अधिक दिसतो.

आपल्याकडे तेरा हा अंक अशुभ किंवा अपशकुनी अजिबात नाही. एक मजेदार पण मार्मिक प्रसंग. गुरुनानक देहभान हरपलेल्या अवस्थेत मुक्त आनंदात ङ्गिरत असत. एकदा असेच जात असताना एका धान्याच्या दुकानदाराने त्यांना बोलवून आलेल्या ग्राहकाला धान्य मोजून द्यायला सांगितले. नानक मापं भरताना मोजू लागले, ‘एक..दोन..तीन… असं करत ‘तेरा’पर्यंत पोचले नि त्यांचं भावांतर झालं. ते ‘तेरा… तेरा… तेरा’ असं म्हणत मापं टाकत राहिले. दुकानदारानं रागावून विचारल्यावर नानक क्षमा मागत म्हणाले, ‘तेरा’ म्हटल्यावर मला परमेश्वर आठवतो. ‘…तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा’ असा भाव मनात भरून राहतो. यावर कोण काय बोलणार?
एका खूप गाजलेल्या हिंदी चित्रपट गीतातही हीच भावना व्यक्त झालीय. ‘एक दो तीन चार पॉंच छे सात…’ असं म्हणत नायिका ‘तेरा’वर पोचते नि ‘तेरा करूँ दिन गिन गिन के इंतजार…’ ‘सारं काही तुझंच (तेरा), माझं काही नाही’ ही संतांचीही प्रार्थना असते.
आध्यात्मिक उपासनेत तेरा अक्षराच्या- त्रयोदशाक्षरी- एका मंत्राला खूप पवित्र मानतात. त्या मंत्राची उपासना, नामसाधना करून आजपर्यंत असंख्य साधकांना, भाविकांना मनःशांती, आंतरिक समाधान यांचा अनुभव मिळालेला. तो सिद्ध, तारक मंत्र आहे. अर्थातच- ‘श्रीराम जयराम जयजयराम!’ हे किती खरंय की प्रत्यक्ष रामापेक्षा अधिक लोकांचा उद्धार केला ‘रामायणानं.’ पण रामायणापेक्षा कितीतरी पटीनं उद्धार केला रामनामानं… राममंत्रानं! हाही तेरा या संख्येचा प्रभाव, चमत्कारच नाही का? तर मंडळी, ‘थर्टीन’ला घाबरायचं की नाही ते तुम्ही ठरवा पण ‘तेरा’ला मात्र पुजायचं, पूज्य मानायचं. ठरलं ना?