- नारायण बर्वे, वाळपई
यावर्षी अधिकमास आहे. आपणही अधिकमासाची पुरुषोत्तम मासाची सेवा करूया. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून हे आपण करुया. आपल्याबरोबरच जनता जनार्दन सुखी होवोत ही प्रार्थना करून म्हणूया… सर्वेसंतु निरामयाः|
ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. बाकी सगळी व्यवस्था केली. कालगणना केली. वर्षाचे बारा महिने, सहा ऋतू, दोन अयने, तीन काळ, बारा राशी, सत्तावीस नक्षत्रे, योग, करण, ग्रह, त्यांची परिभ्रमणे, सूर्याचे परिभ्रमण, चंद्राचे परिभ्रमण, दोन पक्ष, पंधरा तिथी (अमावस्या धरून सोळा). त्याप्रमाणे सर्व सुरू झाले. कालगणना सूर्याची गती व चंद्राची गती याप्रमाणे होऊ लागली. त्यामुळे वर्षाचे ३६० किंवा ३६५ दिवस होऊ लागले. साधारण तीन वर्षे सुरू राहिले व एकदम गडबड झाली. महिना आहे, पण संक्रांत नाही. सूर्यसंक्रमण नाही. असे झाले. एक महिना जास्ती, महिन्यांची नावे ठरलेली होती. आता या महिन्याला नाव काय द्यायचे? ज्योतिषी, पंचांगकर्ते विचारात पडले व या मासाचे नाव मलमास असे ठेवले. याला अधिक मासही म्हणायला लागले व शास्त्रसंमत निर्णय दिला. या महिन्यामध्ये कसलीही शुभकार्ये करू नये, सण करू नये, त्याप्रमाणे समाजाने वागायला सुरुवात केली. त्यामुळे मलमास कंटाळला आणि हा जादा महिना आहे म्हणून त्या महिन्याची अवहेलना सुरू झाली. या त्रासाला कंटाळून मलमासाने आत्महत्या करायचे ठरविले व रानात एका मोठ्या नदीजवळ आला. पण सृष्टीचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या महाविष्णूंनी ब्राह्मणाचे रूप घेतले व त्याला भेटले आणि आत्महत्येचे कारण विचारले. त्यांनी सर्व हकिगत सांगितली.
ब्राह्मणरुपी भगवान त्याला घेऊन गोलोकात पुरुषोत्तम भगवानाकडे आले. (द्विभुज गोपाळकृष्ण) व गोलोक पुरुषोत्तमाने त्याला सांगितले- ‘आत्महत्या करू नये, ते महापातक आहे’. तो म्हणाला, ‘पण मी जगू कशाला, मला नाव नाही, लोक हेटाळणी करतात, काही मंगलकार्ये करत नाहीत, सण नाही, उत्सव नाही.’ हे सर्व ऐकून पुरुषोत्तम म्हणाले,‘मी तुला माझे नाव देतो. यापुढे लोक तुला पुरुषोत्तम मास म्हणतील. इतर महिन्यांमध्ये जो कुयोग म्हणून सांगितले, ते व्यतिपात, वैधृती, अमावस्या हे तुझ्या कालावधीमध्ये पर्वे ठरतील. त्याशिवाय तुझ्या कालावधीमध्ये भरपूर दाने करावीत, उपासना करावी, ज्ञानयज्ञ, जपयज्ञ, दीपदान हे करावे. बाकीच्या महिन्यामध्ये जे केल्याने पुण्य किंवा फळ मिळते ते पुण्य किंवा फळ शतपटीनी प्राप्त होईल.’ असे त्याला समजावून परत पृथ्वीवर पाठवून दिले. नंतर या महिन्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तममास म्हणू लागले.
आपली कालगणना चांद्रमास व सौरमास अशी केली जाते. चांद्रमासाप्रमाणे ३५४ वर्षाचे दिवस व सौरमासाप्रमाणे ३६५ दिवस या दोन्हीमध्ये ११ दिवसांचा फरक पडतो. तो भरून काढणे व कालचक्र सुरळीतपणे चालू राहणे याकरिता साधारणपणे दर तीन वर्षांनी अधिकमास येतो. चैत्रापासून मार्गशीर्ष या महिन्यातील एखादा महिना अधिकमास धरतात. पौष आणि माघ महिना कधीच अधिक नसतो. फाल्गुन क्वचित येतो. एकदा आलेला अधिक प्रायः १९ वर्षांनी परत येतो. थोडक्यात २७ ते ३५ महिन्यांनी अधिक येतो. अधिक महिन्यामध्ये विविध व्रते, दाने, यज्ञ करावेत. साधारणतः चातुर्मासामध्ये जी जी व्रते व अनुष्ठाने करणे सांगितले आहे, ती सर्व अनुष्ठाने अधिक महिन्यामध्येही करावीत असे सांगितले आहे.
‘अधिकस्य अधिकं फलम्’ं, असे शास्त्रवचन आहे. या महिन्याची देवता राधाकृष्ण गोलोकवासी ही आहे. त्यामुळे गोसेवा करावी. रोज गायींचे पूजन व गोग्रास समर्पण, रोज स्नान तेही पहाटे थंड पाण्याने, एक महिना, एक भूक, एका ओंजळीत राहील एवढे भोजन, अधिकमासव्रत म्हणून श्वासव्रत आहे ते आचरणे, आषाढ अधिक आल्यास कोकिळाव्रत, अन्नदान, वस्त्रदान, उपाहनदान, (पादत्राण), छत्रदान, शय्यादान, मौनव्रत पाळणे, एक शय्या वर्ज्य करणे, रामनाम घेणे, गायत्री जप, ब्राह्मण संतर्पण, सहस्त्रभोजन, अश्वत्थ-प्रदक्षिणा, अयाचित भोजन, अपूपदान (अनरसे) रोज किंवा पर्वदिवशी किंवा महिन्यामध्ये एकदा, तांबूलदान, अखंड दिप, दीपदान, पुस्तकदान, भागवत पठन, विद्यादान ही दाने सांगितली आहेत. ही सर्व दाने उपासना जुन्या काळाप्रमाणे योग्य होती. पण त्याची गरज कमी आहे. दान देताना सपत्नी द्यावे, असेही सांगितले आहे. गोव्यापुरता विचार केल्यास गोव्यामध्ये गरिबी कमी आहे. त्यामुळे आज अन्नदान, वस्त्रदान वगैरे घेणारे कमी आहेत. गोदान तर कुणी घेणारच नाहीत. प्रातिनिधिक स्वरूपात द्रव्य दिले तर कुणी घेतील, पण गोदान म्हणून कुणी रू. ५००/- किंवा रु. १०००/- म्हणजे त्या गोदानाची थट्टा ठरेल. गोशाळेला निदान एका गाईचा एका महिन्याचा पोसण्याचा खर्च दिला तरच गोदानाचे अंशतः पुण्य मिळेल. त्यामुळे ही दाने मानसिक समाधान होण्यापुरतीच योग्य ठरतील. त्यामुळे स्वतः आचरण्याची- रोज देवदर्शन, रोज नामजप, रोज सूर्यनमस्कार, रोज कुलदेवतेचा जप, रोज गोपूजन, अपूपदान यासारखी, धर्मग्रंथाचे वाचन, गीता पठन, विष्णूसहस्त्रनामजप यासारखी अनुष्ठाने करावीत. अधिक महिन्यामध्ये पाच पर्वे सांगितली आहेत. १) द्वादशी २) पौर्णिमा ३) अमावस्या ४) वैधृती ५) व्यतिपात.
रोज काही करणे जमले नाही तर या पर्वदिवशी करावे. द्वादशी विष्णू भगवान तृप्त होतात व चांगले फळ देतात. त्यादिवशी दूध, तूप, दही अशा प्रकारची दाने द्यावीत. पौर्णिमा तिथीला काही दानधर्म केला तर ब्रह्मदेव तृप्त होतात. अमावस्येला दानधर्म केला तर पितर तृप्त होतात. वैधृती योगावर काही जपजाप्य, दानधर्म केला तर विष्णू व सर्व देवता तृप्त होतात. व्यतिपात योगावर धर्मराज (यम) तृप्त होतात. बाकीच्या महिन्यांमध्ये वैधृती, व्यतिपात, अमावस्या अशुभ मानलेली आहे. मोठी धार्मिक कृत्ये करत नाहीत. अधिक महिन्यामध्ये विशेष पर्व मानले आहे. असा अधिकमास यावर्षी १८ सप्टेंबर २० ते १६ ऑक्टोबर २० पर्यंतच्या कालावधीमध्ये येत आहे. वरील सर्व दानधर्म, व्रते, अनुष्ठान करीत असतानाच आता चालू युगाला अनुसरून दानधर्म उचित आहे, देहदान संकल्प, नेत्रदान संकल्प, रक्तदान, किडणीदान, अवयवदान, श्रमदान, कचरा निर्मूलन व सद्यःस्थितीत कोरोना महामारीच्या संदर्भात सांगितले गेलेले नियम पाळणे, सुरक्षित अंतर राखणे, मास्क घालणे, गरजेशिवाय न फिरणे, कोरोनाग्रस्तांना आवश्यक सर्व प्रकारची मदत करणे, कोरोना महामारीच्या संकटाबरोबर लढा देणारे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, पोलीस, गृहरक्षक व अग्निशमन दलाचे कर्मचारी, साफसफाई कामगार यांच्याप्रति आदर बाळगून त्यांना होईल ती मदत करणे अशी कामे करणे यामुळे अधिकमासातील दानधर्मापेक्षा जास्त पुण्य मिळेल हे निश्चित. देहदानाची संकल्पना नवीन नाही. दधिचींनी जिवंतपणे देहदान करून आपली हाडे इंद्राला वज्र बनविण्यासाठी दिली व इंद्राने शत्रूंचा संहार केला अशी कथा आहे. त्याप्रमाणे आपणही जमेल त्या पद्धतीने कार्य करूया. आता अधिक महिन्यामध्ये अनुष्ठान, व्रत करून कोणाला फलप्राप्ती झाली वगैरे कथाभाग या अधिक मासाचे माहात्म्य ग्रंथामध्ये वर्णन केले आहे. सूत्रमहाऋषी नैमिषारण्यामध्ये शौनकादिक ऋषींना सांगतात, एकदा नारदस्वामी बद्रीकारण्यामध्ये नारायण मुनीच्या आश्रमामध्ये गेले असता नारायणमुनींनी अधिक मासाविषयी सांगितले. वैकुंठलोक व शिवलोक यांच्या काही योजने लांब गोलोक आहे व गोलोकाचा अधिपती पुरुषोत्तम म्हणजेच कृष्ण भगवान आहे.
अधिक मासाची निर्मिती झाल्यानंतर त्याला दुःख झाले व महाविष्णूंनी त्याला गोलोकी नेले वगैरे पूर्वी लिहिलेच आहे. त्यानंतर त्याला पुरुषोत्तम असे नाव दिले. तुझ्या कालावधीत केलेल्या उपासनेचे फळ शतपटीने मिळेल असा वर दिला. हा कथाभाग सांगितला. पण नारदस्वामींचे समाधान झाले नाही. नारदस्वामी विचारतात,‘या महिन्यामध्ये व्रत केल्याने कोण सुखी झाला?’ नारायणमुनी सांगतात, ‘पांडव वनवासामध्ये असताना गोपाळकृष्ण भेटायला जातात. तेव्हा युधिष्ठिर त्यांना विचारतात, या वनवासातून आम्ही कधी मुक्त होऊ ते सांगा. हे विचारताच भगवान म्हणाले, ‘तुम्ही अधिकमास व्रत करा. आता पुढचा महिना अधिकमास आहे. अधिकमास व्रताचे विधान काय करता येते, कुठली दाने करावीत वगैरे सांगतात. गोलोकवासी गोपाळकृष्ण पूजन एक महिना करावे. नंतर उद्यापन करावे. त्याशिवाय स्नान, दान सर्व माहिती देतात. नारदमुनी नारायणमुनींना विचारतात व मुनी सांगतात. पांडवांनी हे अधिकमासव्रत केले व त्यांना राज्य परत मिळाले. त्याशिवाय दृढधन्वा नावाचा राजा पूर्वजन्मी ब्राह्मण होता. त्याजन्मी अधिकमासात संपूर्ण महिना अहोरात्र स्नान केले (घडले). त्यामुळे राजा झाला व अंती गोलोकाला, श्रीकृष्ण भगवान पांडवांना माहिती सांगून द्वारकेला गेले. सूतांनी शौनकादिक ऋषींना नारायणमुनींकडून नारदस्वामींना, कृष्णभगवानांकडून पांडवांना, अधिकमासाची माहिती सांगितली. अनेकांनी व्रत केले व ते सर्व सुखी झाले, असे सांगितले.
यावर्षी अधिकमास आहे. आपणही अधिकमासाची पुरुषोत्तम मासाची सेवा करूया. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून हे आपण करुया. आपल्याबरोबरच जनता जनार्दन सुखी होवोत ही प्रार्थना करून म्हणूया, सर्वेसंतु निरामयाः॥
संदर्भः शास्त्र असे सांगते, अधिकमास माहात्म्य, ज्योतीर्मयसूख या ग्रंथाच्या आधारे.