खंडित वीजपुरवठ्यावर सप्टेंबरपर्यंत तोडगा ः मुख्यमंत्री

0
106

गोव्यातील खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्‍न येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत मार्गी लागू शकेल, असे वीज खात्याचा ताबा सांभाळणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल गोवा विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मडगाव शहरातील खंडित वीजपुरवठ्यावर उपस्थित केलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.

मडगाव शहरात गेल्या मे महिन्यात ऐन उन्हाळ्यात तब्बल १२२ वेळा वीजपुरवठा खंडित झाला. तर गेल्या जून महिन्यात २६ वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचे कामत यांनी सभागृहाच्या नजरेत आणून दिले. नेसाय येथील फीडरच्या समस्येमुळे वीज खंडित होत आहे. तेथील कंडक्टर्सही बदलण्याची आवश्यता असल्याचे कामत यांनी सभागृहाच्या नजरेत आणून दिले.

यावर बोलताना पर्रीकर म्हणाले की, फिडर व कंडक्टर्सचा प्रश्‍न तर आहेच, पण त्याहीपेक्षा समस्या निर्माण होत आहे ती खोदकामामुळे. खोदकामामुळे भूमीगत वीजवाहिन्यांत बिघाड होत असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. रस्ता कंत्राटदार व अन्य विविध कामांसाठी जे कंत्राटदार खोदकामे करीत असतात त्यांच्या खोदकामांमुळे भूमीगत वीज वाहिन्यांत बिघाड होत असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.

मडगाव व आसपासच्या भागांतील वीज समस्या सोडवण्यासाठी वीज यंत्रणेत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे. सरकारने ५५.५ कोटी रुपये यापूर्वीच मंजूर केले असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी सांगितले. त्यासाठीच्या निविदा ऑगस्ट महिन्यात काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

वीज पुरवठ्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी जे साहित्य हवे आहे ते वीज खात्याच्या मडगाव येथील स्टोअरेज विभागामध्ये उपलब्ध नसल्याचीही तक्रार यावेळी कामत यांनी केली. मडगाव येथे एक ‘फॉल्ट डिटेक्शन’ मशीनही हवे असल्याचे कामत यांनी यावेळी सांगितले.

आमदार नीलेश काब्राल म्हणाले की, शेल्डे येथेही खंडित वीज पुरवठ्याची समस्या आहे. तो भाग माझ्या मतदारसंघात येतो. छोट्या – छोट्या कामासाठीचे सगळे अधिकार खात्याने मुख्य वीज अभियंत्याना दिले आहेत. ५ लाख रुपयापेक्षा कमी रकमेची कामे करायची झाली तरी मुख्य वीज अभियंत्याकडे जावे लागत असल्याचे काब्राल यांनी स्पष्ट केले. वीज जोडण्यासाठीचे सगळे अधिकारही मुख्य वीज अभियंत्याकडेच सोपवण्यात आले असल्याचे काब्राल यांनी यावेळी सभागृहाच्या नजरेस आणून दिले.

वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी खराब झालेल्या वीज फिडरांचे दुरुस्ती काम हाती घेण्याची मागणी केली. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आपल्या मतदारसंघातील सां-जुझे-द-आरिएल भागात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याची तक्रार केली. आपल्या मतदारसंघात भूमीगत वीज वाहिन्या तसेच खांबांवरील वीज वाहिन्या अशा दोन्ही वाहिन्यांत बिघाड होत असून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार मुख्य वीज अभियंत्याला पुन्हा पुन्हा सेवावाढ देत असल्याने खात्यातील कर्मचारी नाराज असून त्यामुळे कामावर परिणाम होत असल्याचे रेजिनाल्ड म्हणाले.