अत्याधुनिक एमके १ अर्जुन रणगाडे लष्कराच्या ताफ्यात

0
178

आजचा दिवस एकही भारतीय विसरणार नाही. याच दिवशी दोन वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना आदरांजली वहातो. आम्हाला आपल्या सुरक्षा दलांवर अभिमान आहे. त्यांचे शौर्य कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हणाले. पंतप्रधान मोदी काल चेन्नई दौर्‍यावर होते. चेन्नईत एका कार्यक्रमात त्यांनी आत्याधुनिक एमके १अर्जुन हा रणगाडा लष्कराला सुपूर्द केला. हा रणगाडा स्वदेशी बनावटीचा आहे. डीआरडीओने तो विकसित केला आहे. यावेळी डीआरडीओचे प्रमुख जी सतीश रेड्डी यांनी या रणगाड्याची प्रतिकृती पंतप्रधान मोदींना दिली. लष्कर प्रमुख जनरल नरवणे यावेळी उपस्थित होते.

हे लोकार्पण झाल्यानंतर पंतप्रधानांनी सभेला संबोधित केले. चेन्नई हे मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि उत्साह, बुद्धिमत्ता आणि कल्पकतेने भरलेले शहर असून हा प्रकल्प कल्पकता आण स्वदेशीचे प्रतीक असल्याचे यावेळी मोदी म्हणाले.

यावेळी तामिळनाडूतील शेतकर्‍यांचे मोदींनी कौतुक केले. पाण्याचा योग्य वापर करून तामिळनाडूतील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात धान्य उत्पादन घेतले आहे. पाणी वाचवण्यासाठी आपण योग्य ते सर्व उपाय केले पाहिजेत असे पंतप्रधान म्हणाले.

दहशतवादी हल्ल्याचा
जम्मूत कट उधळला

दरम्यान, काल जम्मूमधील बसस्थानकाजवळ काल सुरक्षा दलाने मोठ्या हल्ल्याचा कट उधळला. जम्मू बसस्थानकातून ७ किलो स्फोटके जप्त करण्यात आली. पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर दहशतवाद्यांची हल्ला करण्याची योजना होती.
जम्मूमध्ये गर्दी असलेल्या बसस्थानकाजवळ ७ किलोग्रॅम स्फोटके आढळली. जम्मूतील सांबा जिल्ह्यात कुंजवाणी येथे पोलिसांनी दोन प्रमुख दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून ही स्फोटके जप्त करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे सीआरपीएफच्या ७० वाहनांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात ४० जवान हुतात्मा झाले होते.