आगामी विधानसभा निवडणूक भाजपतर्फेच : आमदार डायस

0
194

कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेलेले ख्रिस्ती आमदार येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवरून निवडणूक लढवतील की नाही याविषयी उलटसुलट चर्चा चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांनी आपण पुढील निवडणूक भाजपच्याच उमेदवारीवर लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याने कुंकळ्ळी मतदारसंघात विकासकामे करू शकलो असे सांगून भाजप उमेदवारीवर निवडणूक लढवली तर जिंकून येणे कठीण असल्याचे जे काही जणांचे म्हणणे आहे त्यात तथ्य नसल्याचा दावा डायस यांनी केला. खरे म्हणजे पक्षापेक्षा स्वबळावरही भाजप निवडणूक जिंकू शकतो असे सांगून मागच्यावेळी लोकांनी कॉंग्रेसचा उमेदवार म्हणून नव्हे तर क्लाफासियो डायस म्हणूनच आपणाला मते दिली होती, असे ते म्हणाले.

भाजपवासी झालेल्या ख्रिस्ती आमदारांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार चर्चिल आलेमांव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात येण्याची ऑफर दिली आहे हे खरे असल्याचे सांगून आपणालाही ही ऑफर आहे. पण आपण भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा कॉंग्रेस पक्षात जाणार नसल्याचे डायस यानी स्पष्ट केले.

आपण आणखी एकदाच निवडणूक रिंगणात उतरणार असून २०२२च्या निवडणुकीनंतर परत निवडणूक लढवणार नसल्याचे ते म्हणाले. २०२२च्या निवडणुकीत जिंकलो तरी पुढील निवडणूक लढवणार नसल्याचे डायस यांनी काल एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट केले.