अणु गट सदस्यत्वाबाबत चीनचा अमेरिकेला इशारा

0
109

अमेरिकेने भारताला अणु पुरवठादार गटाचे सदस्यत्व बहाल केल्याप्रकरणी चीनने अमेरिकेस सावधगिरीचा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या या कृतीला चीनने सशर्त पाठिंबा दिला आहे. या मुद्द्यावर दूरदर्शीपणा व सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचेही चीनने म्हटले आहे.
‘अशा प्रकारचा समावेश हा राजवटीची एकात्मता व परिणामकारकता यांच्यासाठी हितकारक असावा आणि तो एकमताने घ्यावा असे आमचे मत आहे. या संबंधीच्या मुद्द्यांसंदर्भात आम्ही भारताच्या वचनबद्धतेवर नजर ठेवून आहोत’ अशी प्रतिक्रिया चीनच्या विदेश व्यवहार खात्याचे प्रवक्ते हुआ चुनयींग यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केली.‘नव्या सदस्याचा समावेश करण्यास गटाला आमचा पाठिंबा आहे. आणि या समावेशासाठी आवश्यक असलेली पुढील पावले उचलण्यासंबंधात आमचा भारताला पाठिंबा आहे.’ चुनयींग म्हणाल्या.
रविवारी भारत व अमेरिका यांनी अणु पुरवठादार गटात भारताच्या टप्प्याटप्प्याने समावेश होण्यासंदर्भातील, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण राजवट याविषयी वचनबद्धता व्यक्त केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यातील प्रदीर्घ चर्चेत रविवारी भारत-अमेरिका अणु करारातील अडथळे दूर करण्यात आले.
अणु पुरवठादार गटात अन्य एखाद्या देशास पाठिंबा देण्यास चीन इच्छुक आहे का असे पत्रकारांनी विचारले असता चुनयींग यांनी सांगितले की या अनुषंगाने सदस्यांनी एकमताने निर्णय घ्यायला हवा. या गटातील भारताचा समावेश ही या गटाची अंतर्गत बाब असल्याचे त्या म्हणाल्या. अशा निर्णयासाठी सदस्यांमध्ये सखोल चर्चा व्हायला हवी असेही मत त्यांनी मांडले.
अशा चर्चांना आमचा पाठिंबा आहे. आणि भारत जर सर्व आवश्यकतांची पूर्तता करत असेल तर भारताच्या समावेशास आमचा पाठिंबा असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. याआधी वरील गटात पाकिस्तानच्या समावेशास चीनने पाठिंबा व्यक्त केला होता. चीनने पाकिस्तानात कराचीत ११०० मेगावॅट क्षमतेचा अणुउर्जा प्रकल्प उभारण्याच्या योजनेची घोषणाही केली होती. त्याला भारताने विरोधही केला होता.