सरकारी इस्पितळांतील औषधांची समस्या लवकरच संपणार : आरोग्यमंत्री

0
110

डॉक्टरांच्या वेतनवाढीचाही प्रस्ताव
गोमेकॉसह सर्व सरकारी इस्पितळांना औषधे पुरविण्यासाठीची निविदा यापूर्वीच मंजूर करण्यात आलेली असून त्यामुळे येत्या १५ दिवसांत सर्व सरकारी इस्पितळातील औषधांची समस्या दूर होणार असल्याचे आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी काल सांगितले. गेले काही दिवस औषधांभावी सरकारी इस्पितळातील रुग्णांची गैरसोय झाली. पण आता ती दूर होणार असल्याचे डिसोझा म्हणाले.गेले काही दिवस जेव्हा औषधांचा तुटवडा होत असे तेव्हा ‘स्पॉट परचेज’ पद्धतीने वितरकांकडून औषधे खरेदी करून रुग्णांना औषधे देण्यात येत असत. अशा प्रकारे खरेदी केली की औषधे जरा महाग दरात घ्यावी लागतात, असे डिसोझा यांनी स्पष्ट केले.
डॉक्टरांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव
दरम्यान, सरकारी डॉक्टरांना पगार कमी असल्याने कोणीही सरकारी डॉक्टर होऊ इच्छित नाहीत. परिणामी सरकारी इस्पितळांसाठी डॉक्टर्स मिळणे कठीण होते. या पार्श्‍वभूमीवर सरकारी डॉक्टरांचा पगार वाढवण्याचा, तसेच भरतीसाठीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा प्रस्ताव आपण ठेवला आहे. सध्या गोव्यातील डॉक्टर्स सरकारी सेवेत येत नसल्याने बाहेरून डॉक्टर्स आणावे लागतात. पगार वाढवल्यास गोव्यातील डॉक्टर्स सरकारी सेवेत रूजू होतील. सध्या सरकारी डॉक्टरांना ५० हजार रुपयेही पगार मिळत नाही. त्यांना किमान ७० हजार रु. पगार मिळावा, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे डिसोझा म्हणाले.
दरम्यान, सरकारी इस्पितळात आयुर्वेदिक व होमियोपॅथी डॉक्टरांची भरती करण्याचा प्रस्ताव असल्याचेही ते म्हणाले. मात्र, त्यासाठी भारतीय वैद्यकीय मंडळाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले.