अटलजींचे अस्थिकलश मांडवी व झुवारीत विसर्जित

0
363

भारताचे दिवंगत माजी प्रधानमंत्री व भाजपचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे काल संध्याकाळी ५.३०च्या दरम्यान मांडवी व झुवारी नदीत विसर्जन करण्यात आले. येथील कॅप्टन ऑफ पोर्ट्‌सच्या जेटीजवळ अस्थिकलश नदीत नेऊन विसर्जन करण्यासाठी एका खास बोटीची व्यवस्था करण्यात आली होती. ह्या बोटीतून मांडवी नदीत अस्थिकलश नेण्यात आला. केंद्रीय आयुषमंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या हस्ते मांडवी नदीत अस्थींचे विसर्जन करण्यात आले. तर कुठ्ठाळी येथे जुवारी नदीत पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो, खासदार नरेंद्र सावईकर व आमदार एलिना साल्ढाणा यांच्या हस्ते अस्थींचे विसर्जन झाले.

पणजी येथील कॅप्टन ऑफ पोर्ट्‌सच्या जेटीवर संध्याकाळी ५.५ वा. वाजपेयी यांच्या अस्थी असलेल्या कलशाचे आगमन झाले. ह्या वेळी श्रीपाद नाईक यांच्याबरोबरच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सभापती प्रमोद सावंत, भाजप प्रदेश अध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आमदार ग्लेन टिकलो, राजेश पाटणेकर, भाजप सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, माजी सभापती विश्वास सतरकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अस्थी विसर्जनाच्या वेळी बोटीत हजर असलेल्या भाजप नेते व कार्यकर्त्यांनी ‘वाजपेयी अमर रहे’च्या घोषणा दिल्या. अंदाजे ५.३०च्या सुमारास कॅप्टन ऑफ पोर्ट्‌स जेटीपासून काही मीटरच्या अंतरावर नदीतील पुलांच्या दिशेने अस्थी विसर्जन झाले.

तत्पूर्वी, जेटीवर पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी कित्येक दशके भाजपची सेवा केली. ते पक्षाचे एक थोर, सर्वमान्य, लोकप्रिय व प्रेरणादायी असे नेते होते. त्यांच्यामुळेच भाजप भारतात लोकप्रिय झाला. वक्तृत्व व कर्तृत्व ह्या दोन्ही बाबतीत वाजपेयी हे श्रेष्ठ होते, असे पार्सेकर म्हणाले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखा नेता होणे नाही. प्रधानमंत्री म्हणूनही त्यांचे कार्य फार मोठे होते, असे ते म्हणाले.

कुठ्ठाळी येथेही विसर्जन
दक्षिण गोव्यात वाजपेयींच्या अस्थिकलशाचे दक्षिण गोव्यातील फातोर्डा, नावेली, मडगाव, कुठ्ठाळी, झुआरीनगर, मुरगाव, वास्को या भागात दर्शन यात्रेनंतर काल संध्याकाळी कुठ्ठाळी येथे झुवारी नदीत विसर्जन करण्यात आले. यावेळी दक्षिण गोवा खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, मुरगावचे आमदार मिलिंद नाईक, दाबोळीचे आमदार तथा पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, माजी आमदार दामू नाईक, नगरसेवक दाजी साळकर, माजी नगराध्यक्ष दीपक नाईक, नगरसेवक यतीन कामुर्लेकर, ज्येष्ठ भाजप नेते शिवराम लोटलीकर, दिगंबर आमोणकर व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल मुरगाव सडा येथे दर्शन यात्रा झाल्यानंतर वास्को येथे मुरगाव नगरपालिका इमारतीसमोर अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.