खाणप्रश्‍नी दिल्लीतील बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता

0
228

गोव्यातील खाणप्रश्‍नी केंद्रीय मंत्र्यांच्या गटाशी चर्चा करण्यासाठी २८ रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेली बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारासाठी मुंबईला गेलेले असल्याने ही बैठक होईल की नाही याबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार व खाण भागांतील काही आमदार असे एक शिष्टमंडळ ७ ऑगस्ट रोजी राज्यातील बंद पडलेल्या खाण प्रश्‍नावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीला गेले होते. ह्यावेळी मोदी यांनी गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी काय करता येईल यावर अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या एका गटाचीही स्थापना केली होती. तसेच गोव्यातील शिष्टमंडळाने दर १५ दिवसांनी एकदा ह्या मंत्र्यांच्या गटाशी चर्चा करावी, अशी सूचना केली होती. मंत्र्यांच्या गट समितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, नरेंद्र सिंग तोमर आदींचा समावेश आहे.