महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले होते. काल दुपारी 12 वाजून 8 मिनिटांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार आणि जय पवार यांनी अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी जमलेल्या लाखो कार्यकर्ते आणि बारामतीकरांच्या डोळ्यातील अश्रृंचा बांध फुटला.
मुंबईहून बारामतीकडेे जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी येत असताना बुधवारी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाले होते. अजित पवारांचा मृतदेह बारामती येथील पुण्यश्लेोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला, तेथे त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
गुरुवारी सकाळी अजित पवार यांचे पार्थिव सकाळी आठच्या सुमारास काटेवाडी येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घराकडून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. बारामती येथील पेन्सिल चौकातून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांना आणण्यात आले. त्यावेळी जमलेल्या लाखोंच्या जनसमुदायाच्या मुखातून, ‘अजित दादा अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी उपस्थित अनेकांना त्यांचे अश्रृ अनावर झाले होते. ‘दादा परत या परत या’ अशा घोषणा देखील उपस्थित जनसमुदायाकडून वारंवार देण्यात येत होत्या.
अजित पवारांचे पार्थिव मैदानात उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर ठेवण्यात आले. त्यानंतर वैदिक पद्धतीने मंत्रोच्चार करण्यात आले. त्यानंतर आलेल्या मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी लाखोंचा जनसमुदाय विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जमला होता. यावेळी कोणतीही गडबड, गोंधळ न करता शिस्त पाळून त्यांच्या लाडक्या दादांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. पहाटेपासून चाहत्यांनी मैदानावर गर्दी केली होती. जसजशी अंत्यसंस्काराची वेळ जवळ येत होती. तसतसा लाखोंच्या संख्येने जनसमुदाय विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात जमा होत होता.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.