अखेर केंद्रात जाण्यास पर्रीकर राजी

0
87
‘‘मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार अर्ध्यावर सोडून जाण्याची इच्छा नव्हती. पण पंतप्रधानांचा प्रस्ताव नाकारणे शक्य नाही. शिवाय राज्यापेक्षा देश मोठा आहे. मात्र गोवा सोडताना मला अस्वस्थ वाटेल - मुख्यमंत्री पर्रीकर.’’

पंतप्रधानांच्या इच्छेला दिला मान
मी केंद्रात जाऊन मंत्री म्हणून पदभार स्वीकारावा असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आल्यास मी तो स्वीकारायला हवा अशी सूचना आपणाला पक्षाकडून आलेली आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी सकाळी दूरध्वनीवरून संपर्क साधून मी केंद्रात मंत्री म्हणून यावे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे व त्या इच्छेला मान देऊन मी केंद्रात जाण्याची तयारी करावी अशी सूचना आपणाला केल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.केंद्रात जाण्यास इच्छुक नव्हतो
खरे म्हणजे आपण केंद्रात जाण्यास इच्छुक नव्हतो. कारण गोव्यातील लोकांनी आपणाला पाच वर्षांच्या काळासाठी निवडून आणले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ अर्ध्यावर सोडून जाण्याची इच्छा नव्हती. पण पंतप्रधानांनी बोलावलेले असल्याने आता तो प्रस्ताव फेटाळणे शक्य नाही. शिवाय राज्यापेक्षा देश हा मोठा व महत्त्वाचा आहे, असे पर्रीकर म्हणाले. मात्र, आपणाला नेमके कोणते खाते देण्यात येणार आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. ते शिष्टाचारात बसत नसल्याचे ते म्हणाले. आपल्यानंतर गोव्याचा भावी मुख्यमंत्री कोण असेल ते सांगण्यासह त्यांनी नकार दिला. मात्र, केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. श्रीपाद नाईक हे केंद्रीय मंत्री असून त्यांची केंद्रात गरज आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री म्हणून येथे आणता येणार नसल्याचे ते म्हणाले. आपल्यानंतर मुख्यमंत्री कुणाला करायचे याचा निर्णय पक्षच घेईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पक्षाची सूचना तुम्ही आता स्वीकारल्यात जमा असून या पार्श्‍वभूमीवर या घडीला तुमच्या नेमक्या भावना काय आहेत असे पत्रकारांनी विचारले असता गोवा सोडून जाताना मला खूप अस्वस्थ वाटेल, असे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या गोव्याच्या भूमीविषयी मला प्रचंड प्रेम असून त्यामुळे सध्या आपली स्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे, असे पर्रीकर म्हणाले.
उद्याच्या महत्त्वाच्या घडामोडी
पर्रीकर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा उद्या दुपारी देणार
नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा उद्या दिल्लीत होणार
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या संध्याकाळी
उत्तराधिकार्‍याचे नाव सांगण्यास पर्रीकरांकडून नकार
श्रीपाद नाईकांबाबत शक्यता फेटाळली
उत्तराधिकार्‍याविषयी निर्णय पक्षाचा
जल्लोष आणि अस्वस्थताही!
नेते, कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र भावना
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भारताचे संरक्षण मंत्री म्हणून वर्णी लागणार असल्याच्या वृत्ताने काल स्थानिक भाजप नेते व पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात जल्लोषाचे वातावरण होते. मात्र, त्याचबरोबर आपले लाडके भाई यापुढे गोव्याची सेवा करण्यासाठी उपलब्ध असणार नाहीत याबद्दल त्यांच्यात थोडीशी अस्वस्थताही होती.
पर्रीकरांची उणीव जाणवेल
पर्रीकर यांना मोठे पद मिळत असून त्यामुळे त्यांचे देशभर नाव होणार आहे. तसेच देशासाठी काही तरी करण्याची संधीही त्यांना प्राप्त होणर असल्याने गोव्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे अशा प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत होत्या. मात्र, सध्याच्या घडीला गोव्याची आर्थिक स्थिती म्हणावी तेवढी चांगली नसल्याने पर्रीकरांची उणीव जाणवेल, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
भावूक मनःस्थितीत पर्रीकर
काल पत्रकार परिषदेच्या वेळी खुद्द मुख्यमंत्री पर्रीकर हेही बरेच भावूक व हळवे बनले होते. काही पत्रकारांनी यावेळी आम्हाला तुमच्या बरोबर छायाचित्र टिपायचे आहे असे त्यांना सांगितले असता उद्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली की छायाचित्र घेऊ असे पर्रीकर यांनी त्यांना सांगितले.
गोव्यात येत राहीन
केंद्रीय मंत्री म्हणून दिल्लीला गेलो तरी अधुनमधून आपण गोव्यात येत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया
मनोहर पर्रीकरांना संरक्षणमंत्रीपद मिळत असल्यास त्यात गोव्याचा सन्मान. मी त्यांना शुभेच्छा देतो.
विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे

भारताच्या सीमा प्रदेशात शेजारी राष्ट्रे तसेच दहशतवाद्यांच्या कारवाया सुरू असताना पर्रीकर यांना संरक्षण मंत्रीपद मिळत आहे. सद्यस्थितीत ही आव्हानात्मक जबाबदारी आहे. या जबाबदारीत त्यांनी मी यश चिंतितो.
गोवा प्रदेश कॉंग्रेसाध्यक्ष लुईझिन फालेरो

पर्रीकरांनी केंद्रीय मंत्रिमंडळात यावे ही देशाची मागणी आहे. गोव्याने त्यासाठी आपले कर्तव्य पार पाडावे.
– साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर
पर्रीकर केंद्रात गेल्याने गोव्याचे नुकसान आहे. त्याचवेळी देशाला लाभ होईल.
– उद्योगपती शिवानंद साळगावकर

गोव्यात संरक्षण दलांनी पणजीसह मोक्याच्या ठिकाणी जागा व्यापल्या आहेत. पर्रीकर संरक्षणमंत्री झाल्यानंतर यासंदर्भात काय निर्णय घेतात ते पहावे लागेल.
– आमदार विजय सरदेसाई

गोव्यात पर्रीकर म्हणजे भाजप व भाजप म्हणजे पर्रीकर असे समीकरण होते. आता पर्रीकर दिल्लीत जाणार असल्याने त्यांनी दिलेली वचने कोण पूर्ण करणार, कोण निर्णय घेणार याबाबत अनिश्‍चितता वाटते.
– डॉ. ऑस्कर रिबेलो