अकरा पालिका प्रभागांची फेररचना

0
214

>> निवडणुकीसाठी आरक्षणही अधिसूचित

गोवा सरकारने एका अधिसूचनेद्वारे निवडणुकांना सामोरे जाणार असलेल्या अकरा नगरपालिकांच्या प्रभागांची फेररचना केली असून आरक्षणही अधिसूचित केले आहे.
११ पालिकांचे एकूण ५२ प्रभाग हे महिलांसाठी तर ४० प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) आरक्षित करण्यात आले आहेत.

नगरविकास खात्याचे संचालक गुरूदास पिळर्णकर यांनी आरक्षणाबाबतचा आदेश जारी केला आहे. दरम्यान, पणजी महापालिकेसाठीचे आरक्षण अजून जाहीर करण्यात आलेले नाही. महापालिकेची मुदत येत्या महिन्यात संपत आहे.

मात्र, अन्य सर्व पालिकांसाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे. या पालिकांची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. आरक्षण व प्रभाग फेररचनेचे काम अडल्याने राज्य निवडणूक आयोगात पालिका निवडणुकीची तारीख जाहीर केली नव्हती. आता आयोग ही तारीख जाहीर करणार आहे.
अनुसूचित जमातींसाठी सात प्रभाग तर अनुसूचित जातींसाठी तीन प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत.

पालिका निवडणूक पक्षीय
पातळीवर नाही ः मुख्यमंत्री

राज्यातील नगरपालिका आणि पणजी महानगरपालिकेची निवडणूक पक्षीय पातळीवर घेतली जाणार नाही, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राज्यातील नगरपालिका निवडणुकीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. नगरपालिका निवडणूक पक्षीय पातळीवर घेतली जाण्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नगरपालिका निवडणूक पक्षीय पातळीवर घेण्याची शक्यता फेटाळून लावली. पालिका निवडणूक कायद्यानुसार घेतली जाणार आहे. नगरपालिकांची निवडणूक सध्या सुरू असलेल्या पद्धतीनुसार घेतली जाणार आहे. नगरपालिकांवर भाजपच्या विचारसरणीचे जास्त उमेदवार निवडून येतील, असा दावा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला. राज्यातील मंत्र्यांच्या खात्यात कोणताही बदल केलेला नाही. केवळ क्रमावारी बदलण्यात आलेली आहे. राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी मंत्री आणि अधिकार्‍यांशी चर्चेला सुरुवात करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गोवा दौर्‍याच्या कार्यक्रम बदल झाला असून गृहमंत्री शहा येत्या ७ रोजी गोव्याला धावती भेट देणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.