अल्पसंख्याक समाजातील मंत्र्यांवर ज्येष्ठता यादीत अन्याय : ढवळीकर

0
249

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्र्यांच्या ज्येष्ठता यादीत बदल घडवून आणताना अन्य पक्षांतून फुटून आलेल्या तसेच अल्पसंख्यांक समाजातील असलेल्या नेत्यांवर घोर अन्याय केलेला आहे. जर या मंत्र्यांना स्वाभिमान असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी मंत्र्यांच्या ज्येष्ठता यादीत फेरबदल करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल प्रतिक्रिया देताना सांगितले.

या ज्येष्ठता यादीत फेरबदल करताना मुख्यमंत्र्यांनी जलसंसाधनमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, मायकल लोबो, नीलेश काब्राल आदींवर मोठा अन्याय केल्याचे ढवळीकर यांनी म्हटले. त्याचबरोबर कॉंग्रेस आमदारांना फोडून भाजपमध्ये आणताना स्वत:ही कॉंग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये आलेल्या बाबुश मोन्सेर्रात यांच्या पत्नीवरही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अन्याय केला असल्याचा आरोप ढवळीकर यांनी केला आहे.
यासंबंधी अधिक बोलताना ढवळीकर म्हणाले की, फिलीप नेरी रॉड्रिग्ज हे एक ज्येष्ठ मंत्री होत. पूर्वी ते भाजप सरकारात मंत्री होते. नंतर ते कॉंग्रेस सरकारात मंत्री बनले. आता ते पुन्हा भाजप सरकारात मंत्री आहेत. नेरी हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. अशा या मंत्र्याचे स्थान हे प्रमोद सावंत मंत्रिमंडळात नववे असावे हे दुर्दैवी असल्याचे ढवळीकर म्हणाले. अल्पसंख्यांक समाजातील अन्य एक मंत्री मायकल लोबो यांना सर्वांत शेवटचे म्हणजे बारावे स्थान देण्यात आलेले असल्याचे ढवळीकर यांनी नजरेस आणून दिले.

माविन गुदिन्हो यांना आठव्या स्थानावरून चौथ्या स्थानी आणण्यात आले आहे. मात्र, एक अत्यंत कार्यक्षम असलेले मंत्री व ज्यांनी कोविड काळात मूळ चांगले काम केले ते आरोग्यमंत्री राणे यांना वरचे स्थान न देता सहाव्या स्थानी ठेवण्यात आल्याचे ढवळीकर म्हणाले.

कॉंग्रेस आमदारांना फोडून भाजपमध्ये आणताना स्वत:ही कॉंग्रेसचा त्याग केलेल्या बाबुश मोन्सेर्रात यांच्या पत्नी असलेल्या मंत्री जेनिफर मोन्सेर्रात यांच्यावरही अन्याय झाला असल्याचे ढवळीकर यांनी म्हटले असून या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले आहे.