Home बातम्या अंत्रुज महालातील नवरात्रोत्सव

अंत्रुज महालातील नवरात्रोत्सव

0

– पौर्णिमा केरकर

पश्‍चिम घाट आणि पश्‍चिम किनारपट्टी यांच्या मध्ये वसलेल्या भूमीत राहणार्‍या गोमंतकीय लोकमानसाने इथल्या निसर्ग आणि पर्यावरणाच्या सान्निध्यात जीवन जगत असताना वैविध्यपूर्ण घटकांना देवत्व प्रदान करून सण-उत्सवांचे आयोजन केलेले आहे.

ऋतुचक्रातील बदलणारे ऋतू, महिने, पौर्णिमा, अमावास्या या कालखंडात लोकमानसाने सण-उत्सवांचे नियोजन केले. मृण्मयी भूमातेचा पुत्र गणपती याला मातीच्या रूपात पुजताना मौसमी फळाफुलांनी त्याचे त्यांनी स्वागत केले. गणेशचतुर्थीने भारावून टाकणारा भाद्रपद सरला की उत्सवप्रिय आणि संस्कृतिप्रधान गोमंतकीयांना नवरात्रोत्सवाचे वेध लागतात. भाद्रपद संपला की आश्‍विनाची सुरुवात होते ती उत्सवाच्या माध्यमातूनच! कुळागरांनी नटलेल्या, खाजनी शेतीने समृद्ध असलेल्या, शेती-मासेमारी यांच्या माध्यमातून गुजराण करणार्‍या इथल्या भूमिपुत्राला उपजतच कला-संस्कृतीचे विलक्षण प्रेम. घोरपडीच्या कातड्याने मढविलेल्या घुमटावरती हात मारणारा आपली थाप तालातच मारतो. शिगम्याच्या मांडावर ढोल, ताशे आदी चर्मवाद्यांतून लोकसंगीत निर्माण करण्याची निसर्गदत्त दीक्षा त्याने जणू घेतलेली असते. आश्‍विनातल्या पहिल्या दिवसाचा प्रारंभ अंत्रुज महालात बहुतांश मंदिरांत घटस्थापनेने होतो. घट हे सृजन आणि सर्जनाचे प्रतीक. वृक्षवेली, फाळाफुलांनी नटलेल्या धरित्रीला गोमंतकीय लोकमानसाने जननीच्या रूपात कित्येक पिढ्यांपासून अनुभवलेले आहे.

नवरात्रीचा उत्सव शरदऋतूच्या कालखंडात संपन्न होत असल्याने हवेतील मंतरलेला गारवा, आल्हाददायक वातावरण तना-मनाला मोहवून टाकते. कला आणि संस्कृतीची भूमी असलेल्या अंत्रुज महालातील कष्टकरी समाज नवरात्रात जणू काही मंतरल्यागत वावरत असतो. महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी या तीन रूपांत वावरणार्‍या शक्तीच्या रूपांना अंत्रुज महालाने पूर्वापार मोठ्या श्रद्धेने, आत्मीयतेने पुजलेले आहे. शक्तीची महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी या तीनही रूपांची अंत्रुज महालातल्या वेगवेगळ्या गावांत पूजा होते. कवळेची शांतादुर्गा, बांदिवड्याची महालक्ष्मी, बोरीची नवदुर्गा, वळवईची गजांतलक्ष्मी, सावईवेरेतील खामिणी, डोंगरावरची खामिणदेवी, म्हार्दोळची म्हाळसा, शिरोड्याची कामाक्षी ही शक्तीची वैविध्यपूर्ण रूपे नाना चालीरीती, सण-उत्सव यांच्याद्वारे पुजली जातात. कुळागरात राबराब राबणारा इथला गावडा असो अथवा नदीनाल्यातले मासे, खेकडे, खुबे, तिसर्‍या यांच्या व्यवसायात असलेला मच्छीमार असो, अंत्रुज महालातल्या कष्टकरी समाजाला नवरात्रीचा उत्सव भारावून टाकतो. दुर्गा ही रिपूमर्दिनी. शुंभ-निशुंभ, महिशासुर अशा दैत्यांना यमसदनी पाठविणारी ही देवी तशी संहारक. रौद्रभीषण रूपातल्या महाकालीचे आगमन जेव्हा कुळागरांनी नटलेल्या हिरव्यागार अंत्रुज महालात झाले तेव्हा ‘दुर्गे दुर्घट भारी’ असणारी ही देवी शांतादुर्गा झाली. कवळे, खांडोळा येथे तिला ‘शांतादुर्गा’ म्हणून पुजले जाते. मडकई, कुंडईत ती नवदुर्गा होते तर अन्यत्र ती सातेरीच्या रूपात पुजली जाते. घटस्थापना हे आदिमायेचे प्रतीकात्मक रूप. घट, कुंभ ही गर्भाशयाची प्रतीके. पाण्याने युक्त असलेले कुंभ हे सृजनत्वाचे प्रतीक. त्यामुळे या जननीची पूजा विधियुक्त गर्भकुडीत घटस्थापना करून केली जाते. आश्‍विनातला पहिला दिवस मंदिरातील घटस्थापनेचा. त्याची मोहिनी सर्वच वातावरणात भरून राहिलेली असते. काही मंदिरांत नऊ दिवसांत नऊ माळा देवीला अर्पण केल्या जातात. नवदुर्गेची बोरी, कुंडई, मडकई येथे मोठी मंदिरे असून तीनही ठिकाणी एकाच देवीला पुजले जात असले तरी तीनही ठिकाणी तिच्यातील विभिन्न तत्त्वालाच पुजले जाते. मडकई येथील नवदुर्गा ही मूळची जुन्या काबिजादीतल्या तिसवाडी महालातील. गावड्यांच्या ‘गावशी’ गावातील ही देवी पोर्तुगिजांच्या धार्मिक समीक्षणाच्या काळात मडकईला आली. पारंपई या वाड्यावरील तळयखोल येथे या देवीची स्थापना करण्याचे ठरेपर्यंत काही दिवस लागले. याला कारण कुंडई आणि मडकई या संयुक्त गावकर्‍यांचे नवदुर्गा हे आराध्यदैवत. नवरात्रीच्या उत्सवात गावशीकारीण नवदुर्गेचे मंदिर वैविध्यपूर्ण विधी-उत्सवांनी गजबजते. कुंडई गावात दासाळेवाड्यावर डोंगराच्या पायथ्याशी नवदुर्गेचे मंदिर स्थापन केलेले असून आकसणकार, मावजेकार, गरदेरकार, आंबोळकार, दाभोळकार, कुंडईकार, नेवरेकार अशा भाविकांशी निगडीत असलेली ही नवदुर्गा नवरात्रात नऊ रात्रीला विभिन्न रूपांत प्रगटते.

अंत्रुज महालात कवळे हा गाव कधीकाळी ‘कैवल्यपूर’ म्हणून ओळखला जात होता. सुपीक जमीन आणि हिरवळ व पाण्याने नटलेला परिसर यामुळे दक्षिण गोव्यातल्या केळोशी गावातल्या कर्दळी वनातल्या या देवीला कवळेचा परिसर भावला हे नवल नव्हे. श्रीकृष्ण चरित्राची निर्मिती कृष्णदासशामाने याच देवीच्या प्रेरणेने केळोशीत पोर्तुगीज पूर्वकाळात केली होती. अंत्रुज महालात या देवीचे आगमन झाल्यावर लोकमानसाला प्रेरणा देणारी ही माता ठरली. कवळेतील मंदिराच्या गर्भागारात मुख्यासनावर चतुर्भुजरूपातील शांतादुर्गेच्या एका हातात शिव व दुसर्‍या हातात श्रीविष्णू असून तिला जगदंबा म्हणून ओळखले जाते. श्रीविष्णू आणि श्रीशंकराच्या युद्धात या जगदंबेने शांती प्रस्थापित केली, त्यामुळे तिला महत्त्वाचे स्थान पूर्वापार लाभलेले आहे. पहिल्या बाजीराव पेशव्यांचे नारोराम मंत्री याने १७३९ मध्ये देवीची पूर्जाअर्चा, नैवेद्य, नंदादीप आणि उत्सव व्यवस्थितपणे चालवावे म्हणून कवळे गाव इनाम दिलेला आहे. आश्‍विनात नवरात्रोत्सव, दसरा, कोजागिरी, लालखी उत्सव शांतादुर्गेच्या मंदिरात संपन्न होतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देशभरात विखुरलेल्या शांतादुर्गेच्या भाविकांचे मंदिरात आगमन होते. या काळात आश्‍विनातल्या नऊ रात्री देवीचे रूप अवर्णनीय असते.

बांदिवडे हा गाव महालक्ष्मीच्या मंदिरासाठी नावारूपाला आलेला असून बांदिवडे येथे असलेले हे मंदिर या गावाचे भूषण ठरलेले आहे. आश्‍विन शुक्ल प्रतिपदा ते आश्‍विन शुक्ल नवमीपर्यंत शारदा नवरात्र असते. घटस्थापना करून सुरुवात झालेल्या या उत्सवात दरदिवशी घटपूजा, आरती, सप्तशतीपाठ, मखर सजावट, भजन, कीर्तने केली जाण्याची परंपरा आहे. मखर सजावटीचे तर खास आकर्षण या नऊ रात्रीत अनुभवता येते. प्रत्येक रात्र ही नवनव्या वाहनाने नावीन्यपूर्ण देवीच्या शृंगाराने सजविली जाते. दीपप्रज्वलनाने तर संपूर्ण मंदिर परिसर, गाभारा, सभागृह असे काही उजळून उठते की पाहणार्‍याच्या अंगावर रोमांच उठल्यावाचून राहणार नाही.

माशेलमधील देवकीकृष्ण मंदिरातील नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी नवरात्राचा राखणरूपी प्रसाद तेथील भाविक व महाजन मंडळी घेतात. महानवमीच्या दिवशी गंधपूजा बांधण्यात येते. घटविसर्जनाच्या वेळी अंकुरीत धान्य प्रसाद म्हणून वाटण्यात येते. विजयादशमी दिवशी तर पालखी, तरंगपूजा, सोने लुटणे, तसेच कोहळा कापून तरंगाची भोगावळ केली जाते. विजयादशमी ते पौर्णिमा या काळातील होणारी देवळातील रंगपूजा परंपरेचे वेगळेपण अधोरेखित करते. म्हार्दोळची म्हालसा नवरात्रोत्सवात दीपमाळा प्रज्वलित करून सजते. हजारोंच्या संख्येने तेवणारे दीप, त्यांची स्निग्धता डोळ्यांत, शरीर-मनात साठवताना गात्रन्‌गात्र पुलकित होते. ऑगस्ट भाद्रपदाचा दुवा साधून स्वतःच्या नाजुक गंधाने आसमंताला भूल पाडणारी जायांची पूजा नुकतीच कोठेतरी संपली असता झेंडूच्या गर्दफुलांना स्वतःच्या पूजेत सामावून घेत म्हाळशेची नवरात्र खुलते. मखरोत्सव, कीर्तन, चंडीहनव… झुल्यावर झोके घेणारी देवी एक अपूर्ण आनंद प्रदान करते. याच मंदिरात नवरात्रोत्सवाच्या दरम्यान एकशे आठ कोवळ्या नारळांचा केला जाणारा कळसाभिषेक हे एक परंपरेचे वेगळेपण दिसते. शिरोड्यातील कामाक्षी असू दे, नाहीतर सावईवेरेची खामिणी, डोंगरावरची खामिणदेवी ही सारी शक्तीचीच रूपे. मंदिरामधून जेव्हा हा उत्सव साजरा होत असतो त्यावेळी याच परिसरातील चित्पावन ब्राह्मण समाजात महालक्ष्मी व्रत ज्याला घागरी फुंकण्याचे व्रत असेही म्हटले जाते ते या समाजातील स्त्रिया करतात. या व्रतासाठी महालक्ष्मीचा पीठाचा मुखवटा केला जातो. हा मुखवटा करताना पाळावयाचे अनेक संकेत, नियम परंपरेने ठरविले गेलेले आहेत. त्यांचे आजही मोठ्या श्रद्धेने पालन करण्यात येताना दिसते.

घागरी फुंकण्याच्या या व्रतात ‘सोळा’ या अंकाला महत्त्वाचे स्थान असते. सोळा पानांची पत्री, सोळा प्रकारची धान्ये, सोळा मुठे, सोळा दिवे, सोळा दुर्वा इ. देवीला वाहिले जाते. घराघरांत हे व्रत करण्याची प्रथा असली तरी खूप मोठ्या प्रमाणात स्त्रिया हे व्रत करतात म्हणून सार्वजनिक जागा निवडण्यात येते. ज्या जागी हे व्रत केले जाते त्या जागेचे पावित्र्य जतन करणे हे वैशिष्ट्य आहे. जेवढ्या स्त्रिया व्रत धरणार्‍या तेवढ्याच कळशा (घागरी) बाजूला मांडल्या जातात. स्वच्छ घुतलेल्या तांदळाचे जात्यावर दळून पीठ करणे, सोवळ्यानीच मुखवट्याची उकड तयार करणे व हा मुखवटा तयार करणारी खास व्यक्ती तिच्याकरवीच तो करून घेणे याचे आजही पालन केले जाते. तातू- सोळा धाग्यांपासून तयार केलेला हा दोरा व्रतस्थ स्त्रीने करायचा असतो. त्याशिवाय आपल्या व्रताला जेवढी वर्षे झालेली आहेत तेवढ्या गाठी प्रत्येकाने मारायच्या असतात. भराडेबुराडे- तुळशीवृंदावनातील लहान लहान दगड, पातापुता- नारळाच्या चुडतांपासून तयार करण्यात येणारा इंग्रजी ‘आठ’चा आकडा, पीठापासून तयार केलेले देवीसाठीचे अलंकार, कावल्योबावल्यो, भंडारा सर्व विधी यथासांग करून पूजा करून घट उचलण्यापूर्वी ‘गंगा यमुना मौजारी, सर्व शृंगार करूया| पाठचा बंधू सोईरा, जाऊ त्यांच्या नगरा. माझ्या लक्ष्मीचा मान’ असे पाच वेळा म्हणून घट उचलणे होते. त्यात पाच फुंकरी घालून आवाज घुमविला जातो. घागरी हातात धरून त्यात फुंकर घालून फेर धरून रात्र जागवली जाते. अतिशय उत्स्फूर्तपणे कळशी फुगडी घालण्यात येते. घागरीत फुंक मारून शक्तिरूपिणीचे जागरणच केले जाते.

आश्‍विनातले वातावरण अवकाशात विहार करण्यासाठी पंख देणारे. विश्‍वाची जननी आदिमाया आपले सृजन आणि सर्जनाचे रूप अंतरी साठवून दुर्जनांच्या नाशासाठी कार्यतत्पर राहते. कुठे महासरस्वती म्हणून, कला, ज्ञान, विद्या यांची अधिष्ठात्री देवता म्हणून तर कोठे सुख-समृद्धी देणारी महालक्ष्मी सबला सशक्त रिपूसंहारक ‘महाकाली’ म्हणून वंदनीय ठरते. निसर्ग आणि पर्यावरण लोकसंस्कृती या तत्त्वावर आधारित हा उत्सव म्हणजे सर्जकतेचाच उत्सव ठरतो. याच दिवसांत गोव्यातील कित्येक मंदिरांत आणि अंत्रुज महालात तर वेगवेगळ्या विधी-परंपरांनी नऊ रात्री सजतात. धार्मिक स्थळावर रूजवण घालण्याची परंपरा येथे आहे. दूध आणि हळदपाण्याची शिंपण केलेली नवधान्ये अंकुरतात तेव्हा त्याची पोपटी पिवळसर लवलव स्त्रियांच्या केसात, परमेश्‍वरचरणी सौंदर्य प्रदान करतात. मखरांची वैविध्यपूर्ण सजावट. देवीला झुल्यावर बसवून तिला झोके देण्याची परंपरा हा अनुभव तृप्ततेचा, सर्जकतेचा, सौंदर्याच्या आविष्काराचाच असतो. अखंड घंटानादात देवीचे झुल्यावरील झुलणे म्हणजे चैतन्याची, दिव्यत्वाची प्रचिती आणून देणारे ठरते. वेगवेगळ्या मंदिरांत, घराघरांत, समाजमनात नवरात्रीच्या संकल्पना, त्यातील परंपरा संकेत यांमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होत असला तरी ती मूळ शक्तिदेवतेचीच पूजा आहे. सामर्थ्य, पराक्रम, प्राण हे शक्ती शब्दाचे प्रमुख अर्थ. याचीच प्रचिती आश्‍विन महिन्यात येते. ज्या ज्या वेळी पृथ्वितलावर दुर्जनांचा अधिवास प्रबळ झाला त्या त्या वेळी शक्तिरुपिणीनी आपल्या सामर्थ्यानिशी अवतार धारण करून त्यावर वार केला. गोवा ही शक्तिदेवतेची भूमी असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. म्हशी-बकर्‍या घेऊन रानोमाळ भटकणारा धनगर समाज या मातेला ‘म्हालची पांठर’ म्हणून पुजतो. समुद्राच्या खार्‍या पाण्याला चिखलाच्या बांधानी, मानसीने नियंत्रित करून खार भूमी क्षेत्रात, खाजन शेतीत कोरगुट, बेळो, खोचरी, दामगो अशा पौष्टिक अन्नाची पैदासी करणार्‍या गावड्यांनी या शक्तिदेवतेला मृण्मयी वारुळाच्या सातेरीत पुजले. सृजन, सर्जन, संहार, निर्माण यांची प्रणेती ही शक्तिदेवता युगायुगांपासून मानवी मनाला नवचेतना, प्रेरणा देते. आश्‍विनातील नवरात्र म्हणजेच या शक्तिरुपिणी महामायेच्या विविधांगी रूपांना वाहिलेली आदरांजलीच आहे.

श्रद्धा, संस्कृती, निसर्ग, आध्यात्मिकता यांची वेगळी उंची जर कोठे अनुभवता येत असेल तर ती अंत्रुज महालातच. कुळागरांचा, नदी-ओहोळांचा, मंदिरांचा हा प्रदेश. मंदिरातून नित्यनेमाने होणार्‍या भजन, आरती, कीर्तनाचा आविष्कार, कुळागरातील गारवा तनमन पुलकित करणारा असतो. आश्‍विन मासाचे लावण्यच मुळी मनाला भुरळ पाडणारे. पेरलेले ओटीपोटी तरारून आलेले. समृद्धीची पैदास घरात निर्माण झालेली. वातावरणातील आल्दाददायकता मनाला समाधान मिळवून देते. हीच तृप्तता मानवी मनाला सर्जकतेच्या दृष्टीने पुढे नेते. कलात्मकतेचा आविष्कार याच दिवसांतून प्रतिबिंबित होतो. मखरोत्सव, पालखी, लालखी, देवीचे झुल्यावरील झुलणे, गंधपूजा, रंगपूजा, कीर्तन, भजन, आरती हे सर्व मंदिरातून समांतरपणे या नऊ रात्रीत दिसून येत असले तरी प्रत्येक ठिकाणच्या कलात्मक आविष्कारात वैविध्य आढळते. त्या त्या परिसराचे, गावचे वेगळेपण, परंपरेचे संचित यांचा ठसा या सार्‍या परंपरा-विधींवर उमटलेला दिसतो. माती आणि संस्कृती यांचे अभेद्य नाते या नऊ रात्रीतून अधिकाधिक दैदीप्यमान होत जाते. भरभरून धनधान्य देऊन समस्तांना परिपुष्ट करणार्‍या धरित्रीमातेची कृतज्ञता व्यक्त करताना स्त्री व धरतीच्या प्रजननाचा गौरव, आदिशक्तीचा गौरव करणारा हा अंत्रुज महालाचा प्रदेश भक्ती आणि शक्तितत्त्वाने पुनीत झालेला आहे.