– विष्णू सूर्या वाघ
( भाग – १)
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गुरू-शिष्य परंपरेच्या पायावर उभे आहे. ही परंपरा जिवंत ठेवण्याचे श्रेय हद्दूखॉं, हस्सूखॉं, निसार हुसेनखॉं, फैजमहंमदखॉं, नथ्थनखॉं, बाबा दीक्षित, देवजीबुवा, जोशीबुवा, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, रामकृष्णबुवा वझे, भास्करबुवा बखले, अब्दुल करीमखॉं, विष्णू दिगंबर पलुस्कर, पटवर्धनबुवा, सवाई गंधर्व, अल्लादियाखॉंसाहेब, बडेगुलाम अलीखॉं, मल्लिकार्जुन मन्सूर, भीमसेन जोशी, जगन्नाथबुवा पुरोहित, मंजीखॉं अशा अनेक बुजुर्गांना द्यायला हवे. त्याचप्रमाणे आपल्या हयातीत त्यांनी जे शिष्य किंवा शिष्या घडवल्या त्या सर्वांनीही शास्त्रीय संगीताचा प्रवाह अधिक जोमाने पुढे नेण्याचे काम केले. या शिष्य-शिष्यिणींनी आपल्या गुरूकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अहर्निश धडपड केली. अपार कष्ट सोसले. अनेक वेळा उपेक्षा व अवहेलना सहन केली. प्रसंगी पैसेही खर्च केले. पण गुरूचरणांची सेवा करून संगीतकलेचे जे उच्च ज्ञान त्यांनी संपादन केले त्यामुळे त्यांच्याबरोबरच त्यांच्या गुरूंचेही नाव आभाळाएवढे झाले.
या गुरू-शिष्य परंपरेत महिलांचा- विशेषतः गोमंतकाच्या कलासंपन्न भूमीचा वारसा मिळालेल्या गोमंतकन्यांचा वाटा फार महत्त्वाचा आहे. भास्करबुवांच्या शिष्या ताराबाई शिरोडकर व हिराबाई पेडणेकर, नजरखॉंच्या शिष्या अंजनीबाई (मालपेकर), नथ्थनखॉंच्या बाबलीबाई, हैदरखॉं यांच्या मोगुबाई, लक्ष्मीबाई बडोदेकर व चंदाबाई नार्वेकर, वझेबुवांच्या तानीबाई, तुंगासानी व दत्ताबाई, विलायतखॉंच्या इंदिराबाई वाडकर, सरस्वतीबाई फातरपेकर व श्रीमती नार्वेकर, महंमदखॉंच्या बाळाबाई बांदोडकर, वहिदखॉंच्या हिराबाई बडोदेकर व मुन्नीबाई अशा गुरू-शिष्यांच्या जोड्या इतिहासात अजरामर झाल्या. याच परंपरेत पुढे दोन लखलखीत नक्षत्रांची भर पडली. त्यातील एका नक्षत्राचे नाव मोगुबाई कुर्डीकर आणि दुसर्या- केसरबाई केरकर!
मोगुबाई व केसरबाई या दोघीही लौकिकार्थाने पै. अल्लादियाखॉंसाहेबांच्या शिष्या. अत्रौली जयपूर घराण्याच्या अल्लादियाखॉंसाहेबांची गायनकला या दोघींनीही आत्मसात केली. त्यापैकी मोगुबाईंनी आपला स्वतंत्र शिष्यसंप्रदाय निर्माण करून ही परंपरा चालू ठेवली. केसरबाईंनी आपल्यामागं कोणीही शिष्य किंवा शिष्या निर्माण केली नाही. पण आपल्या गुरूंनी दिलेल्या सांगीतिक ज्ञानाचा आविष्कार त्यांनी इतक्या उच्च कोटीतला घडवला की त्यांचे गाणे ज्यांनी ज्यांनी ऐकले त्यांना ‘सुंदर! अद्भुत! अप्रतिम! ईश्वरदत्त!’ यापलीकडे दुसरी विशेषणेच सुचली नाहीत!
गोमंतकाच्या भूमीने ज्या कलावंतांना निर्माण केले त्यांच्या यादीत अग्रपूजेचा मान केसरबाई केरकर यांनाच प्राप्त झाला. हा मान गोमंतकापुरता मर्यादित नव्हता तर भारत सरकारनेही १९५२ साली राष्ट्रपतींच्या हस्ते ताम्रपट देऊन त्यांचा गौरव केला. पण त्याही कैक वर्षं आधी, नेमकं सांगायचं तर १९३६ साली कविराज रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांची स्वर्गीय अनुभूती देणारी मैफल ऐकून ‘सूरश्री’ या शब्दात त्यांचा बहुमान केला होता.
सूरश्री केसरबाईंना संगीतात हे जे अढळपद प्राप्त झाले ते त्यांच्या प्रदीर्घ संगीत उपासनेचे फळ होते. इच्छित सिद्धीच्या प्राप्तीसाठी प्राचीनकाळचे ऋषीमुनी म्हणे खडतर तप करायचे. प्रसंगी देहदंडही सोसायचे. परंतु ही झाली पुराणकाळातली गोष्ट. आधुनिक काळात विद्या शिकण्यासाठी केसरबाई केरकर यांनी जे कष्ट उपसले ते समजून घेतले तर प्राचीनकाळच्या ऋषीमुनींचीच आठवण यायला हवी. केसरबाईंचे संपूर्ण चरित्र म्हणजे संगीताचा जोगवा घेतलेल्या एका योगिनीच्या संगीतसाधनेचा इतिहास आहे.
‘ऍन आर्टिस्ट हॅज टू बी बॉर्न’- कलाकार हा जन्माला यावा लागतो असे सांगणारी एक इंग्रजी म्हण आहे. हिचा नेमका अर्थ काय असेल? जन्माला येतानाच एखादा माणूस सिद्धहस्त कलाकार बनून येतो काय? स्वतःच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे काहीही प्रयत्न न करता कलेच्या प्रांतात तो अद्वितीय यश मिळवू शकतो काय? निश्चितच नाही! वरील म्हणीचा खरा अर्थ असा आहे की निसर्गाने ज्या काही गोष्टी दिल्या असतील त्यांचा प्रयत्नपूर्वक आणि चिंतनपूर्वक जास्तीत जास्त उपयोग करून घेणाराच ‘कलाकार’ या पदवीला पोचतो. सामान्य माणसाला निसर्गाने मूलतः आपणाला काय दिले आहे तेच अनेकदा कळत नाही. बहुधा त्यामुळेच साधना करणारी सर्वच माणसे कलाकार या पदवीला पोचू शकत नाहीत. शिवाय त्यांच्यात कोणताही विषय साध्य करण्यासाठी जी तळमळ व व्याकुळता असावी लागते तिचा तर अभावच असतो. यामुळेच तर ‘कलाकार जन्माला यावा लागतो’ ही म्हण रूढ झाली. केसरबाई केरकर यांच्याकडे आपले अंगभूत गुण कोणते आहेत हे जाणण्याचे कौशल्य होते आणि त्यांना पैलू पाडण्यासाठी अहर्निश कष्ट करायची तयारी होती म्हणून संगीतक्षेत्रात त्या अढळपदाला पोचल्या. त्यांची संगीतसाधना किती कष्टप्रद होती हे समजून घेतलं तर अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणार्या आजच्या गायक-गायिकांना आपण आयुष्यात मिळवलं तरी काय असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही.
केसरबाईंचा जन्म गोमंतकातील केरी या अंत्रुज महालातील खेड्यात १३ जुलै १८९३ या दिवशी झाला. घरातील सर्वांनाच संगीताची थोडीफार जाणकारी होती. संगीत हेच उपजीविकेचे मुख्य साधन होते. केसरबाईंनीच एकदा स्वतःबद्दल बोलताना सांगितलं होतं- ‘‘माझ्या संगीताच्या बाबतीत मान, व्यवहार आणि निसर्ग यांचा समसमा संयोग झाला. या संयोगातच आणखी एका गोष्टीची भर पडली. ती म्हणजे, संगीतातील माझी आकलनशक्ती! मला हे स्पष्टपणे लिहिलेच पाहिजे की संगीताच्या बाबतीत केवळ आवड असून भागणार नाही, तिच्या जोडीला तीक्ष्ण बुद्धिमत्ता व ग्रहणशक्तीही हवी असते.’’
केसरबाईंची गाण्यातील गती पाहून घरच्या मंडळीनी बालपणातच त्यांना संगीताचं शिक्षण घेण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. पण केसरबाईला शास्त्रशुद्ध गायनाचं शिक्षण देणारा गुरू भेटणार कुठं? त्या काळात शास्त्रीय संगीत शिकायचं म्हणजे गोव्याबाहेर जाऊन महाराष्ट्रात जिथं जिथं संगीताची शिकवणी करणार्या गवय्यांचं वास्तव्य असे तिथं तिथं जाऊन सेवाभावाने विद्या मिळवावी लागत असे. केसरबाईंच्या आदल्या पिढीपासून ही प्रथा चालू होती. सरस्वतीबाई जांबावलीकर, मोगाबाई काकोडकर, ताराबाई शिरोडकर या सर्वांनी तोच मार्ग आचरलेला होता. त्या काळातले गवयीदेखील असे लहरी की भटक्या जिप्सी लोकांसारखे. ते कोणत्याही एका ठिकाणी मुक्काम करून राहत नसत. आज इथं तर उद्या तिथं. एखादं संस्थान पसंतीला आलं, मन रमलं तर दोनचार वर्षं राहिले तिथेच. कंटाळा आला की गेले दुसरीकडे. एखाद्या क्षुल्लक कारणावरूनदेखील प्रयासानं मांडलेला संसार उधळून ते जे तिथून निघून जायचे ते वर्षानुवर्षे पुन्हा तिकडे पाऊलही टाकत नसत.
केसरला संगीताचं परिपूर्ण शिक्षण देईल असा गुरू कोण आहे याची शोधाशोध करता करता घरच्या मंडळींनी शेवटी एक नाव पक्के केले. उस्ताद अब्दुल करीम खॉंसाहेब! पण खॉंसाहेब त्यावेळी राहत होते कोल्हापुरात. त्यापूर्वी त्यांचा मुक्काम बेळगावात होता. हिराबाई बडोदेकरांच्या मातोश्री ताराबाई यांच्या सोबत ते राहत होते. पुढे शामाबाई कोलवाळकर यांच्या दत्ताबाई या मुलीला गाणं शिकवण्यासाठी ते कोल्हापूरला आले. शाहुपुरी विभागात बाळासाहेब गायकवाड यांच्या वाड्यात ते राहत असत. शामाबाई, दत्ताबाई, ताराबाई ही मंडळीही त्यांच्यासोबत होती. प्रख्यात चित्रकार व पेंटर रघुवीर रामनाथकर हेसुद्धा गायकवाडांच्याच वाड्यात त्यावेळी राहत होते. खॉंसाहेबांकडून गाणं शिकून घेण्यासाठी केसरबाईंची रवानगी कोल्हापूरला करण्यात आली. त्यावेळी त्यांचं वय होते अवघे आठ वर्षं!
धाकट्या केसरचं शिक्षण खॉंसाहेबांकडे चालू झालं. पण दहा महिन्यांपेक्षा जास्त काळ खॉंसाहेबांच्या शिक्षणाचा लाभ केसरबाईंना घेता आला नाही. काही स्वरालंकार व एकदोन चीजा तेवढ्या पदरात पडल्या. कोल्हापूर सोडून खॉंसाहेब दुसरीकडे गेले व निराश झालेले केसरबाईंचे पालक त्यांना घेऊन गोव्यात परतले.
गायनाचार्य वझेबुवांचा मुक्काम त्यावेळी गोव्यात होता. पेडणे व अंत्रुज महालातील काही गायनप्रेमी लोकांना बुवा तालीम देत होते. पण मैफलींच्या निमित्ताने हिंदुस्थानभर भ्रमंती करावी लागत असल्यामुळे वर्षातला फारच थोडा काळ वझेबुवा गोव्यात असत. त्याही स्थितीत संगीत शिकण्याची आवड असलेले कितीतर जण बुवांकडे शिकायला जात होते. मिळेल तेवढे पदरात पाडून घेत होते. वझेबुवांचा मुक्काम डिचोलीतील लामगावला होता. केसरबाईंची रवानगी लामगावला करण्यात आली. त्यांच्यासोबत देवी कपिलेश्वरकर नावाची आणखी एक मुलगी होती. परंतु त्या दोघींनाही वझेबुवांकडे अखंडित अशी तालीम मिळालीच नाही. अशा रीतीनं शिकण्यातच त्यांची तीन वर्षे गेली. पुढे श्रीमंत कुंडईकर यांनी आपल्या दत्तीबाई या मुलीला शिकवण्यासाठी वझेबुवांना बांदोडा या गावी बोलावून घेतले. केरीपासून बांदोडा जवळच असल्यामुळे केसरबाई बुवांकडे शिकायला तिथेच जाऊन राहिल्या. वयाच्या दहाव्या वर्षापासून सोळाव्या वर्षापर्यंत त्यांचं शिक्षण वझेबुवांकडे झालं. अर्थात त्यात सातत्य नव्हतं. दौर्यावरून परतल्यानंतर वेळ मिळेल त्याप्रमाणे बुवा तालीम द्यायचे. जे मिळेल त्यावर समाधान मानायचं एवढंच केसरबाईंच्या हाती होतं. तब्बल सहा वर्षं त्यांना अशी दगदग सहन करावी लागली. पण समोर कुठलाच पर्याय नव्हता. निःशंकपणे जाऊन शिक्षण घ्यावं अशा योग्यतेचा दुसरा कुठलाच गुरू त्याकाळी गोव्यात नव्हता आणि बाहेर जावं म्हटलं तर एका जागी मुक्काम ठोकून बसलेला गुरूही दृष्टिपथात येत नव्हता. त्या दिवसांतील मन:स्थितीचे वर्णन करताना खुद्द केसरबाईंनीच म्हटले आहे – ‘‘मनात शिक्षणाची जबरदस्त इच्छा होती… पण मार्ग मात्र दिसत नव्हता. मी बेचैन झाले होते…’’
केसरबाईंची ही अवस्था घरच्यांना पाहवेना. गोव्यात राहून संगीताचे शिक्षण घेणे अशक्यप्राय आहे हे त्यांनी बघितले व गुरूच्या शोधासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. १९०८ साली केरकर कुटुंब केरी गाव सोडून मुंबईला आले. संगीताची साधना करायची आपली हौस आता तरी पूर्ण होईल असे केसरबाईंना वाटत होते. पण संगीत ही विद्याच अशी लहरी आहे की ती कुणाला व कशी वश होईल हे सांगताच येणार नाही. कधी अठरा विश्वे दारिद्य्र असलेल्या झोपडीत ती वास करील, तर कधी रत्नमाणकांनी जडवलेल्या झुंबरांच्या महालात राहील. भाबड्या श्रद्धेचा ती अंत पाहते. पण मग अशी प्रसन्न होते की तिची भक्ती करणार्या व्यक्तीच्या जन्माचे कल्याण करून देते.
केसरबाईंच्या बाबतीत असेच झाले. मुंबईत आल्यावर त्यांच्या सुदैवाने ख्यातनाम सतारीचे व विद्वान संगीतकार बर्कतुल्ला खॉंसाहेब हे त्यांना गायन गुरू म्हणून लाभले. खॉंसाहेबांची तालीम केसरबाईंनी सुरू केली. परंतु पुरते एक वर्षही लोटले नाही तोच बर्कतुल्लांना पतियाळा संस्थानकडून बोलावणं आलं. पतियाळाचं निमंत्रण स्वीकारून खॉंसाहेब मुंबई सोडून गेले. तशातही ते उत्तरेत कडाक्याची थंडी पडली की दोन-तीन महिने मुंबईत येऊन राहत व जमेल त्याप्रमाणे केसरबाईंना तालीम देत. अशा तुटक तुटक शिकवणीत सुमारे पाच वर्षे गेली. पुढे बर्कतुल्लांना म्हैसूरदरबारी कायमची नोकरी मिळाली व ते म्हैसूरला गेले. केसरबाईंच्या शिक्षणात पुन्हा खंड पडला!
बर्कतुल्ला पतियालात असायचे त्यावेळी निदान दोन महिन्यांसाठी मुंबईत येऊन जायचे. ते पुन्हा पटियाला मुक्कामी गेले की पुढले आठ महिने सांगीतिक दुष्काळाचे. मधल्या काळात करायचे तरी काय? असा विचार केसरबाईंच्या मनात घोळत असतानाच एक दिवस कुणातरी मित्राने सूचना केली- ‘‘या मधल्या काळात तू अल्लादियाखॉंसाहेबांकडे जाऊन का गाणं शिकत नाहीस? तू विनंती केलीस तर ते शिकवतील तुला!’’
अल्लादिया खॉंसाहेब! संगीत क्षेत्रातला हिमालय! गानविश्वातला प्रतापी भास्कर! साक्षात् संगीत-सम्राट म्हणून ज्यांचा लौकिक होता असे अल्लादियाखॉंसाहेब!
कुणाकडून तरी ओळख-पालख काढून केसरबाई अल्लादियाखॉंसाहेबांपर्यंत पोचल्या. आपण बर्कतुल्लांच्या शिष्या आहोत, पण ते पटियाला संस्थानात गेल्यामुळे संगीताच्या शिक्षणात खंड पडलाय. आपण कृपया मला तालीम द्यावी, अशी प्रार्थना त्यांनी खॉंसाहेबांना केली. सुदैवाने खॉंसाहेबांनी होकार दिला. हा सहज आलेला योग फार मोठा होता. तीन महिने खॉंसाहेब केसरबाईंना तालीम देत राहिले. पण त्यांची गायकी केसरबाईंच्या गळ्यावर चढेना. काल शिकवलेलं आज लक्षात राहिना. हळूहळू अल्लादिया खॉंसाहेबांनाही केसरबाईंच्या विसरभोळेपणाचा राग येऊ लागला. या बाईच्या गळ्यात आपली गायकी उतरणे शक्यच नाही अशी धारणा त्यांनी करून घेतली व तीन महिन्यांनंतर तालीम बंद करून ते कोल्हापूरला निघून गेले.
झालं! नशिबात आलेला तिसरा गुरूही अल्पावधीत चालता झाला. पुन्हा नव्यानं शोध घेणं भाग पडलं. तीन गुरू प्राप्त झाले, पण स्थैर्य काही लाभलं नाही. मनाची अस्वस्थता मात्र वाढली. तशी केसरबाईंची परिस्थिती चांगली होती. दुसर्या कोणालाही बोलावून संगीताचा अभ्यास चालू ठेवता आला असता. पण संगीत शिकायचं तर जाणकाराकडूनच. ऐरागैरा कोणी गुरू नकोच आहे मला असा चंग करून केसरबाई बसल्या होत्या. शेवटी एक दिवस असा बुजुर्ग गुरू केसरबाईंना सापडलाच.
पं. भास्करबुवा बखले हे त्या काळचे नामवंत गवैय्ये. त्यांना विनंती करून केसरबाईंनी शिकवायला बोलावलं. भास्करबुवांच्या मार्गदर्शनाखाली केसरबाईंची शिकवणी पुन्हा सुरू झाली. बुवांबद्दल केसरबाईंना प्रचंड आदर होता. एके ठिकाणी त्यांनी भास्करबुवांबद्दल लिहून ठेवलंय- ‘पं. भास्करबुवांसारखा दुसरा गवई पैदा होणार नाही. फैजमहंमदखॉं, नथ्थनखॉं व अल्लादियाखॉं या तिन्ही गवय्यांच्या अजब ढंगाची गायकी ते सहजतेने आणि मोहकतेने गाऊन श्रोत्यांना मुग्ध करीत. त्यांच्या गायकीचे वर्णन करणे माझ्या शक्तीबाहेरचे आहे. खरंच सांगते- असा गवई या भरतखंडांमध्ये पैदा होणार नाही.’
बखलेबुवांकडची केसरबाईंची तालीम चार-साडेचार महिने व्यवस्थित चालली. पण पुन्हा दुर्दैवाचा घाला पडला. बुवांना पुण्याहून ‘भारत गायन समाज’ या संस्थेचे वर्ग चालवण्याची ऑफर आली. ती स्वीकारून भास्करबुवा पुण्याला निघून गेले. आता त्यांचीही तालीम थांबली. योग्य गुरूचा शोध पुन्हा सुरू झाला. परंतु बाईंना जणू काही याची सवयच झाली होती. त्यांचा धीर खचला नाही व संगीतावरील श्रद्धाही कमी झाली नाही. उलट जिद्द मात्र शतपटीने वाढली होती. काय होईल ते होवो, पण मी एक सर्वश्रेष्ठ गायिका बनवून दाखवणारच ही विजिगीषू ऊर्मी मनात उफाळत होती. या स्थितीत काय करावं हे केसरबाईंना कळेना. आपल्या मागच्या पिढीतील गायिकांनी जसा लौकिक मिळवला तसा आपणही मिळवावा अशी मनाची तळमळ होती. पण अशा अर्धवट शिक्षणाने आपली मनिषा पूर्ण कशी होणार हा विचार त्यांना सतावत होता. मागच्या पिढीतील अनेक कलाकारांनी राजदरबारात मान्यता मिळवली होती. लोक अजूनही त्यांचे गुणानुवादन गात होते. भावनगरच्या दरबारात राजगायिका म्हणून विख्यात झालेल्या बाबलीबाई साळगावकर, इंदूर दरबारी गायिका म्हणून गाजलेल्या ताराबाई शिरोडकर यांच्यासारखा नावलौकिक आपणालाही मिळेल का हा प्रश्न सतत त्यांच्या मनात रुंजी घालत होता.
याचवेळी एक विचित्र घटना घडली. ही घटना नुसती विचित्रच नव्हती तर आधीच घायाळ झालेल्या केसरबाईंच्या मनाला मानहानीच्या डागण्या देणारी होती.
लाला दुनिचंद हे कलकत्याचे एक धनाढ्य तितकेच रसिक उद्योगपती. बंगालात त्यांना फार मोठा नावलौकिक होता. सेठ दुनिचंद वर्षातून एकदा मुंबईला येऊन महिना-दोन महिने राहायचे. आपल्या मुक्कामात मुंबईतील मोठमोठ्या गवैय्यांना व बाजिंद्यांना ते बोलावून आणायचे. रात्र-रात्र त्यांच्या मैफिली झडायच्या. सेठजींचा मुंबईतील मित्रवर्गही बराच मोठा होता. त्या वर्षी मुंबईतला त्यांचा मुक्काम संपत आला त्यावेळी त्यांच्या मित्रांनी सेठजींना निरोप देण्यापूर्वी तीन दिवसांचा गायन-वादनाचा महोत्सव आयोजित करायचा असे ठरवले. तिन्ही दिवस विविध कलाकारांना बोलवायचे आणि रोज रात्री कार्यक्रमाची सांगता त्यावेळच्या विख्यात गायिका ताराबाई शिरोडकरांच्या गाण्याने करायची असा कार्यक्रम त्यांनी आखला होता. केसरबाई व त्यांच्या काही मैत्रिणी या मैफली ऐकण्यासाठी उत्सुकतेने या समारंभात सामील झाल्या.
ठरल्याप्रमाणे महोत्सवाचे पहिले दोन दिवस व्यवस्थित पार पडले. तिसर्या रात्री आमंत्रित कलाकारांच्या मैफली झाल्या. यानंतर अर्थातच ताराबाईंची अंतिम मैफल होणार होती. एवढ्यात कुणीतरी उत्साही पाहुण्यांनी केसरबाई व त्यांच्या मैत्रिणींना थोडं थोडं गाण्याचा आग्रह केला. केसरबाई काही गाण्याच्या तयारीत आल्या नव्हत्या. शिवाय त्यांचे नेहमीचे साथीदारही सोबत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी गायला नकारच दिला. पण पाहुण्यांचा आग्रहच एवढा जोरदार होता की त्यांना गायला बसण्यावाचून पर्याय राहिला नाही. त्या गायला बसल्या खर्या, पण रोजचे साथीदार नसल्यामुळे कुचंबणा झाली. शिवाय तयारीचाही अभाव होता. परिणामी त्यांची ती मैफल साफ कोसळली. तिथे उपस्थित असलेल्या बुजुर्ग कलावंतांनी ढुंकूनही त्यांच्याकडे पाहिले नाही. मैत्रिणी कुजकेपणाने हसल्या.
उपस्थित पाहुण्यांनी आपल्या गाण्याचे कौतुक करणे सोडाच, पण साधी दखलही घेतली नाही हा घाव केसरबाईंच्या वर्मी लागला. त्या मनोमन दुखावल्या. अर्थात यात आपली काहीच चूक नाही हे त्यांना माहीत होते. तेरा-चौदा वर्षे संगीतचे अध्ययन करूनदेखील नियतीने त्यांच्या नशिबात सातत्य दिले नव्हते. एकसारखे गुरू बदलत चालले होते आणि प्रत्येकाचे घराणे व शिकवण्याची शैली वेगवेगळी असल्यामुळे केसरबाईंच्या डोक्यात संगीत ग्रहण करताना प्रचंड गोंधळ माजला होता. काही का असेना, भर मैफलीत फजिती झाली. मैत्रिणींच्या टवाळीची मानकरी ठरले. काही करून याचं उट्टं काढायलाच हवं. पण कसं काढणार? एकच मार्ग होता… एवढी महान गायिका बनायचं, संगीतसाधनेतला एवढा परमोच्च बिंदू गाठायचा की मैफलीत पहिला सूर लावताक्षणी उपस्थितांनी समोर लोटांगण घातलं पाहिजे. पण हे साध्य करण्यासाठी आवश्यकता होती एका श्रेष्ठ गुरूची. आतापर्यंत कुणी मिळवलं नाही ते मिळवून दाखवण्यासाठी एका खानदानी बुजुर्ग गुरूचे पाय धरण्याची गरज होती. केसरबाईंच्या डोळ्यांसमोर एकाच गुरूची मूर्ती वारंवार उभी राहत होती. ते गुरू म्हणजे अल्लादियाखॉंसाहेब!
काही वर्षांपूर्वी अल्लादियांकडे केसरबाई शिकायला गेल्या होत्या. पण काही केल्या आपली गायकी या मुलीच्या कंठात उतरत नाही हे पाहून अवघ्या तीन महिन्यांत अल्लादियाखॉंसाहेब त्यांना सोडून गेले होते. ते आपल्याला पुन्हा शिकवायला तयार होतील? समजा झाले आणि काही अटी त्यांनी घातल्या तर त्या मान्य करणे आपणाला जमेल? अल्लादिया शिस्तीचे कठोर होते. त्यांच्या शिस्तीचे पालन आपल्या हातून होऊ शकेल? नाना प्रकारचे प्रश्न केसरबाईंच्या मनात रुंजी घालू लागले. त्यांची झोप उडाली. जेवणाखाणावरची आसक्ती उडाली. मनाने एकच ध्यास घेतला- खॉंसाहेबांपर्यंत कसं पोचायचं? त्यांना कसं गाठायचं? शिष्या म्हणून आपणाला स्वीकारण्यासाठी त्यांना राजी कसं करायचं?
(क्रमश:)