शाहबाज शरीफ यांच्या चीन दौऱ्यानंतर काढलेल्या संयुक्त निवेदनाला भारताचे सडेतोड उत्तर
चीन आणि पाकिस्तानच्या एका संयुक्त निवेदनात जम्मू-काश्मीरचा केलेला उल्लेख भारताने तीव्र शब्दात फेटाळून लावला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य आणि कधीही वेगळे न करता येणारे भाग होते, आहेत आणि नेहमीच राहतील, अशा शब्दांत भारताने भूमिका स्पष्ट केली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी याबाबत एक निवेदन ‘एक्स’वरुन शेअर करत भूमिका मांडली.
चीन-पाकिस्तान संयुक्त निवेदनात जम्मू-काश्मीरचा अनावश्यक उल्लेख भारत पूर्णपणे फेटाळत आहे. याबाबतची भारताची भूमिका संबंधित देशांना चांगलीच ठाऊक आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य आणि कधीही वेगळे न करता येणारे भाग होते, आहेत आणि नेहमीच राहतील. इतर कोणत्याही देशाला या अंतर्गत विषयावर भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे जैस्वाल यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर होते. हा दौरा आटोपल्यानंतर चीन आणि पाकिस्तानने संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात काश्मीर प्रश्न आणि चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअर (सीपेक) प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आला आहे. भारताने नेहमीच चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअरला विरोध दर्शवला आहे. सीपेकसाठी होत असणाऱ्या हालचाली भारताच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला बाधा आणणाऱ्या आहेत, याचा भारताने पुनरुच्चार केला.
चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअरच्या काही भाग भारताच्या प्रदेशात येतो, या प्रदेशावर पाकिस्तानचा बेकायदेशीर ताबा, मजबूत करण्याचा किंवा त्याला कायदेशीर मान्यता देण्याचा इतर देशांचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही आणि आम्ही त्याला ठाम विरोध करतो, असे शब्दात भारताने ठाम भूमिका मांडत चीनला देखील ठणकावले आहे.