Home बातम्या कर्नाटकात नेतृत्व बदलाची दाट शक्यता

कर्नाटकात नेतृत्व बदलाची दाट शक्यता

0

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे डी. के. शिवकुमार यांच्या हाती सोपवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाणार असून, राज्याची जबाबदारी शिवकुमार यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे दिल्लीत पक्षश्रेष्ठींबरोबर पार पडलेल्या बैठकीत ठरल्याचे सांगितले जात आहे. सिद्धरामय्या पुढील दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशीही माहिती समोर आली आहे.


सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांची दोन दिवसांपासून दिल्लीत पक्षश्रेष्ठींबरोबर खलबते सुरू होती. काल सकाळी सहा तास चाललेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर मुख्यमंत्री बदलाच्या सुरू असणाऱ्या चर्चा निराधार असल्याचे के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. या बैठकीत राज्यसभेबाबत चर्चा झाल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेतृत्वाने सिद्धरामया यांना पायउतार होण्यास सांगितले असून, राज्याची जबाबदारी डी. के. शिवकुमार यांच्याकडे सोपवली जाणार आहे. काँग्रेस नेत्यांनी शिवकुमार यांच्या नावाला पसंती दिली असून, याच आठवड्यात सिद्धरामया मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला
राज्यातील नेतृत्वाचा मुद्दा गेल्या वर्षभराहून अधिक काळ धुमसत होता. 2023 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने सरकार स्थापन केल्यावर केंद्रीय नेतृत्वाकडून अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन शिवकुमार यांना मिळाले होते, असे सांगितले जाते. डी. के. शिवकुमार यांचे समर्थक या मागणीवर ठाम आहे. 2023 मध्ये अडीच वर्षाचे आश्वासन मिळाल्यानंतरच त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा स्वीकार केला, अशी माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे सिद्धरामय्या यांच्या जवळचे काही नेते नाराज आहेत.