अंजुणे व आमठाणे धरणात मुबलक पाणीसाठा

0
80

गेल्या वर्षी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे अंजुणे व आमठाणे धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून मे महिन्यात गर्मीचा पारा बराच वाढलेला असून दोन्ही धरणात साधारण ४५ ते ६० दिवस पुरेल एवढे पाणी उपलब्ध असल्याची माहिती धरण अधिकार्‍यांनी दिली. अंजुणे धरणाच्या पाण्याची पातळी काल बुधवारी ७७ मीटर होती. १२२० हेक्टर मीटर पाणी उपलब्ध असून आगामी ६० दिवसांचा पुरवठा होणे शक्य असल्याचे अभियंता पवाडी यांनी सांगितले.
आमठाणे धरणात ४७ मीटरची पातळी कायम असून साळ नदीवरील पाणी उपसा केला जात असल्याने कच्चे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ४५ दिवसांसाठी पुरेल एवढा साठा उपलब्ध असल्याचे धरण अभियंता रायकर यांनी सांगितले. साळ नदीवरील बंधार्‍यामार्ङ्गत पाणी अडवण्यात आले असून उपसा केंद्र उभारून कच्चा पाण्याचा पुरवठा करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आलेली आहे. त्यामुळे कच्चे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. तिळारीचे पाणी अधूनमधून बंद केले होते. त्यामुळे ते बेभरवशाचे झालेले असून पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी होण्यासाठी खास योजना आखण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचे योगदान
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कल्पनेतून ही योजना साकारली असून चार मोठे पंप बसवून पाणी उपसा करून ते आमठाणे धरणात साठवण्यात येते. आवश्यक भासल्यास अस्नोडा प्रकल्पाला पुरवून बार्देश तालुक्याची तहान भागवण्यात हा प्रकल्प महत्त्वाचे योगदान देतो. तिळारीचे पाणी बंद झाले की बार्देशची तहान येथूनच भागवली जाते. पाण्याच्या बाबतीत आपण पूर्वीपासूनच सजक आहे. त्याच उद्देशाने राज्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी आम्ही साळ नदीवर पंपिंग स्टेशनची योजना आखली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कच्चे पाणी उपलब्ध होत आहे. तिळारीवर १०० टक्के विसंबून राहणे शक्य नाही. हा प्रकल्प गोव्यासाठी वारंवार बेभरवशाचा ठरलेला आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याच्या बाबतीत स्वावलंबनासाठी नवीन उपाययोजना आखण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.