म्हापसा नगराध्यक्षपदी रोहन कवळेकर बिनविरोध

0
102

म्हापसा पालिकेच्या रिक्त असलेल्या नगराध्यक्षपदी काल अपेक्षेप्रमाणे प्रभाग १८चे नगरसेवक रोहन कवळेकर यांनी बिनविरोध निवड झाली. काल सकाळी ११ वाजता पालिका मंडळाच्या खास झालेल्या बैठकीत नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्याने निर्वाचन अधिकारी श्रीपाद आर्लेकर यांनी श्री. कवळेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
निवडीनंतर ज्येष्ठ नगरसेवक व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी सर्वांच्या वतीने नूतन नगराध्यक्षांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. कवळेकर म्हणाले की, आम्ही वीसही नगरसेवक एक टीम म्हणून काम करतो.
म्हापशाच्या विकासासाठी व सौंदर्यीकरणासाठी काही योजना आखल्या आहेत. ज्या योजना अपूर्ण आहेत त्या पूर्णत्वास नेण्याचे नगराध्यक्ष म्हणून काम करेन. मलनिस्सारण प्रकल्पामुळे अनेक रस्त्यांचे काम अर्धवट आहे. विकासाच्या कामातील तो मुख्य अडसर होता. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हापशाच्या विकासासाठी नक्कीच सहकार्य करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.