वाळपई पोलीस स्थानकाच्या हद्दीत केरी-सत्तरी येथील अंजुणे धरणाजवळील रस्त्यावर काल मध्यरात्री दीडच्या सुमारास चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एका युवतीचा मृत्यू झाला, तर कारमधील अन्य सहा प्रवासी जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील अक्कलकोट येथून पर्वरी येथे जात असताना क्र. जीए-03-झेड-0792 क्रमांकाची कार केरी-सत्तरी येथील अंजुणे धरणाजवळील रस्त्यावरून खाली घसरली. कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. नंदकुमार ऊर्फ गोपाळ नाईक (60, रा. साल्वादोर दो मुंद, आल्तो पर्वरी) हे कार चालवत होते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असता स्नेहल तानाजी घातेगस्ती (27, रा. मेरशी, सांताक्रूझ) हिला साखळी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात मृत घोषित करण्यात आले.