डॉ. सीताकांत घाणेकर
सत्य – एक श्रेष्ठ तत्त्व – मानवविकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक माणसाप्रमाणे, परिस्थितीवश, किंवा इतर कारणांमुळे सत्याचा वेगवेगळा अर्थ केला जातो. दोन माणसांच्या विचारांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असू शकतो. आज आपल्या राज्यात किंवा देशात जी परिस्थिती आहे तिथे नजर टाकली तर अनेक मते दर विषयांवर दिसतात. मग ती लोकसभा असो अथवा राज्यसभा असो. जास्त करून भयानक मतभेदच दृष्टिक्षेपात येतात. पुष्कळ वेळा स्वतःचा स्वार्थ सत्याच्या आड येतो. तर काही वेळा व्यक्तीचा काही कारणांमुळे झालेला अपमान देखील. आणि ही गोष्ट आजचीच नाही तर इतिहासात अशा अनेक घटना वारंवार दिसतात.
महाभारतात कौरवांच्या सभेत द्यूताच्या घटनेवर नजर टाकता असेच चित्र दिसते. दुःशासनाने जबरदस्तीने आणलेल्या द्रौपदीच्या बाबतीतसुद्धा अनेक मते होती. जास्त सभासद तर गप्पच राहिले होते. त्याची कारणे तर त्यांनाच माहीत. द्रौपदीच्या साध्या, सोप्या प्रश्नांना देखील सत्यधर्माला अपेक्षित उत्तरे मिळत नव्हती. भीष्मपितामहाचे उत्तर तर अत्यंत मिळमिळीत वाटते.
दोनच व्यक्ती सत्याची कास धरून स्पष्ट बोलताना दिसतात. महामंत्री विदुर व कौरवांचा छोटा भाऊ विकर्ण. लहान असून देखील आपले मत परखडपणे द्रौपदीच्या बाजूने मांडलेले बघितले की ह्या विकर्णाचे खरेच कौतुक वाटते. त्याच्यापुढे महान मानली गेलेली अनेक व्यक्तिमत्त्वे फारच छोटी दिसतात. त्यांची मते संकुचित दिसतात. सत्य व धर्माविरुद्ध दिसतात.
विकर्णाला उत्तर देण्यास लगेच त्वेषाने व पांडवांच्या द्वेषाने उभा राहिला तो म्हणजे कर्ण- एक अत्यंत तेजस्वी, शूर व्यक्तिमत्त्व. पण परिस्थितीने त्याचा बळी घेतलेला. सत्य बघितले तर तो पांडवांचा ज्येष्ठ भाऊ होता कारण तो प्रथम कुंतीपुत्र होता. पण तिच्या लग्नापूर्वी जन्मला होता म्हणून तिने नदीत सोडून दिलेला. त्यानंतर अगदी शेवटपर्यंत सूतपुत्र म्हणून ओळखला जाणारा. पण सत्य नाकारता येणार नाही की, दरवेळी तो दुर्योधनाशी प्रामाणिक राहिला. त्याचे कारण म्हणजे सर्वांनी त्याला सूतपुत्र म्हणून झिडकारले तरी दुर्योधनाने त्याला अंगराज बनवले होते- अंगराज कर्ण.
आता दुर्योधनाच्या ह्या वागण्यामागे कर्णाबद्दल प्रेम, करुणा होती की, स्वार्थ जास्त होता हे प्रत्यक्षपणे जाणणे कठीण. तो एक सत्य संशोधनाचा स्वतंत्र विषय असू शकेल. पण दुर्योधनाचा स्वभाव लक्षात घेतला तर स्वतःचा स्वार्थ हेच मुख्य कारण असेल हे सत्य नाकारता येणार नाही. याचे मूळ कारण म्हणजे कर्ण अर्जुनाच्या तोडीचाच धनुर्धर होता. आणि दुर्योधनाला अशाच व्यक्तीची अत्यंत गरज होती. त्याला माहीत होते की, लढाई करून पांडवांचे राज्य गिळंकृत करायचे असेल तर त्याच्याकडे हाच एक पर्याय होता.
आजदेखील राजकारणात अशा अनेक घटना दिसतात. मध्येच कपटी शकुनीने हा द्यूताचा वेगळाच प्रपंच उभा करून जुगारी युधिष्ठिराला अत्यंत कुशलतेने फसवले. ही गोष्ट वेगळी. युद्धाशिवाय राज्य मिळते आहे एवढेच नव्हे तर पांडवांचा अपमान करायची व सूड घेण्याची संधी कौरवांना आपोआप व सहज प्राप्त झाली होती आणि आता हा आपलाच विकर्ण सत्य बोलत होता हे बघून कर्ण त्वेषाने उसळला. प्राचार्य दसनूरकरांच्या शब्दात सांगायचे झाले तर, ‘‘विकर्णा, तू ज्या कुळात उत्पन्न झाला आहेस त्या कुळाच्या नाशाला कारण होऊ पाहतोस. अरणीपासून उत्पन्न झालेला अग्नी जसा अरणीलाच जाळून भस्म करतो त्याचप्रमाणे तुझे हे कृत्य आत्मघातकीपणाचे व अविचाराचे आहे. जगामध्ये अशा काही वस्तू असतात की विपरीत परिणाम करण्यासाठीच त्यांची उत्पत्ती झालेली असते. रोग शरीरात उत्पन्न होत असतो आणि वाढत असतो. परंतु तो शरीर सामर्थ्याचा नाश करीत असतो. पशू गवत खाऊन आपले भरण-पोषण करीत असतो, परंतु गवत तुडवू नये एवढीही अक्कल त्याला नसते. कुरुकुलात उत्पन्न होऊन आपल्या पक्षाची हानी करताना तुला दिक्कत वाटत नाही’’.
कसेही करून कर्णाची इच्छा होती की विकर्णाने दूर व्हावे. त्याला आणखी थोडा उपदेश करण्याच्या हेतूने तो म्हणतो – ‘‘द्रोण, भीष्म, कृप, अश्वत्थामा, धृतराष्ट्र ही तुझ्या पक्षातील ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळी तुझ्यापेक्षा बुद्धिमान असूनही त्यांनी मौन पाळले आहे. द्रौपदीने वारंवार प्रेरित करूनही या सन्माननीय सभासदांनी आपल्या मौनाचा भंग केलेला नाही. कारण द्रौपदीला धर्माचरणाने द्यूत खेळूनच आम्ही जिंकली आहे. या विषयी त्यांची खात्री आहे. धृतराष्ट्रकुमारा, आपल्या मूर्खपणाने तू आपल्या पायावर कुर्हाडीचा घाव घालीत आहेस. स्वतः बालक असूनही या भरल्या सभेमध्ये विद्वान वृद्धांचा आव आणून तू बाष्फळ बडबड करीत आहेस. तुला धर्माचे यत्किंचितही ज्ञान नाही. द्रौपदी दासी नसून स्वतंत्र आहे, असे तू समजतो आहेस, हे तुझ्या मंदबुद्धीचे लक्षण आहे’’.
आपल्या म्हणण्याला तात्विकदृष्ट्या बळकट करण्यासाठी कर्ण पुढे म्हणतो की, ‘‘जेव्हा युधिष्ठिराने स्वतःला पणाला लावून तो दास बनला, तेव्हा द्रौपदी स्वतंत्र असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. युधिष्ठिराने स्वतः द्रौपदीला पणाला लावले पण एक देखील पांडव त्याविरुद्ध बोलला नाही. एक वस्त्रा द्रौपदीला सभेत आणली हा तुला अधर्म वाटतो कारण तुला धर्म-अधर्म ह्यांचे ज्ञानच नाही’’.
कर्णाचे बोलणे चालूच होते. स्वार्थ असला व क्रोध आला की बुद्धी भ्रष्ट होते. मग माणूस काहीही बोलतो तसाच कर्ण धर्माबद्दल बोलताना भयंकर घृणास्पद बोलला – ‘‘स्त्रीला एकच पती असावा अशी धर्माज्ञा आहे. पण ह्या पांचाल राजकुमारीने पाच पतींचा स्वीकार केला. खरे म्हणजे ती वेश्या आहे. वेश्येला एक वस्त्रा असली किंवा विवस्त्र असली तरी तिला असे सभेमध्ये खेचून आणण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्याशिवाय आम्ही द्यूत कायद्याप्रमाणे खेळलो आहोत. व द्यूत धर्माप्रमाणे तिला जिंकले आहे’’.
पुढे दुःशासनाला उद्देशून कर्ण म्हणतो – ‘‘हा विकर्ण स्वतःला बुद्धिमान धर्मात्मा समजतो. पण सत्य म्हणजे तो महामूर्ख आहे. तो इतर सभासदांचा बुद्धिभ्रंश करण्याचा प्रयत्न करीत आहे. तू तिकडे लक्ष न देता पांडवांच्या अंगावर असलेली महावस्त्रे उतरवून घेण्याची व्यवस्था कर. तसेच दास झालेल्या द्रौपदीला दासी परिधान करतात तसले वस्त्र दे’’.
तदनन्तर द्रौपदीचा आणखी अपमान करण्याच्या हेतूने कर्ण म्हणतो – ‘‘हे द्रौपदी, ह्या क्षणापासून तुझा व कुंतीपुत्रांचा काही देखील संबंध राहिलेला नाही. तू आता दुर्योधनाच्या परिवाराची सेवा कर. हा आमचा तुला आदेश आहे. तुझ्या हितासाठी तू ते आपले कर्तव्य समज. आजपासून हाच दासीधर्म तुझा खरा धर्म आहे हे सत्य जाण’’.
कर्णाच्या ह्या भयंकर शब्दांनी द्रौपदीला अत्यंत क्रोध आला. स्वयंवराच्या वेळी सूतपुत्र म्हणून तिने कर्णाचा केलेल्या अपमानाचा हा अत्यंत निर्दय सूड आहे, हे तिला कळून चुकले. दुःखाची गोष्ट म्हणजे कर्णाला अनेक सद्गुण होते. तो शूर, उत्कृष्ट धनुर्धारी, दानशूर होता. पण दुष्टांच्या संगतीत वाढल्यामुळे सत्प्रवृत्ती नष्ट होऊन दुष्ट प्रवृत्ती उफाळून आल्या होत्या. हे सत्य जाणल्यामुळेच आपल्या पूर्वजांनी संस्कार व सुसंगती ह्यांना अत्यंत महत्त्व दिले होते. आणि दोन्हीमुळेच सत्याचरण व धर्मपालन सतत होत असे.
आज देखील जिथे जिथे अत्याचार व दुष्टप्रवृत्ती दिसते तिथे बारकाईने नजर टाकली, थोडेसे चिंतन केले तर लक्षात येईल की, संस्कार सांभाळण्यामध्ये कुणाची तरी चूक झाली आहे, आणि कुसंगतीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळेच घराघरात, देशात किंवा विश्वात अत्यंत वाईट घटना घडतात.
सारांश एकच – एक गोष्ट सत्य आहे की संस्कार व संगती ह्यांचे महत्त्व समजून मानवाने सावधानीने जगात पाऊल घालावे.