पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून झालेली पेपरफोडीची घटना अशा प्रकारच्या परीक्षांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करते आहे. पेपरफोडीचे प्रकार अशा देशव्यापी परीक्षांमध्ये नवे नसले, तरी यावेळी त्यासाठी घेतली गेलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत मात्र नवी आहे. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवू इच्छिणार्यांकडून तीस ते चाळीस लाख रुपये घेऊन त्यांना परीक्षा सुरू असताना उत्तरे सांगण्याचा हा एकंदर प्रकार धक्कादायक तर आहेच, परंतु पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्या देशभरातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. म्हणूनच पकडल्या गेलेल्या या टोळीवर अत्यंत कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. या टोळीने पेपरफोडीसाठी वापरलेले तंत्र त्यांच्या सराईतपणाकडे अंगुलीनिर्देश करते. एमबीएच्या दोघा विद्यार्थ्यांनी ही परीक्षा घेणार्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या संकेतस्थळावर बनावट नोंदणी क्रमांकांद्वारे परीक्षार्थी म्हणून स्वतःची नोंदणी केली. तिच्या आधारे प्रत्यक्ष परीक्षागृहात प्रवेश मिळवला.
आपल्या कोटाच्या आतील शर्टच्या बाह्यांना आतून जोडलेल्या छोटेखानी ब्लूटूथ कॅमेर्याच्या मदतीने आणि मोबाईल फोनवर घेतलेले फोटो आपोआप विशिष्ट ईमेल पत्त्यावर पाठवणार्या सॉफ्टवेअरद्वारे त्या दोघांनी प्रश्नपत्रिका भराभर स्कॅन केली. एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये थाटलेल्या नियंत्रण कक्षात हे फोटो डाऊनलोड करून घेऊन काही डॉक्टरांच्या मदतीने या प्रश्नपत्रिका सोडवण्यात आल्या आणि परीक्षार्थी गिर्हाईकांच्या कानात दडवलेल्या अत्यंत सूक्ष्म व मानवी शरीराच्या रंगाच्या ब्लूटूथ इअरप्लगच्या मदतीने त्यांना उत्तरे सांगितली गेली. या सार्या प्रक्रियेकडे पाहताना काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एमबीएचे विद्यार्थी पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसू कसे शकले? बनावट नोंदणी क्रमांकाद्वारे त्यांना नोंदणी कशी करता आली? हा तर ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ वरही वरताण करणारा प्रकार म्हणायला हवा. अ. भा. आयुर्विज्ञान संस्थानच्या काही कर्मचार्यांचा तर यात हात नाही ना, याची चौकशी आता करावी लागेल. या परीक्षार्थींना आपल्या कपड्यांत दडवलेल्या सूक्ष्म उपकरणांसह परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला ही दुसरी त्रुटी. वास्तविक अशा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल फोन आत नेता येत नाही. त्यामुळे ब्लूटूथ तंत्रज्ञानाची त्यांनी मदत घेतली. या परीक्षेची २३ पानी प्रश्नपत्रिका दडवलेल्या कॅमेर्यावर स्कॅन केली जात असताना किंवा ‘गिर्हाईक’ विद्यार्थी कानातल्या ब्ल्यूटूथ इअरप्लगवरून डिक्टेशन घेत असताना पर्यवेक्षकांना संशयही न येणे ही तिसरी मोठी त्रुटी म्हणावी लागेल. या सार्या घृणास्पद प्रकारातील सर्वांत गंभीर बाब म्हणजे पैसा ओतून अशा प्रकारच्या ‘कॉपी’ द्वारे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे हेच विद्यार्थी उद्या डॉक्टर म्हणून समाजात मानाने मिरवले असते. मरणासन्न रुग्णांचे प्राण ज्यांच्या हाती असतात आणि म्हणून समाज ज्यांना देवासमान मानतो, त्या डॉक्टरी पेशामध्ये अशा प्रकारे भामट्यांनी शिरकाव करणे हा एकंदर व्यवस्थेला लागलेला कलंक आहे. ज्या डॉक्टरांनी या प्रश्नपत्रिका सोडवण्यास मदत केली, त्यांची वैद्यकीय पदवी मेडिकल कौन्सिलने तात्काळ काढून घ्यावी. अत्यंत कडक भूमिका घेतली गेल्याखेरीज असा कलंक पुसून काढता येणार नाही आणि जरब बसणार नाही. दुर्दैवाने ज्यांनी अशा गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवायचे, त्यांची विश्वासार्हताच संपुष्टात आलेली आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षाने लाच घेऊन वैद्यकीय महाविद्यालयास परवानगी दिल्याचे प्रकरण सीबीआयने उजेडात आणले होते त्याला काही फार काळ उलटलेला नाही. ज्या अभ्यासक्रमासाठी हजारो विद्यार्थी दिवसरात्र मेहनत करतात, त्यांचे पालक परवडत नसताना पोटाला चिमटा घेऊन पै – पैसा साठवून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची आस बाळगतात, त्यांच्या स्वप्नांना मातीमोल करणार्या अशा गैरप्रकारांबाबत यत्किंचितही दयामाया दाखवली जाता कामा नये. तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत जाईल, तसतशी आव्हानेही बिकट बनतील, परंतु कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये यासाठी परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे निर्दोष व विश्वासार्ह व्हावी या दिशेने गांभीर्याने ठोस पावले टाकावीच लागतील.