– प्रा. रमेश सप्रे
त्याची ती एखाद्या मोठ्या माणसासारखी खांदे उडवत, हात जमिनीला समांतर हलवत बोलण्याची शैली लक्षात राहण्यासारखीच होती. टेबलापेक्षा थोड्या जास्त उंचीची एक आकृती काचेच्या दारामागे टकटक करत उभी होती. आत पाऊल टाकल्यापासून ती बोलू लागली, शाळेत येऊन अजून पंधरा दिवसही झाले नव्हते. पण धाडस बघा. इयत्ता पाचवीतला हा मुलगा मुख्याध्यापकांना विचारत होता, ‘काय सर, शाळा सुरू होऊन इतके दिवस झाले पण अजून टाइमटेबल नाही? कुठला तास, कोणता शिक्षक, काय विषय काहीही कळत नाही. आम्ही आमचा मौल्यवान वेळ (प्रेशस टाइम) वाया घालवतोय सर!’
त्याला खुर्चीवर बसवून प्रथम शांत केलं. नाव विचारलं तर म्हणाला, ‘फलिप. फलिप फर्नांडिस.’ त्याचं असं झालं होतं की शाळा सुरू झाल्यावर दोन शिक्षक अधिक चांगली संधी मिळतेय म्हणून शाळा सोडून गेले. त्यामुळे तयार टाइमटेबलमध्ये बदल करणं भाग पडलं. म्हणून फिलिपचं म्हणणं तसं बरोबर होतं. त्याला शाळेची अडचण सांगितल्यावर म्हणतो कसा?- ‘देन इट्स ओके’. निघताना त्याच्या हातावर चिक्की ठेवली तेव्हा गोड हसला.
काही काही माणसं पहिल्या भेटीतच खूप प्रभाव पाडून जातात. फिलिप त्यांपैकी एक होता. इंग्रजी माध्यमातून आल्यानं चांगला इंग्रजी बोलायचा. मुख्य म्हणजे खूप धीट होता. आणि योग्य तेच बोलत असल्यानं भय म्हणून नव्हतं त्याला. वर्गातल्या सार्या मुलांच्या तक्रारी घेऊन नेहमी यायचा तो फिलिपच. जणू वर्गाचा अनभिषिक्त म्हणजे न निवडलेला प्रतिनिधीच होता तो. त्याच्या बोलण्याला अर्थ असायचा. कधीही वायफळ तक्रार घेऊन आल्याचं आठवत नाही. आणि त्याच्या तक्रारी म्हणजे विधायक सूचनाच असायच्या. कळत-नकळत एकूणच शिक्षणपद्धतीवर, शाळेतल्या अनेक गोष्टींवर फिलिपची प्रतिक्रिया असायची. तो बोलायचा तेच एखाद्या तत्त्वज्ञासारखा.
हेच पहा ना. त्या वर्षीचं वेळापत्रक तयार झाल्यावर ते वर्गात विद्यार्थ्यांना दिलं गेलं. दोन-चार दिवसांनी मधल्या सुटीत हे फिलिपमहाशय वेळापत्रक हातात घेऊन आले, ‘रोज पहिला तास गणिताचा. कसं वाटतं हे सर?’ या प्रश्नावर त्याला स्पष्टीकरण दिलं की जो शिक्षक त्यांचा वर्गशिक्षक आहे तो फक्त गणितच शिकवतो; आणि वर्गशिक्षकाचा तास पहिलाच असतो ना? यावर गंभीरपणे फिलिप म्हणाला, ‘देन इट्स ओके, सर!’
असा एकही आठवडा जायचा नाही की फिलिप काहीतरी विचारायला किंवा सांगायला आला नाही. त्या दिवशी मात्र त्यानं कमालच केली. ‘सर, एक सुचवायचंय.’ असं म्हटल्यावर मी म्हटलं, ‘बोल, काय मनात आहे ते बोलून टाक’. यावर म्हणतो कसा, ‘सर आपली स्टाफरूम फर्स्ट फ्लोअरवरून सर्वांत वरच्या पाचव्या मजल्यावर नेऊ या का?’ अशी अफलातून सूचना करणारा फिलिप एक तर स्टाफमेंबर किंवा उपमुख्याध्यापकच वाटत होता. कारण विचारताच तो जे म्हणाला ते अंतर्मुख करणारं होतं. असं काय म्हणाला असेल तो?..
‘सर, मी चुकत असेन.. पण तुम्हीच पहा ना.. पहिल्या मजल्यावरूनच इतर मजल्यांवर जावं लागतं. प्रत्येकाचं लक्ष स्टाफरूमच्या दारातून आत जातंच. काय दिसतं तिथं? शेल्फवर कसेही रचलेले वह्यांचे ढीग.. मधल्या टेबलांवर तर विचारू नका.. एक इंच जागा रिकामी नसते.. जमिनीवरही कागद पडलेले असतात. कळत नाही की ती स्टाफरूम आहे का स्टफरूम?’.. छान इंग्रजीत फिलिप बोलत होता. मी म्हटलं, ‘एवढंच ना.. आपण रोज ती खोली स्वच्छ करून नीट आवरून ठेवत जाऊ’. मला माझ्या बोलण्यातला फोलपणा (व्यर्थता) कळत होता. सवयी जर नीट नसतील तर पुन्हा ती रूम तशीच होणार… अव्यवस्थित नि अस्वच्छ! यावर फिलिप जे म्हणाला ते ऐकून तर माझी बोलतीच बंद झाली.
तो म्हणाला, ‘ते स्वच्छतेचं ठीक आहे सर. पण शिक्षक ज्या पद्धतीनं नि ज्या विषयांवर बोलतात त्याचं काय? शिक्षण सोडून इतर विषयांवरच बोलतात आणि विद्यार्थ्यांबद्दल बोलतात ते पूर्णपणे नकारात्मक. आमच्यात चांगलं काही दिसतच नाही का यांना?’
हा प्रसंग, हे उद्गार खोटे वाटतील पण फिलिप होताच तसा. गंभीर विचार करणारा. अभ्यासात चांगला होता. म्हणजे अगदी ‘नव्वद प्लस’ टक्केवाला नव्हता पण विशेष प्रावीण्य (डिस्टिंक्शन) मिळवायचा. आई जर्मनीत. वडील ऑस्ट्रेलियात. हा आजीकडे. त्याची आजी दर शुक्रवारी अगत्यानं चर्चमध्ये जाताना शाळेत येऊन बसायची. तिचा नातू फिलिप एक जबाबदार मुलगा होता. आपला नातू जवळ असणं कोणत्या आजीला आवडणार नाही? तिलाही खूप बरं वाटायचं. पण तिचे डोळे वारंवार पाणावायचे तो आईवडलांपासून दूर आहे; आणि आईवडील केवळ पैसे मिळवण्यासाठी एकमेकांपासून दूर आहेत. खरंच होतं तिचं. सोन्यासारख्या मुलांपासून दूर राहून कोणतं शहाणपण होतं? पण नोकरी करणार्या अनेक पालकांना हे कळत नाही. उरलेला वेळसुद्धा मुलांबरोबर आनंदानं जगण्यात नि प्रेमानं संवाद साधण्यात ते घालवत नाहीत. सारखं ‘अभ्यास कर.. मार्क्स मिळव!’ असो.
एकदा फिलिपला म्हटलं, ‘व्हाय यू थिंक ओल्ड लाइक अँड नॉट चाइल्डलाइक? (तू म्हातार्यासारखा का विचार करतोस; छोट्या मुलासारखा का नाही करत?’) यावर तो फक्त हसला. त्यादिवशीची सूचना तशीच होती. शाळेतला एक शिपाई वृद्ध झाल्यानं खूप थकला होता. लिफ्ट बर्याच वेळी मोडलेली असायची. अशा वेळी नोटिस घेऊन पाच मजल्यांवरील वर्गातून फिरताना तो शिपाई पुरा दमून जायचा. डोळ्यात पाणी आणून फिलिप विचारत होता, ‘त्याला का तुम्ही हे काम सांगता? तो म्हातारा झालाय, सर!’ मी ही भारावून गेलो व म्हटलं ‘यापुढे नाही सांगणार.’
दुसर्यांबद्दलची काळजी, कणव, करुणा हा जणू फिलिपचा स्वभावच होता. पण नुसता भावून होऊन उसासे टाकणारा तो नव्हता. तर विचार करून मार्ग सुचवणारा होता. त्याचे विचार शिक्षकांनाही विचार करायला लावायचे. कोण कुणाचा शिक्षक?
त्याच्या वर्गात असलेल्या जुळ्या भावंडांचे वडील अपघातात गेले. ती कोवळी मुलं त्या घटनेचा अर्थ पूर्ण न कळूनही हादरून गेली होती. कारण काकाकडे राह्यचं की मामाकडे या वादात ती दोघंही वडलांच्या मित्राकडे राहत होती. सारंच मानसिकदृष्ट्या धक्कादायक(ट्रॉमॅटिक) होतं. अशा वेळी काही दिवसांनी गृहपाठ केला नाही म्हणून इतर विद्यार्थ्यांबरोबर यांनाही वर्गाबाहेर काढलं गेलं. मधल्या सुटीत फिलिप माझ्यासमोर… ‘इज धिस फेअर्, सर?(हे योग्य आहे का?) ‘काय?’ असं विचारल्यावर सारा प्रकार सांगून फिलिप म्हणतो कसा, ‘सर, शुडंट वुई अंडरस्टँड देम?(आपण त्यांना समजून घ्यायला नको का?)’
किती खरं होतं त्याचं म्हणणं! मी अस्वस्थ होऊन विचार करू लागलो. यातून एक चांगली प्रथा शाळेत निर्माण झाली… अशा दुर्दैवी मुलांसंबंधी नोटिस काढून सर्व शिक्षक व इतर कर्मचार्यांना दाखवायची. सर्व बाबतीत देता येईल तेवढा मानसिक आधार अशा मुलांना द्यायचा व अन्य मदत करायची. असं करणं खरोखर आवश्यकच होतं.
एका दृष्टीनं फिलिप आमचा ‘थिंक टँक’ म्हणजे विचार व कल्पनांचा साठाच होता.
सहलीचं ठिकाण ठरवण्यापूर्वी मुलांना का नाही ठिकाणं सुचवायला सांगायचं? बालदिनासारखे मुलांचे – मुलांसाठी(ऑफ अँड फॉर द चिल्ड्रन) असलेले कार्यक्रम मुलांनीच (बाय द चिल्ड्रन) का नाही नियोजन करून साजरे करायचे? सगळ्या विद्यार्थ्यांनी सहज सहभागी व्हावं अशा पद्धतीनं सहली का नाही आयोजित करायच्या? विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी, मंत्री निवडता मग त्यांना काम करण्यासाठी मार्गदर्शन व स्वातंत्र्य का नाही देत? असे त्याचे प्रश्न व त्यांच्याशी संबंधित सूचना आम्हां शिक्षकांनाही मार्गदर्शन करणार्या असायच्या. काही शिक्षकांना त्या आवडायच्या. काहींना फलिप ओव्हरस्मार्ट (अतिशहाणा) वाटायचा. पण तो स्वतः मात्र आपल्याच विश्वात असायचा. विचारांचं, कल्पनांचं, भावनांचं अमूर्त विश्व! तो जणू या सामान्य जगाचा अनिवासी नागरिक होता. (नॉन रेसिडंट सिटिझन).
त्याच्या या निर्भयतेला आम्ही अभय दिलं होतं. याची त्याला जाणीव होती. काय काय शिकलो आम्ही त्याच्याकडून?
शिक्षण ही आनंददायी प्रक्रिया आहे. काही नाही तरी आनंद निर्मिती शिक्षणाच्या प्रत्येक कृतीतून, अध्ययन प्रसंगातून झाली पाहिजे. यासाठी हवं प्रेम. इतर उद्दिष्टं त्या मानानं गौण.
सार्या निर्णयांचं केंद्र, सार्या नियोजनाची सत्ता मुख्याध्यापका सारख्या एका व्यक्तीच्या हातात असण्यापेक्षा तिचं विकेंद्रीकरण (डिसेंट्रलायझेशन) झालं पाहिजे.
शाळेशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींना शाळेची इमारत, फर्निचर, प्रयोगशाळेतील उपकरणं यापेक्षा अधिक जपलं पाहिजे. त्यांच्या मनाभावनांचा मान राखायला पाहिजे.
शाळेतील काही निर्णयप्रक्रियेत (डिसिजन मेकिंग) विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले पाहिजे. हा आपला निर्णय आहे असं त्यांना वाटलं तर त्यांच्यात सामूहिक जबाबदारी (कलेक्टिव्ह रिस्पॉंसिबिलिटी), बांधीलकी (कमिटमेंट), संघभावना (टीम स्पिरिट) या गुणांचा विकास होईल.
एखादी जबाबदारी मुलांवर टाकली तर ती पार पाडण्याचं स्वातंत्र्यही त्यांना दिलं पाहिजे. ‘चुकांतून शिकण्याची’ संधीही त्यांना मिळाली पाहिजे.
शाळा फक्त लेखी नियमांनी चालत नाही. तर त्या नियमांचा जो आत्मा असतो त्यावर चालते. (नॉट द लेटर बट् द स्पिरिट ऑफ द लॉ).
मुलांना संधी मिळाली तर त्यांची बुद्धी, कल्पनाशक्ती, अंतःस्फूर्ती नि सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी) यातून अभिनव कार्यक्रम, उपक्रम, प्रकल्प साकारले जाऊ शकतात.
इंग्रजीत एक अर्थपूर्ण म्हण आहे, ‘चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन’. याचे अनेक अर्थ सांगितले जातात. ‘मुलांचे पाय पाळण्यात दिसतात’. म्हणजे तो पुढे कोण होऊ शकतो या त्याच्या क्षमतांचा अनुभव तो लहान असतानाच येतो. आणखी एक अर्थ म्हणजे ‘लहान मुलं महान विचार सहज बोलून जातात’. ‘बालादपि सुभाषितं ग्राह्यम्|..’ लहानांच्या विचारांवर मोठ्यांनी विचार केला तर कधी कधी खूप काही चांगलं घडून येऊ शकतं. फिलिपनं या दोन्ही दृष्टीनं आम्हाला श्रीमंत केलं.
काही महिन्यांपूर्वी तो आपल्या आजीच्या अंत्यसंस्कारांसाठी भारतात आला होता. अचानक भेटला. म्हणजे त्यानं मला ओळखलं म्हणून. नाहीतर ओळखता येणार नाही एवढा बदल त्याच्यात घडला होता. उंचापुरा, देखणा, आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा फिलिप अजून जीवनाचा गंभीरपणे विचार करत असेल का?.. या प्रश्नाचं उत्तर त्यानंच दिलं. आता तो अमेरिकेत असतो. तिथं त्यानं त्याच्यासारख्या समविचारी मित्रांबरोबर एक खाजगी संस्था (एन्. जी. ओ.) स्थापन केलीय. एक प्रकारचा कौन्सेलिंग ब्यूरो (समुपदेशन केंद्र) आहे तो. मानसशास्त्र, शिक्षण, कौटुंबिक जीवन, व्यवसाय इ. पैलूंबद्दल मूल्यमापन व मार्गदर्शन (टेस्टिंग अँड कौन्सेलिंग) त्यांच्या संस्थेमार्फत केलं जातं. स्वतः फिलिप मात्र जीवनाची मूल्यं, तत्त्वं, वैचारिक-भावनिक संतुलन अशा पैलूंबाबत समुपदेशन करतो. या संदर्भातील त्याचे विचार मौलिक वाटले.
आज सर्वत्र नैतिक मूल्यांचा, नीतिमत्तेचा अधःपात दिसून येतोय. कारण व्यक्ती, कुटुंब, संस्था कशालाच तत्त्वज्ञानाचा पाया (फिलॉसॉफिकल फाउंडेशन) नाही. कोणत्याही व्यवसायाला, क्षेत्राला मूल्यांशी (व्हॅल्यूज) काही देणंघेणं नाही. आणि असं जीवनविषयक तत्त्वज्ञान असल्याशिवाय सध्याची परिस्थिती बदलणार नाही. तिशीत पोचलेला फिलिप बोलत होता मात्र अनुभवी व्यक्तीसारखा.
त्याचं ते खूप खोलवरून येणारं बोलणं ऐकताना माझं मन काही वर्षं मागं गेलं आणि तो कोवळा मुलगा आठवला ज्याचे बोल आम्हा सर्वांसाठी अमृतासारखे मधुरमौलिक असायचे. उगीच नाही आम्ही सारे त्याला गमतीनं पण उत्स्फूर्तपणे म्हणायचो… फिलॉसॉफर फिलिप…!