पर्वरीच्या विकासासाठी विविध राजकीय पक्ष, संघटना व पंच सदस्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘युनायटेड पोर्वोरकार’ या संघटनेने दि. ३ मार्च रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार गोविंद पर्वतकर यांना पाठिंबा व्यक्त केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रसाद फातर्पेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
आपण कॉंग्रेसमन असूनही पर्वरीसाठी आपण पर्वतकर यांचा प्रचार करणार असल्याचे फातर्पेकर यांनी सांगितले. पर्वरी मतदारसंघातील पेन्ह द फ्रान्स, साल्वादोर दु मुंद व सुकूर या तीन पंचायतीतील एकूण ३१ पंच सदस्यांपैकी २१ पंच सदस्यांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्वरीचा झपाट्याने विकास होत आहे. वेगवेगळी कार्यालये पर्वरीत आहेत. कचरा विल्हेवाट, पाणी पुरवठा, वीज पुरवठा अशी अनेक समस्या असल्याचे ते म्हणाले.
या मतदारसंघात बाहेरील उमेदवार निवडून आलेला नको आहे. स्थानिक उमेदवारच उभा करण्याची सूचना संघटनेने वेगवेगळ्या राजकीय पक्षांना केली होती. परंतु भाजपने चारित्र्यवान स्थानिक उमेदवार दिल्याने पर्वतकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय संघटनेचे फातर्पेकर यांनी सांगितले.
पर्वतकर यांना निवडून आणल्यास पर्वरी या नव्या मतदारसंघाच्या विकासावर भर देण्याचे आश्वासन विरोधी नेते मनोहर पर्रीकर यांनी दिल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस राजकुमार देसाई, मिलिंद भोसले, मॅक्स फुर्तादो, जनार्दन आमोणकर, युवराज प्रियोळकर आदी उपस्थित होते.