पूर्व तिमोरच्या धगधगत्या मुक्तिसंग्रामाची यशोगाथा
– डॉ. पांडुरंग फळदेसाई
गो व्यात संपन्न झालेल्या ४४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पूर्व तिमोर आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या ‘बियाट्रीस वॉर’ या तेनुममिश्रित पोर्तुगीज भाषेतील चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमासाठीचा पुरस्कार आणि सुवर्णमयूर प्रदान करण्यात आला. हा चित्रपट कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर कलामंदिरात प्रदर्शित करण्यात आल्याने तो पाहण्याची संधी मिळाली; नपेक्षा अत्यंत दर्जेदार स्वरूपाचे भारतीय आणि परदेशी चित्रपट कमी आसनक्षमतेच्या चित्रपटगृहांत ठेवल्याने ते पाहण्याची संधी हुकली. मात्र पूर्व तिमोरच्या कल्पक दिग्दर्शक बॅटी रेइस आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्दर्शक लुइगी आक्विस्तो यांनी संयुक्तरीत्या दिग्दर्शित केलेला हा चित्रपट जेव्हा मी पाहिला तेव्हा त्यातील विषय हा केवळ बियाट्रीच्या व्यक्तिगत जीवनाशी, तिच्या कौटुंबिक जिव्हाळ्याशी संबंधित नसून अवघ्या पूर्व तिमोरच्या मुक्तिसंग्रामाशी निगडीत असल्याने मी एक प्रकारचा सुन्नपणा अनुभवला. त्यातला थरार आणि मानवी मूल्यांची शोधसंकल्पना पंचप्राणांना गवसणी घालणारी.
जेमतेम पावणेदोन तासांच्या या चित्रपटात गरिबी, अनारोग्य आणि अल्पशिक्षणात पिचलेल्या पूर्व तिमोरचे दर्शन क्षणोक्षणी घडते. बियाट्रीच्या व्यक्तिगत जीवनाची झालेली परवड आणि पूर्व तिमोरची आंतरराष्ट्रीय राजकारणात झालेली फरफट समांतर दिसते. व्यापाराचे लुटारू तत्त्व मनीमानसी बाळगून आलेल्या पोर्तुगिजांनी पूर्व तिमोरला अक्षरशः लुटण्याचा धंदा सुमारे पाच शतके चालविला. गोव्याच्या वाट्याला आलेला पोर्तुगीज नीतीचा अनुभव पूर्व तिमोरच्याही नशिबी आला. म्हणूनच ‘बियाट्रीस वॉर’ चित्रपट पाहताना माझ्या नजरेसमोरून गोव्याचा मुक्तिलढा सतत सरकत होता. गोव्याचाच मुक्तिसंग्राम आपण क्षुल्लक फरकाने पाहत आहोत असा सतत भास होत होता. कारण गोमंतकीय जनतेच्या वाट्याला आलेला पोर्तुगीज राजसत्तेचा अनन्वित छळ, आझेंत मोंतेरोसारखे पाशवी अधिकारी, जनरल डायर याच्या जालियनवाला बाग हत्याकांडावरही कडी करील असे पूर्व तिमोरच्या जनतेला नदीकिनारी नेऊन केलेले हत्याकांड या चित्रपटात मोठ्या कौशल्याने दाखविण्यात आले आहे. मात्र ते पोर्तुगिजांच्या अमलातून मुक्त झाल्यावर इंडोनेशियाच्या क्रूर राज्यकर्त्यांनी घडवून आणलेले होते.
पूर्व तिमोर हा दक्षिण पूर्व आशियातील एक छोटासा देश. क्षेत्रफळ केवळ १५ हजार ४१० चौरस किलोमीटर. सध्याची लोकसंख्या सुमारे साडेअकरा लाख. त्यातले ९७ टक्के कॅथॉलिक, २.२ टक्के प्रॉटेस्टंट, ०.३ टक्के मुसलमान व राहिलेले ०.३ टक्के अन्यधर्मीय. इथली अधिकृत भाषा तेनुम आणि पोर्तुगीज. चाळीस हजार वर्षांपूर्वी या भूमीत पहिली लोकवस्ती आली. इथल्या मानववंशाच्या अभ्यासकांनुसार येथील लोक तीन वंशवृक्षातून आलेले दिसतात. एक प्रवाह हा ऑस्ट्रेलॉइड लोकांचा. तो ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनियामधून आला. त्याला चाळीस हजार वर्षे झाली. दुसरा ऑस्ट्रेनेशियनांचा सनपूर्व तीन हजार वर्षांच्या काळात येऊन पूर्व तिमोरमध्ये स्थायिक झाला. त्यानीच येथील जमिनीत पहिली शेती केली. हा मानववंश शेतीप्रधान होता. त्यानंतर दक्षिण चीन आणि उत्तर इंडोचीनमधून तिसरा प्रोटो-मलाय हा वंश आला. अशा प्रकारे विविध मानववंशांचा संकर पूर्व तिमोरमध्ये होत आला. उष्ण कटिबंधातील देश असल्याने येथील समृद्ध जंगले चंदनासाठी ओळखली जात. त्याचप्रमाणे कॉफी, मध, मेण इत्यादी जंगली उत्पादनांसाठीही हा देश उर्वरित जगाला माहीत होता. शिवाय सुधारलेल्या देशांत मोलमजुरीसाठी येथून गुलामांची निर्यात व्हायची. चौदाव्या शतकापर्यंत पूर्व तिमोरचे हे चित्र जगाला माहीत होते. लोभी पोर्तुगिजांची नजर या देशाकडे वळली आणि त्यांनी सोळाव्या शतकात या देशावर कब्जा केला. इथल्या लोकांना अनेक वर्षे राबवून त्यांनी ‘डिली’ या शहराची सर्वप्रथम उभारणी केली आणि सन १७६९ मध्ये त्यांनी पहिली पोर्तुगीज वसाहत स्थापन केल्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर त्यांच्या नेहमीच्या सवयीनुसार त्यांनी संपूर्ण पूर्व तिमोरवर कब्जा केला. त्यादरम्यान स्थानिक जनतेचा अपरिमित छळ करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. दरम्यान, डचांनी पश्चिम प्रांतात घुसखोरी सुरू केली. त्यांचे उपद्व्याप फारच वाढल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायनिवाडा होऊन १९१४ साली पश्चिम भागाला डच वसाहत आणि पूर्व भागाला पोर्तुगीज तिमोर म्हणावे असा निवाडा झाला.
मात्र पोर्तुगिजांनी पूर्व तिमोर हे व्यापार-उदिमाचे एक ठाणे म्हणून त्याचे अपरिमित शोषण केले. मात्र किमान संसाधननिर्मिती, जन-आरोग्य आणि स्थानिकांना शिक्षणसुविधा या बाबतीत त्यांनी कमालीचे दुर्लक्ष केले. त्यातूनच पुढे पूर्व तिमोरची जनता विरुद्ध पोर्तुगीज राजसत्ता असा संघर्ष उभा राहिला. त्या दरम्यान दुसर्या महायुद्धानंतर डिली शहरावर जपानने कब्जा केला. जपानच्या आगळिकेविरुद्ध स्थानिक जनतेने गनिमी काव्याने युद्ध छेडले. पूर्व तिमोरच्या डोंगराळ भागांतून मोठ्या प्रमाणावर स्थानिक तरुण आणि प्रौढ संघटित झाले. त्यांनी ठामपणे जपानविरुद्ध गनिमी काव्याने युद्ध छेडले. दुसर्या महायुद्धादरम्यान पूर्व तिमोरच्या चाळीस ते सत्तर हजार नागरिकांचे बळी गेले. परंतु संधीसाधू पोर्तुगिजांनी युद्ध संपताच पुन्हा आपला जम बसवला. पुढे आंतरराष्ट्रीय दबावापुढे पोर्तुगीज सत्तेला मान झुकवावी लागली आणि १९७५ मध्ये पूर्व तिमोरला पोर्तुगिजांपासून मुक्ती मिळाली.
परंतु पूर्व तिमोरच्या नशिबी मुक्ती अनुभवण्याचे भाग्य क्षणिक ठरले. इंडोनेशियाने आंतरराष्ट्रीय संघटनेला हुलकावणी देत पूर्व तिमोरवर आपली सत्ता स्थापन केली. एवढेच नव्हे तर आपल्या देशातील पूर्व तिमोर हा २७ वा परगणा असल्याचे त्यांनी १७ जुलै १९७६ मध्ये जाहीरदेखील करून टाकले. त्यावेळेपासून पूर्व तिमोरच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. हजारोंना परागंदा व्हावे लागले. लाखभर लोकांच्या प्राणांची आहुती पुढील दोन तपांच्या काळात पडली. आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या पाहणीचे निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आहेत. १९७४ ते १९९९ दरम्यान इंडोनेशियाच्या जुलमी राजवटीने पूर्व तिमोरच्या १८ हजार ६०० लोकांना कंठस्नान घातले, तर भूक आणि रोगराई यांमुळे ८४ हजार २०० नागरिकांचा बळी गेला! हे विदारक चित्र कोणाही सुधारीत देशाला शरमेने मान खाली घालायला लावणारे.
या जुलूमजबरदस्तीने मेटाकुटीस आलेल्या जनतेमधून ‘फॅलिंटिल’ ही स्वातंत्र्यप्रेमींची संघटना १९७४ मध्ये उदयाला आली. त्या संघटनेने देशातील असंख्य युवकांना प्रेरित केले. स्वतःच्या संघटनेत सामील करून घेतले. स्वातंत्र्याचा संदेश सर्वांपर्यंत पोचविण्याचा ध्यास घेतला. सुमारे दोन तपांपर्यंतचा त्यांचा संघर्ष हीच पूर्व तिमोरची मुक्तिगाथा आहे. पुढे ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल आणि अमेरिकेच्या मदतीने शांती प्रस्थापनाची प्रक्रिया सुरू झाली. या दरम्यान इंडोनेशियाचे सर्वेसर्वा जनरल सुहार्तो यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर पूर्व तिमोरच्या जनतेला गुप्त मतदानाची संधी देण्यात आली. त्यातून मुक्तीचे स्वप्न साकारले आणि २० मे २००२ रोजी एकविसाव्या शतकातील पहिले स्वायत्त राष्ट्र म्हणून पूर्व तिमोर जगासमोर आले. यावेळी दोन लाखाहून अधिक तिमोरचे निर्वासित तिमोरमध्ये परतले. देशाचा ताबा जनतेकडे देण्याअगोदर इंडोनेशियन राजसत्तेने तिमोरमधील सर्व साधनसुविधांची राखरांगोळी करून आपल्या विद्ध्वंसक आणि विकृत मनोवृत्तीचे दर्शन जगाला घडविले. फिलिपिन्स आणि पूर्व तिमोर ही दोन राष्ट्रे म्हणजे आशिया खंडातील दोन रोमन कॅथॉलिक राष्ट्रे होत. पूर्व तिमोरमधील सुमारे ३८ टक्के लोकसंख्या ही आंतरराष्ट्रीय गरिबीरेषेखाली आहे आणि सुमारे अर्धीअधिक लोकसंख्या निरक्षर आहे. या राष्ट्राचे अधिकृत नाव आहे- ‘तिमोर-लेस्ते.’ हे राष्ट्र स्वतंत्र झाल्यावर लोकतंत्र पद्धतीने शनाना गुस्मांव हे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. परंतु राजकीय अस्थिरतेचा शाप घेऊन आलेल्या तिमोर-लेस्तेला आजही अस्थिरता आणि अशांततेला सामोरे जावे लागत आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर जेव्हा आपण ‘बियाट्रीस वॉर’ पाहतो तेव्हा अंतर्बाह्य अस्वस्थ होतो. अगदी कोवळ्या वयातली बियाट्री तशी अत्यंत उच्चभ्रू कुटुंबातली. तिला साजेसा तिचा बालमित्र तमास तिला नवरा म्हणून लाभतो. इथल्या बालविवाहाची प्रथा चित्रपटात अधोरेखित करतानाच तमासच्या हळव्या आणि संवेदनशील वृत्तीचे दर्शन घडते. कोंबड्यांच्या झुंजीसाठी आपला कोंबडा घेऊन आलेला तमास मोठ्या उमेदीने कोंबड्याला झुंजीत लोटतो. पण त्याचा कोंबडा पळपुटा निघाल्याने तो पराभूत व दुःखी होतो. मात्र गावचा पाद्री त्याला दुःखावर मात करण्याचे बळ देतो.
बियाट्रीच्या सान्निध्यात तमास वाढतो. युवावस्थेनंतर बियाट्री गरोदर राहते. मात्र इंडोनेशियन सैनिकांचा कमांडर संपूर्ण प्रदेशावर आपली दहशत बसवतो. तमासला जेरीस आणतो. त्याच्यासमोर त्याच्या गरोदर पत्नीवर बलात्कार करतो. असहाय्यपणे घेतलेला तो अनुभव तमासच्या पचनी पडत नाही. इंडोनेशियाच्या विजयोत्सवाची तयारी चालू असताना निर्धारित समारंभाअगोदर राष्ट्रवादींचा हल्ला होतो. त्यामुळे बिथरलेला कमांडर बंदुकीच्या धाकावर सर्व पुरुष व मुलांना नदीच्या सुकलेल्या विस्तीर्ण पात्रात नेतो. गावातील गरोदर महिलांना संरक्षण देण्यासाठी धडपडणार्या पाद्रीला अटक केली जाते व रांगेत दाटीवाटीने उभ्या असलेल्या सर्व गरोदर महिला आणि मुलांवर बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव होतो. नदीकाठी हाकलत नेलेल्या सर्व पुरुषांना पात्रात उभे केले जाते. ज्यात तमासदेखील असतो. त्यांना पूर्व तिमोरचे स्वातंत्र्यगीत गाण्याचे आदेश कमांडर देतो. सक्तीच्या आदेशानुसार सर्वजण एका सुरात राष्ट्रगीत गातात. त्यानंतर कमांडरच्या आदेशानुसार सर्व सैनिकांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या नदीपात्रातील सर्वांचेच शिरकाण करून जातात. त्या नागरिकांचा दोष कोणता? तर त्यांनी आपल्या देशाचे राष्ट्रगीत गायले! हृदय हेलावणारा केवळ हाच प्रसंग या चित्रपटात नाही तर असे अनेक प्रसंग यात येतात. कमांडरच्या पाशवी वृत्तीला धरबंद घालण्यासाठी बियाट्री आपल्या चुलत बहिणीला त्याची रखेली बनण्याचा सल्ला देते. त्यामुळे तिमोरच्या जनतेवर होणारे अनन्वित अत्याचार कमी व्हावेत हा तिचा उद्देश असतो. तो बव्हंशी सफल होतो. त्यामधूनदेखील मातृ-पितृप्रेम आणि राष्ट्रप्रेमाची एक वेगळी कथा उलगडत जाते. परंतु नदीच्या पात्रात झालेल्या हत्याकांडावेळी तमास मेल्याचे सोंग करतो व त्या भयानक प्रसंगातून निसटतो. इकडे गरोदर असलेली बियाट्रीदेखील सैनिकांना हुलकावणी देऊन निसटते.
निरंतर संग्रामानंतर इंडोनेशियाच्या सैनिकांना आपली शस्त्रे म्यान करून परतीची वाट धरावी लागते. संपूर्ण सैन्य माघारी फिरते आणि सामूहिक हत्याकांडानंतर परागंदा झालेला तमास बियाट्रीला भेटण्यासाठी गावात येतो. अनेक वर्षांनंतर आलेल्या तमासचे रूप गावाला माहीत नसते. परंतु संपूर्ण गाव त्याला तमास म्हणून मान्यता देतो. बियाट्री सदैव साशंक असते. तमासचा स्पर्श, त्याचे प्रेम आणि त्याची एकंदर वागणूक बियाट्रीला उपरी वाटते. पण ती जाहीररीत्या व्यक्त करण्याचे धाडस तिच्यात नसते. शेवटी प्रसंग घडत जातात आणि तोतया तमासची भांडाफोड होते. तोतया तमास बियाट्रीच्या खर्या तमासची व्यथा सांगतो. हत्याकांडातून सुटून गेलेला तमास बियाट्रीच्या आठवणीने क्षणाक्षणाला हळवा होतो. बियाट्रीला तोंड दाखविण्याचे धाडस त्याच्यात राहिलेले नसते. त्यामुळे तो आत्मघात करतो. मात्र तसे करण्यापूर्वी तो या तोतया (पण कूरकर्मा) तमासला आपल्या बियाट्रीचा सांभाळ करण्याची विनंती करून त्याच्याकडून तसे वचन घेतो. त्या वचनाची पूर्ती करण्यासाठी तोतया तमास गावात येऊन बियाट्रीला भेटतो. तिच्याबरोबर राहतो. मात्र आपल्या पतीशी एकनिष्ठ असलेल्या बियाट्रीला तमासची तोतयेगिरी कळून चुकते. -आणि अथांग सागराच्या अनाहत नादात बियाट्रीचे तमाससाठीचे अनावर हुंडके विरत जातात.
पूर्व तिमोरच्या बॅटी रेइस या दिग्दर्शिकेचा हा पूर्व तिमोरमधील पहिलावहिला चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाला आगळे महत्त्व तर आहेच; परंतु आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे प्रथम स्थान पटकावून त्याने नवा इतिहास घडविला आहे. सुदैवाने उभय दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेत्री या चित्रपटप्रदर्शनावेळी उपस्थित होत्या. त्यांना याचि देही याचि डोळा आपल्या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद अनुभवता आला. -आणि माझ्यासारख्या सामान्य चित्रपटरसिकाला ऐतिहासिक घटनांचे सामाजिक आणि लोकजीवनाच्या अनुषंगाने केलेल्या कलात्मक चित्रांकनाचा आंतरिक थरार अनुभवता आला.
पूर्व तिमोरच्या धगधगत्या मुक्तिसंग्रामाची यशोगाथा