Home बातम्या तो राजहंस एक!

तो राजहंस एक!

0

 – विष्णू सूर्या वाघ

बालगंधर्वांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला तेव्हा त्यांचा पगार होता दरमहा पंचाहत्तर रुपये. १९१३ साली किर्लोस्कर कंपनी फुटली त्यावेळी त्यांचा पगार दरमहा दोनशे रुपयांवर गेला होता. त्यावेळच्या जीवनमानाप्रमाणे एवढा पगार चरितार्थ चालवायला पुरेसा होता. ‘मानापमान’ आणि ‘विद्याहरण’पासून बालगंधर्वांच्या भूमिकांची आणि गायनाची मोहिनी दिवसेंदिवस वाढत होती. १९११ सालच्या डिसेंबर महिन्यात बालगंधर्व, गणपतराव बोडस व शंकरराव मुजूमदार या तिघांकडे किर्लोस्कर नाटक कंपनीची मालकी आली. पण बालगंधर्वांना मालकीचा अधिकार गाजवण्यात कोणताही रस नव्हता. या परिस्थितीत शंकरराव मुजूमदार यांच्या विक्षिप्त व हेकट वागण्यामुळे किर्लोस्कर कंपनीतील बेबनाव वाढत गेले व १९ जून १९१३ रोजी गोविंदराव टेंबे, गणपतराव बोडस व बालगंधर्व यांनी कंपनीतून बाहेर पडत असल्याची नोटीस दिली. एक महिन्यानंतर हे तिघेही कंपनीला सोडचिठ्ठी देणार होते. त्याआधी ५ जुलै रोजी पुण्याच्या बुधवारपेठेतील ढमढर्‍यांच्या बोळातली माळ्याची धर्मशाळा भाड्याने घेऊन पुष्य नक्षत्रावर सायंकाळी साडेपाच वाजता नव्या नाट्यसंस्थेचा नारळ फोडण्यात आला. नव्या नाट्यसंस्थेची मालकी बालगंधर्व, गोविंदराव व गणपतराव यांच्याकडे असावी असं ठरविण्यात आलं. या नव्या कंपनीला ‘न्यू किर्लोस्कर नाटक मंडळी’ असं परंपरादर्शक नाव द्यावं अशा सूचना अनेकजणांकडून आल्या होत्या.

परंतु अखेर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी सुचवलेलं नाव सर्वांनाच पसंत पडलं व तेच मान्य करण्यात आलं. हे नाव होतं- ‘गंधर्व नाटक मंडळी.’
१९१३ सालच्या सप्टेंबर महिन्याच्या तीन तारखेला मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरमध्ये गंधर्व नाटक मंडळीचे पहिले नाटक ‘मूकनायक’ सादर झाले. या पहिल्याच प्रयोगाला उदंड प्रतिसाद मिळाला. गंधर्व नाटक मंडळी तशी नवीनच होती व काही जुन्या नाटकांचे हक्क किर्लोस्कर मंडळीकडे होते. देवलांची ‘शापसंभ्रम’, ‘मृच्छकटीक’ व ‘शारदा’ ही नाटकं गंधर्व मंडळीच्या हातचीच होती. बालगंधर्वांनी तात्यासाहेब कोल्हटकरांची भेट घेऊन ‘गुप्तमंजूष’, ‘मूकनायक’ व ‘प्रेमशोधन’ या नाटकांची परवानगी मिळवली. अण्णासाहेब किर्लोस्करांची नाटकं करायला परवानगीची गरज नव्हती. कारण अण्णासाहेबांनी नाटकांचे अधिकार सर्वांना बहाल करून टाकले होते. पण शंकरराव मुजूमदार यांनी कुठूनतरी कोलदांडा घातला व अण्णासाहेबांच्या नाटकांचे प्रयोग तुम्हाला करता येणार नाहीत अशी नोटीस बालगंधर्वांना पाठवली. खाडिलकरांच्या नाटकांचे हक्क किर्लोस्कर मंडळीकडे होते, पण पैशांच्या देण्याघेण्यावरून शंकरराव व खाडिलकर या दोघांमध्ये कोर्टात वाद झाला. त्या वादाचा निकाल खाडिलकरांच्या बाजूने लागला व आपल्या ‘मानापमान’ आणि ‘विद्याहरण’ या दोन्ही नाटकांचे हक्क खाडिलकरांनी गंधर्व नाटक कंपनीला देऊन टाकले. पुढील दोन वर्षांत मुंबई, बडोदा, इंदूर, औरंगाबाद, पुणे, जळगाव, नागपूर, अमरावती, यवतमाळ, नाशिक या भागांत कंपनीचा दौरा चालला. दरम्यानच्या काळात ‘शाकुंतल’, ‘रामराज्यवियोग’, ‘सौभद्र’ ही किर्लोस्करांची नाटकं करण्याचेही अधिकार मिळाले. गोविंद बल्लाळ देवलांचे ‘फाल्गुनराव’ हे जुने गद्य नाटक संगीताचा साज चढवून ‘संशयकल्लोळ’ या नावाने रंगभूमीवर अवतरले आणि त्याने लोकप्रियतेचा कळस गाठला.
‘संशयकल्लोळ’ हे वास्तविक एका इंग्रजी नाटकाचा आधार घेऊन लिहिलेले नाटक. पण देवलांनी त्याचं इतकं बेमालूम रूपांतर केलं की ते शंभर टक्के अस्सल मराठी वाटावं. १९१६ सालच्या नोव्हेंबर महिन्यात गंधर्व मंडळीने ‘संशयकल्लोळ’चे प्रयोग मुंबईला केले तेव्हापासून त्या नाटकाला लाभलेला रसिकांचा प्रतिसाद उत्तरोत्तर वाढत गेला. गंधर्व मंडळीच्या या नाटकात आश्‍विनशेठ (पेठकर), फाल्गुनराव (बोडस), रेवती (बालगंधर्व), कृत्तिका (सदाशिवराव रानडे) यांच्या भूमिका होत्या. नाटक जरी जुनं असलं तरी नव्या सजावटीत ते रंगमंचावर आल्यामुळं गंधर्व कंपनीचं हे पहिलं नवीन नाटक होतं असं म्हणता येईल.
‘संशयकल्लोळ’पाठोपाठ गंधर्व मंडळीचं ‘स्वयंवर’ हे नाटक रंगभूमीवर आलं. या नाटकाचा पहिला प्रयोग १० डिसेंबर १९१६ रोजी मुंबईतच झाला. ‘स्वयंवरा’त रुक्मिणीची मुख्य भूमिका होती अर्थातच बालगंधर्वांची आणि कृष्ण बनले गणपतराव बोडस. भीष्मक (जगन्नाथबुवा पंढरपूरकर), रुक्मी (पेठकर), महाराणी (रघुवीर सावकार), स्नेहलता (रानडे), दिनेश्‍वर (देवधर) अशी पात्रयोजना त्यात होती. हे नाटक अतिशय लोकप्रिय झालं. रुक्मिणीच्या भूमिकेला खाडिलकरांनी अधिक प्राधान्य दिल्यामुळं स्वतःच्या हिमतीवर संपूर्ण नाटक पेलून धरण्याचा आत्मविश्‍वास गंधर्वांना याच नाटकापासून प्राप्त झाला. नाटकातल्या चाली भास्करबुवांनी दिल्या होत्या. भास्करबुवांना रंगभूमीवरील संगीताची पूर्ण जाणीव होती. त्यामुळं पदांच्या चालीत किंवा गायकीत अजिबात रुक्षता येणार नाही याची दक्षता त्यांनी पुरेपूर घेतली. बैठकीतल्या गायकी चालींवर त्यांनी रचलेली पदं इतकी लोकप्रिय झाली की ‘गंधर्वांशिवाय नाटकच पाहायचं नाही!’ असं म्हणणारा उच्चभ्रूंचा एक वर्गच मुंबईत निर्माण झाला.
जवळजवळ एका महिन्याच्या अवधीत गंधर्व मंडळीची ‘संशयकल्लोळ’ आणि ‘स्वयंवर’ ही दोन्ही नाटकं अतोनात लोकप्रिय झाल्यामुळं बालगंधर्वांची कीर्ती अखिल मराठी जगतात पसरली. दोन्ही नाटकांची यशस्विता हा खरं तर एक चमत्कारच होता. रेवती आणि रुक्मिणी या भिन्न प्रवृत्तीच्या, भिन्न स्वरूपाच्या भूमिका बालगंधर्वांनी सारख्याच ताकदीनं करून दाखवल्यामुळं गायक आणि नट या दोन्ही दृष्टिकोनातून त्यांना पराकाष्ठेची लोकप्रियता मिळाली. या वर्षापासून बालगंधर्वांसंबंधीचा कौतुकाचा काळ संपला आणि आदरयुक्त भक्तीचा काळ सुरू झाला. रसिक प्रेक्षक एका आंधळ्या श्रद्धेनं बालगंधर्वांकडे पाहू लागले. बालगंधर्व करतील तोच अभिनय आणि गातील तेच गाणे असं समीकरण रसिकांच्या मनात निर्माण झालं.
देवल आणि खाडिलकर यांची नवी नाटकं रंगभूमीवर आणल्यानंतर गंधर्व नाटक मंडळीला नव्या नाटककारांची गरज प्रकर्षानं भासू लागली. देवल-खाडिलकरांच्या तोडीचे दोनच नाटककार त्याकाळी हयात होते. पहिले, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि दुसरे, राम गणेश गडकरी!
श्रीपादराव कोल्हटकर हे तसे किर्लोस्कर नाटक मंडळीचे जुने नाटककार. गडकरी मात्र रंगभूमीवर नव्यानेच आले होते. ‘प्रेमसंन्यास’ व ‘पुण्यप्रभाव’ या नाटकांमुळे त्यांचा बोलबाला होऊ लागला होता. भाषावैभवाची संपन्न देणगी लाभलेला प्रतिभासंपन्न नाटककार म्हणून गडकर्‍यांचे नाव आघाडीच्या नाटककारांसोबत घेतले जात होते. वास्तविक गडकरी व बालगंधर्वांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र किर्लोस्कर मंडळीतून बालगंधर्व फुटून गेले याचा राग गडकरींच्या मनात होता. दोनतीन वर्षं उलटल्यानंतर हा राग बर्‍याच अंशी मावळला.
एकदा अशीच बालगंधर्व व गणपतराव बोडस आणि गडकरी यांची भेट झाली. बोडस व बालगंधर्व यांनी नाटकाचा विषय काढला तेव्हा गडकरी म्हणाले- ‘‘नारायणराव, मी नाटक लिहून देईन, पण माझ्या नाटकात तुम्हाला फाटकं लुगडं घालून दळावं लागेल. आहे कबूल?’’
बालगंधर्वांचा उंची कपड्यांचा षोक गडकर्‍यांना माहीत होता. फाटकं लुगडं नेसून बालगंधर्व कसले दळायला कबूल करणार असा अंदाज त्यांनी केला असावा. पण बालगंधर्वांनी तो सपशेल खोटा ठरवला. क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले- ‘‘फाटकं लुगडंच काय, पण गोणपाट नेसूनसुद्धा मी काम करायला तयार आहे- पण नाटक तुमचं पाहिजे!’’ गंधर्व नाटक कंपनीसाठी ‘एकच प्याला’ लिहिण्याचा संकल्प गडकरींनी त्याच बैठकीत सोडला.
सांगितल्याप्रमाणे गडकरींनी काही महिन्यांनंतर ‘एकच प्याला’ नाटकाचा गद्य भाग लिहून दिला. पण तेवढ्यात कफ व क्षयाच्या आजाराने त्यांची प्रकृती ढासळली. नाटकाचा पहिला प्रयोग १९१९ सालच्या फेब्रुवारी महिन्यात बडोद्याच्या महाराजांसमोर करायचा असं ठरलं होतं. तालमींनाही सुरुवात झाली होती. गणपतराव बोडस (सुधाकर), बालगंधर्व (सिंधू), पंढरपूरकरबुवा (रामलाल), मा. कृष्णराव (शरद), देवधर (तळीराम), रानडे (गीता) व महादेव अभ्यंकर (पद्माकर) अशी पात्रयोजना झाली, पण नाटकाची तारीख जवळ येत चालली तरी गडकर्‍यांची प्रकृती सुधारण्याची लक्षणे दिसेनात. शेवटी गडकर्‍यांनीच निरोप पाठवला की ‘बडोद्याचा प्रयोग ठरल्याप्रमाणे करा. माझे मित्र वि. सि. गुर्जर हे तात्पुरती पदे लिहून देतील. ती या प्रयोगात वापरा. मी बरा झालो की कायमस्वरूपी पदे लिहून देईन.’
दुर्दैवाने तो दिवस कधीच उगवला नाही. १९१९ रोजी २३ जानेवारीला गडकरी वारले. साधारणतः महिन्याभराने, २० फेब्रुवारी रोजी नाटकाचा शुभारंभी प्रयोग बडोद्यात झाला. त्यानंतर कंपनीनं मुंबई गाठली व अक्षरशः इतिहास घडवला. कोणतीही मनोरंजनात्मक मूल्ये नसलेलं, गंभीर धाटणीचं, प्रेक्षकांना सुन्न करणारं हे शोकपर्यवसायी नाटक प्रेक्षकांनी नुसतं स्वीकारलं असं नाही तर डोक्यावर घेतलं. फाटकं लुगडं नेसून दळणार्‍या बालगंधर्वांची सिंधूही त्यांनी मनापासून मानून घेतली. गडकर्‍यांनी बालगंधर्वांना ज्या फाटक्या लुगड्याची भीती घातली होती- त्या लुगड्याला महावस्त्राची शोभा प्राप्त झाली. राजविलासी कापडांपेक्षा आपल्या अभिनयाचं वैभव अधिक आहे हे बालगंधर्वांनी ‘एकच प्याला’मधून सिद्ध केलं.
‘एकच प्याला’तील चाली श्रुतिमनोहर, रसाळ व नवीन तर्‍हेच्या होत्या. या नाटकातील गंधर्वांच्या बहुतेक चाली सुंदराबाईंनी दिल्या होत्या. सुंदराबाईंच्या गाण्याची छाप त्यावेळी नारायणरावांवर विशेष पडली. कवाली, दादरे, गझल या गायकीचा अस्सल गानप्रकार बालगंधर्वांच्या कंठातून बाहेर पडू लागला. ‘कशि या त्यजू पदाला’, ‘सत्य वदे वचनाला’, ‘प्रभु अजि गमला’ ही गाणी विशेष लोकप्रिय झाली. सिंधूच्या भूमिकेचं आणि ‘एकच प्याला’मधील शोकात्म नाटकाचं रहस्य बालगंधर्वांनी आधीच ओळखलं होतं. त्यामुळं त्यांनी आपली भूमिका इतकी अप्रतिम वठवली की त्यांची प्रत्येक हालचाल, प्रत्येक शब्दोच्चार आणि प्रत्येक सूर त्या शोकात्मिकेची छाया अधिक गडद करून जात होता. प्राणसंकटातही निष्ठेला ढळ पोचू न देणार्‍या सिंधूची हृदयद्रावक व्यक्तिरेखा बालगंधर्वांनी केवळ पेलली नाही तर कमालीच्या कौशल्यानं वठवली. दुर्दैव एवढंच की बालगंधर्वांचा हा अपूर्व कलाविलास पाहायला गडकरी हयात नव्हते.
गंधर्व नाटक कंपनीनं याआधी केलेली नाटकं कल्पनारम्य, भव्योदात्त होती. त्या तुलनेत ‘एकच प्याला’ हे वास्तवप्रधान नाटक होतं. बालगंधर्वांची नाटकं पाहायची सवय झालेल्या प्रेक्षकांच्या अभिरूचीला न मानवणारं हे नाटक- पण बालगंधर्वांच्या कलेनं तेही स्वीकारार्ह केलं. ‘मानस का बधिरावे’, ‘अजि लागे हृदयी हुरहूर’, ‘सत्य वदे वचनाला नाथा’, ‘असे पती देवचि ललनांचा’ इत्यादी त्यांची गाणी प्रेक्षक समरस होऊन ऐकत. ‘बघु नको मजकडे’सारख्या गीताच्या श्रवणाने त्यांच्या डोळ्यांतून खळखळा पाणी वाहू लागे. ‘चंद्र चवथीचा’सारखे स्त्रीगीत असो की ‘प्रभु अजि गमला’मधील अंतर्‍याचा श्‍लोक असो, बालगंधर्वांचे स्वर प्रत्येक शब्दाला कारुण्याने भिजवून टाकीत.
‘एकच प्याला’त गडकरींनी फाटकं लुगडं नेसायला लावलं, पण त्याची भरपाई बालगंधर्वांनी पुढच्या नाटकातून केली. खाडिलकरांचं ‘द्रौपदी’ हे नवीन नाटक त्यांनी करायला घेतलं. या नाटकात मयसभा होती. द्यूतसभा होती, कौरव आणि पांडव होते, राजसूय यज्ञानंतरचं पांडवांचं वैभव होतं. प्रमुख भूमिकांत बालगंधर्व (द्रौपदी), पंढरपूरकरबुवा (दुर्योधन) आणि मास्तर कृष्णराव (भानुमती) होते. भास्करबुवा बखले यांच्या चाली होत्या. कोल्हापूरचे चित्रमहर्षी बाबुराव पेंटर यांचे देखावे व सीन-सीनरी होती. सर्व पात्रांसाठी हजारो रुपये खर्चून भरजरी कपडे व मुकुट-आभूषणे बनवून घेण्यात आली होती. हार्मोनिअमच्या जागी ‘ऑर्गन’ची स्थापना करण्यात आली होती आणि ऑर्गनच्या जोडीला दोन सारंगियांना बसवण्यात आलं होतं. त्यातले एक होते त्याकाळचे गाजलेले सारंगीवादक उस्ताद कादरबक्ष! असं म्हणतात की या नाटकाच्या निर्मितीसाठी गंधर्व कंपनीनं त्याकाळी जवळजवळ सत्तर हजार रुपये खर्च केले होते! अफाट मेहनत घेऊन आणि बक्कळ पैसा खर्चून केलेलं हे नाटक तुफान धंदा करील याविषयी बालगंधर्वांच्याच नव्हे तर कोणाच्याही मनात कसलीच शंका नव्हती. पण…
नियतीचा खेळ फार विचित्र असतो. गाजावाजा करून रंगमंचावर आणलेल्या या नाटकाकडे प्रेक्षकांनी मात्र पूर्णपणे पाठ फिरवली. पहिला प्रयोग हाउसफुल्ल झाला खरा, पण प्रेक्षकांनी जो थंडा प्रतिसाद दिला त्यावरून नाटक तग धरणे कठीण आहे याची प्रचीती प्रत्येकाला आली. या नाटकामुळे गंधर्व कंपनीला प्रचंड कर्ज झाले. कंपनीतही फाटाफुटीची लागण झाली व गंधर्व कंपनीच्या अस्ताची वाटचाल सुरू झाली.
चवथ्या कालखंडात बालगंधर्व यांच्या अभिनयाचं स्वरूप आणि गायकीचा ढंगही बदललेला आढळतो. या काळात त्यांच्यावर मा. कृष्णराव यांच्या गायकीचा बराच प्रभाव पडला. ‘आशा-निराशा’, ‘नंदकुमार’, ‘विधिलिखित’, ‘मेनका’, ‘कान्होपात्रा’, ‘सावित्री’, ‘अमृतसिद्धी’ इत्यादी नाटकांची निर्मिती गंधर्व नाटक मंडळीनं या काळात केली. त्या सर्व नाटकांना मा. कृष्णराव यांचंच संगीत होतं. ‘विधिलिखित’मधल्या काही गोड चाली कंपनीतील सारंगीवाले खानसाहेब कादरबक्ष यांनी दिल्या होत्या. ‘आशा-निराशा’ व ‘मेनका’तील मास्तरांच्या काही चाली अतिशय लोकप्रिय झाल्या. ‘आशा-निराशा’मधील ‘मान्य कांत वरिला’, ‘तात करी दुहिताविनाश’, ‘नंदकुमार’मधील ‘तिमीर पटल’, ‘त्याग भाग’, ‘मेनका’मधील ‘भक्तिभाव हा घ्या सेवा’, ‘भूषण संसारा’, ‘नच देहा विसरले’, ‘प्रियकर वश मजला’ ही गाणी लोकप्रिय झाली, पण यातली बरीचशी नाटकं रंगमंचावर ‘फ्लॉप’ गेल्यामुळं लोक हळूहळू त्यातली गाणीसुद्धा विसरून गेले.
मास्तर कृष्णराव हे तसे बखलेबुवांचेच शिष्य होते. त्यांच्या गाण्याची छाप बालगंधर्वांवर पडणे स्वाभाविक होते. मास्तरांच्या काही काही मधुर व चपळ हरकती ‘उगीच का कांता’, ‘भक्तिभाव हा घ्या’, ‘भूषण संसारा’, ‘नच देहा विसरले’ या पदांतून दिसत. परंतु मास्तरांच्या गळ्यातले काठिण्य व पुसटपणा टाकून स्वतःच्या गळ्याला पचेल तेवढाच भाग बालगंधर्वांनी घेतला. बालगंधर्वांच्या गळ्यातील मुरक्या व हरकती यांचा स्वच्छपणा व सुरेलपणा १९३२ सालापर्यंत कायम असल्यामुळे मास्तरांच्या त्याच जागा बालगंधर्वांच्या गळ्यातून जास्त मधुर, जास्त शोभिवंत, जास्त रसपूर्ण व स्वच्छ उतरत आणि कानांनाही गोड लागत. मास्तरांच्या गाण्यात जितकं वैचित्र्य होतं तितकाच त्यांचा गळा पुसट होत चालल्यामुळे त्यांच्या कित्येक हरकती प्रत्यक्ष ऐकू येण्याऐवजी त्यांच्या हातवार्‍यांवरूनच समजून घ्याव्या लागत. ‘विधिलिखित’ नाटकापासून सारंगिये कादरबक्ष यांच्या वादनाचा परिणाम बालगंधर्वांच्या गायनावर झाला. या नाटकातील ‘दिव्य देशकार्या’ व ‘का घातुक रुसवा’ या कादरबक्षांच्या दोन चाली अत्यंत मधुर व नावीन्यपूर्ण होत्या. काही गाण्यांतील पंजाबी ढंगाच्या व अवघड मुरक्या बालगंधर्वांच्या गळ्यातून काढण्याचा कादरबक्षांनी कसोशीनं प्रयत्न केला. दररोज ते सारंगी घेऊन बालगंधर्वांसोबत बसायचे व सारंगीवर वाजवून अवघड जागांची तालीम द्यायचे. असं म्हणतात की एका पदाची तालीम त्यांनी बालगंधर्वांना तब्बल एक महिना दिली होती.
या काळात घडलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालगंधर्वांना मिळालेले ‘कान्होपात्रा’ हे नाटक. या नाटकातील भूमिकेमुळे बालगंधर्वांचे रूपांतर गायक नटामधून आक्रोश करणार्‍या भजनी वारकर्‍यांत झाले. ‘कान्होपात्रा’तील रसाळ अभंग व भजने बालगंधर्व रंगभूमीवर अतितल्लीन होऊन गातच असत, पण कंपनीच्या बिर्‍हाडी किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी भजनाचा फड उभा करून तासन्‌तास गात बसत! भजनाच्या या सततच्या आक्रोशामुळे त्यांच्या गळ्यावर विलक्षण ताण येऊ लागला. तशात कुणीतरी त्यांना सांगितलं की जागरणामुळं होणारी उष्णता थंड पाण्यानं घालवता येते. गंमत म्हणजे लहरी बालगंधर्वांना हा उपाय पटला व त्यांनी तो ताबडतोब अंमलातही आणला. बर्फाळ पाण्याचं सेवन आणि थंड पाण्याची आंघोळ अशी दुरेही मात्रा दिल्यानंतर जे व्हायचं तेच झालं. बालगंधर्वांचा आवाज साफ बसला. शर्थीने खूप आराधना केल्यावर तो किंचित सुधारला, पण पूर्ववत झालाच नाही. मग पुन्हा कर्जाचा डोंगर छाती दडपू लागला. ‘सावित्री’, ‘कान्होपात्रा’, ‘अमृतसिद्धी’ अशी नवी नवी नाटके करून पाहावी, पण मोडला डाव पुन्हा सावरूच नये असे झाले. चित्रपटांचे युग आता स्थिरावत चालले होते. १९३४ मध्ये प्रभात कंपनीशी करार करून ‘धर्मात्मा’ चित्रपटात बालगंधर्वांनी एकनाथाची भूमिका केली. पण तिथंही आवाजानं दगा दिला. शेवटच्या भैरवीखेरीज बालगंधर्वांचं एकही गाणं रंगत निर्माण करू शकलं नाही. मग तो विषय तिथंच संपला. मग नाटकांचे पुन्हा प्रयोग, कधी पुरुषभूमिका, कधी संयुक्त खेळ असे १९५५ पर्यंत चालले. पण पहिल्या पर्वातली मजा या पर्वात नव्हती. आधिव्याधींचा पाश बळकट होत चालला. मनही अधिकाधिक भजन-पूजनात गुंगत गेलं. मध्यंतरी राष्ट्रपतींकडून सन्मानही झाला व महाराष्ट्र शासनानं मानधनही सुरू केलं. पण कशातच काही राम राहिला नव्हता. गंधर्व साम्राज्याचा कणा १९२१ साली कर्जानं मोडला होता. त्या धक्क्यातून गंधर्वांचे साम्राज्य नव्याने उभेच झाले नाही. अधूनमधून सुखाचे क्षण आले, पण ते वैभव, तो दिमाख, ते यशाचे तेजोवलय, तो कलेचा नित्यनूतन जिवंतपणा पुन्हा कधीच दृष्टीला पडला नाही. मराठी रंगभूमीच्या ऐन ऐश्‍वर्याचा काळ बालगंधर्वांनी घडवला आणि उपभोगला. आपल्या नाटकांवर त्यांनी अक्षरशः लाखो रुपये मिळवले व नाटकासाठीच ते खर्च केले. पण आयुष्याचा उत्तरकाळ मात्र विपन्नावस्थेत गेला. ३१ डिसेंबर १९३४ रोजी बालगंधर्वांनी आपल्या गंधर्व नाटक मंडळीचं विसर्जन केलं. पण नाटकात भूमिका करण्याचा परिपाठ त्यांनी नंतरच्या वीस वर्षांतही सोडला नाही. ‘एकच प्याला’, ‘स्वयंवर’ व ‘द्रौपदी’ या तीनच नाटकांत ते अखेर अखेर भूमिका करत असत. ५ मे १९५५ या दिवशी त्यांनी द्रौपदीची शेवटची भूमिका केली. स्थळ होतं नागपूर. यानंतर २२ मे १९५५ रोजी गडचिरोली येथे त्यांनी रुक्मिणीची अखेरची भूमिका केली. ‘एकच प्याला’ नाटकातील सिंधूची शेवटची भूमिका त्यांनी तुमसर या गावात ४ जून १९५५ या दिवशी केली. मराठी रंगभूमीवर ‘देवतास्वरूप’ सिंधूचं त्या दिवशी रसिकांना घडलेलं हे शेवटचं दर्शन! (क्रमशः)