पश्चिम नेपाळच्या एका टेकडीवर छोटे विमान आदळून झालेल्या अपघातात एकूण १५ ठार झाले. त्यांपैकी १३ भारतीय आहेत. वाचलेल्या सहा जणांपैकी तीन भारतीय आहेत. सात महिन्यांपूर्वीच नेपाळमधील एका विमान अपघातात दहा भारतीय पर्यटक ठार झाले होते.
काल सकाळी ९.४५ वा. पर्वतीय शिखरांचे हवाई दर्शन घडविण्यासाठी पोखरा येथून गेलेले अग्नी एअर – २० हे विमान जॉमसॉम येथे कोसळले. त्यात १६ भारतीय, दोन डेनिश नागरीक व तीन विमानातील कर्मचारी होती.
दुर्घटनेत वैमानिक व सहवैमानिकाचाही अंत झाला. मरण पावलेले भारतीय हे प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मुक्तीनाथ मंदिराचा यात्रेसाठी गेले होते.
जॉमसॉम विमानतळ काठमांडूहून सुमारे २०० कि. मी. अंतरावर असून पर्वतरांगा कोरून बनविलेला असल्याने अतिशय सावधपणे विमान उतरवावे लागते असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान बाबूराम भट्टराय आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी या अपघाताबद्दल खेद व्यक्त केला आहे.
ज्या विमानाचे अपघात झाले ती पर्यटक आयोजक कंपनी नेपाळमधील ह्रदयंगम स्थळांचे हवाई दर्शन विमानाद्वारे घडविण्याचे काम करते.