एके काळचे शत्रू असलेल्या राम विलास पास्वान यांच्या मांडीस मांडी लावून काल येथील जाहीर सभेच्या व्यासपीठावर बसल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बिहार हे दहशतवाद्यांसाठी नंदनवन बनले असल्याची टीका केली. मुस्लिम मतदारांचा अनुनय करण्याच्या नादात राज्यातील दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यात बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार अपयशी ठरल्याची टीकाही मोदी यांनी केली.
लोकजनशक्ती पक्षाने भाजपाशी युती केल्यानंतर लोकजनशक्ती पक्षाचे नेते राम विलास पास्वान प्रथमच आपले पुत्र चिराग यांच्यासमवेत जाहीर व्यासपीठावर आले. देशाच्या राजकारणात आता दोन गट पडले असल्याचे पास्वान यांनी आपल्या भाषणात सांगितले. यापैकी एका गटाचे नेतृत्व आपले पक्ष करतात. तर दुसरा गट आहे तो मोदींचा रथ थांबविण्यासाठी उपाय शोधत आहे, असे ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी पास्वान यांची प्रशंसा केली. वैयक्तिक भेटींवेळी पास्वान यांनी आपल्या बरोबर छायाचित्र घेण्यास नकार दिला नाही असेही ते म्हणाले. नीतिश कुमार यांचे नाव न घेता बिहारचे मुख्यमंत्री ढोंगी असल्याचाही आरोप त्यांनी केला. गुजरातमधील दंगलींना मोदी कारणीभूत असल्याचा आरोप करून पास्वान २००२ साली केंद्रातील एनडीए सरकारमधून बाहेर पडले होते.