पोलीस खाते राजकीय हेतूने विरोधकांवर गुन्हा नोंद करीत आहेत. विरोधी आमदारांना बदनाम करण्यासाठी राजकारण्यांनी पोलिसांना हाताशी धरून गुन्हा नोंद करायला लावला, असे आमदार विजय सरदेसाई व आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेस यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
आमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगड फेकले नसून आमच्याकडे व्हिडीओ चित्रफित आहे. आपण शनिवारी रात्री ११.४५ वाजता कार्यक्रम बंद केला. तर मजूरमंत्री आयोजित शिकेरी येथील नृत्यरजनी पहाटे तीनपर्यंत चालू होती. पण पोलिसांनी तेथे काहीच केले नाही असा आरोप उभयतांनी केला. फातोर्डा एसपीडीए पिकप स्थानकावर शनिवारी फातोर्डा कार्निवाल बॅशमध्ये रात्रीचे बारावाजून गेल्यानंतरही कर्णकर्कश आवाजात संगीत सुरू ठेवल्याबद्दल आमदार विजय सरदेसाई, आलेक्स रजिनाल्ड लॉरेन्स यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. ही घटना ताजी असतानाच शिकेरी येथे नृत्य कार्यक्रम उशिरापर्यंत मोठमोठ्या ध्वनीक्षेपक चालू ठेवल्याने मडगाव पोलिसांनी डॉमनिक फुर्तादो व इतरावर गुन्हा नोंदवला आहे. दोन्ही ठिकाणी आयोजक व पोलीस यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. या दिवसात बारावी व दहावीच्या परीक्षा चालू असून रात्रभर चाललेल्या नृत्यरजनी व ऑर्केस्ट्रामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. अशा तक्रारी आहेत.