Home बातम्या तिमिरातून तेजाकडे …

तिमिरातून तेजाकडे …

0

डॉ. सोमनाथ कोमरपंत

आपल्या भारताची सांस्कृतिक परंपरा अतिशय समृद्ध आहे. सण उत्सव साजरे करणे हा भारतीयांच्या जीवनशैलीचा गुणविशेष. केवळ आनंद व्यक्त करणे हे त्यामागचे प्रयोजन नव्हे. परंपरेचे पालन करणे, तिच्यातील मूल्यसंस्कार पुन्हा एकवार जनमानसात रुजविणे आणि नव्या पिढीत तो संक्रमित करणे ही प्रेरणा त्यामागे असते. आनंदनिर्मिती आणि प्रबोधनक्रिया इथे हातांत हात घालून वावरत असतात. ही संथ प्रक्रिया असते, पण ती निरंतर चालू असते. म्हणून सहस्त्रावधी वर्षांच्या वाटचालीत आमच्यावर संकटे अनेक आली, सांस्कृतिक उत्पात झाले; पण आमची संस्कृती क्षय पावली नाही. ती सतत वर्धिष्णू राहिली, कारण तिची अंतःप्रेरणा आहे ः ‘‘अंधारातून मला प्रकाशाकडे घेऊन चल’’ या बीजमंत्राची. आपल्या आर्ष ग्रंथात तिचा स्पष्ट उच्चार झालेला आहे.

ॐ असतो मा सद्गमय

तमसो मा ज्योतिर्गमय

मृत्योर्माऽ मृतंगमय

असत्यातून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मृत्यूतून अमरत्वाकडे मला घेऊन चल. जिजीविषेचा कोंभ मनात तरारत राहिल्यामुळे संस्कृतिवृक्षाला नवोन्मेषशालिनी पालवी फुटत राहिली..त्याला सुवासिक फुले येत राहिलीफलभाराने तो वाकला; उन्मत्त कधी झाला नाही. ही सहजप्रेरणा त्याला कुणी दिली? त्याच्या सहोदर असलेल्या सृष्टीने. तिचे सान्निध्य हीच आमची प्रकृती आहे. म्हणून पूर्वसूरींना तिला प्रकृती म्हटले….निसर्ग म्हटले….महाकाव्याचे सर्ग येथे साकार होतात. त्याच्या विभ्रमांचा उत्सव साजरा करणे हा येथील माणसांचा स्थायीभाव आहे. सर्जनाचा सोहळा साजरा करणे, प्रकाशाचे पूजन करणे आणि ज्ञानाची दिवाळी साजरी करणे ही आमची उज्ज्वल परंपरा आहे. दरवर्षी नेमाने दिवाळी येत असली तरी दरवेळेला ती साजरी करण्याचा आनंद निराळा असतो. नव्या आशा आकांक्षांची आणि नव्या संकल्पांचीही ही दिवाळी असते. दीप हे प्रतीक आहे मांगल्याचेज्ञानाचेसंस्कृतिसंवर्धनाचे!

भारतवर्षात आश्‍विन वद्य द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत दिवाळीचा सण साजरा करण्याची पूर्वापार प्रथा आहे. पूर्वी आपल्याकडे गोपालन संस्कृती होती. म्हणून पहिला दिवस वसूबारस या नावाने साजरा व्हायचा. वसूबारस म्हणजे गोवत्सद्वादशी. या दिवशी एकाच रंगाची गाय आणि वासरू यांची पूजा केली जात असे. आता ती प्रथा काहीशी मागे पडत चाललेली आहे. पण ती साजरी करण्यामागची सांस्कृतिक महत्ता अधोरेखित व्हायला हवी.

दुसरा दिवस धनत्रयोदशीचा. गोमंतकात ग्रामीण परिसरात अजूनही हा दिवस आनंदाने साजरा करतात. संध्याकाळच्या वेळी विहिरीचे पूजन केले जाते. न्हाणीघरात पाणी तापविल्या जाणार्‍या जलकुंभाला झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या जातात. काकडीचा व भोपळ्याचा वेलही गुंफला जातो. एका परीने निसर्गातील जलतत्त्वाचे हे प्रतीकात्मक पूजन. आपण पाण्याला जीवन म्हणतो. जीवनात पाण्याचे महत्त्व काय हे सांगण्याची आवश्यकता नाही.

त्यानंतर येते नरकचतुर्दशी. दिवाळीच्या सणाला खर्‍या अर्थाने प्रारंभ या दिवशी होतो. नरकासुर या राक्षसाने पृथ्वीतलावर नरसंहार चालविला होता. स्त्रियांना बंदिवासात टाकले होते. भगवान श्रीकृष्णाने या दिवशी नरकासुराचा वध करून पीडित जनतेला मुक्त केले. म्हणून हा आनंददोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. मांगल्याने अमंगलावर मिळवलेला हा विजय. दीपोत्सवाने तो साजरा केला जातो. धनधान्य समृद्धीचे हे दिवस. या पार्श्‍वभूमीवर दिवाळीचा सण साजरा केल्यामुळे लोकांचा उत्साह द्विगुणीत होत असतो. आबालवृद्धांना पुष्टी आणि तुष्टी देणारा हा सण. गावागावांमध्ये, शहरांतून उत्साहाच्या वातावरणात नरकासुराची भव्य प्रतिमा तयार करून वाद्यांच्या गजरात ती सर्वत्र फिरवून तिचे दहन केले जाते. भल्या पहाटे माणसे उठून अभ्यंगस्नान करतात. उटणे लावले जाते. घरासमोर पणत्या लावल्या जातात. अग्रभागी आकाशदिवा लावला जातो. सूर्योदयापूर्वी सजलेली ही दीपमालिका पाहून पहाट प्रसन्न वाटायला लागते. नेत्रांचे पारणे फिटते. बालकमंडळी फटाके, फुलबाज्या लावण्यात व बाण उडविण्यात मग्न होते. दिवाळीचा आनंद तिच्या चेहर्‍यावर वाचावा. सारा आसंमत असा आनंदाने आणि चैतन्याने बहरून गेलेला असतो. गोमंतक, कारवार आणि कोकण येथे मुख्य दरवाज्यासमोर सुवासिनी घरातील माणसांना ओवाळतात. ती पायांखाली कारिटठेवून ते चिरडून टाकत असतात. मग गोडधोड खातात. अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते. व्यापारीवर्ग हा सण मोठ्या थाटात साजरा करतो. रात्री सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. सर्वत्र दीपरोषणाई केलेली असते.

कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी बलिप्रतिपदा साजरी केली जाते. या दिवशी श्री विष्णूने वामनाचा अवतार घेऊन बळीराजाला तिसर्‍या पावलात पाताळात पाठविले अशी आख्यायिका सांगितली जाते. कृषीसंस्कृतीच्या दृष्टीने या दिवसाला अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे. या दिवशी गुरांना कामाला जुंपायचे नसते. त्यांना सजविले जाते. झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या जातात. पूर्वी ग्रामीण परिसरात गुराख्यांच्या जीवनातील हा आनंदाचा दिवस असायचा. आता सर्वत्र शहरीकरणाचा प्रभाव असल्यामुळे हे चित्र पालटत चाललेले आहे. माणसे आणि गुरेवासरे यांच्यामधील जिव्हाळा कमी होत चाललेला आहे. माणसांचे भावविश्‍व बदलत चाललेले आहे. ‘कालाय तस्मै नमःअसे म्हणण्यावाचून आता गत्यंतर नाही.

विक्रम संवत्सराचा हा प्रारंभदिन असतो. व्यापार्‍यांच्या दृष्टीने हाही दिवस महत्त्वाचा मानला जातो.

कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी यमीने आपला भाऊ यम याला ओवाळले अशी आख्यायिका आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. भाऊ तिला द्रव्यवस्त्रालंकारादी ओवाळणी घालतो. बहीणभाऊ यांमधील जिव्हाळा वृद्धिंगत व्हावा हे यामागचे प्रयोजन. पूर्वीप्रमाणेच आजही हे बंध उत्कटतेने जोपासले गेले आहेत. बहीण आणि भाऊ यांच्या भावजीवनात या दिवसाचे महत्त्व आगळेवेगळे असते. अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती त्यांच्या अंतःकरणात उमलत असते. भारतीय जीवनप्रणालीत कौटुंबिक जिव्हाळा वाढविणारा हा दिवस आहे.

असा हा दिवाळीचा सण. पणत्या पेटवून परिसरातील बाह्य अंधःकार नाहीसा करणे एवढ्यापुरता त्याचा हेतू सीमित नाही. मानवी अंतःकरणातील अंधकार, जाळीजळमटे, अज्ञान, अनाचार आणि संकुचितता घालवून ते विशाल बनविणे हा त्यामागचा खरा उद्देश. ‘आपल्या आत्म्याचा विकास आपणच घडवून आणावा.’ असे गीतावचन आहे; पण तेवढ्याने आजच्या समाजधारणेत भागत नाही. ‘वसुधैवकुटुंबकमहा मंत्रही भारतीय संस्कृतीने आपल्याला शिकविलेला आहे. त्यामुळे दीनदुबळ्यांच्या अंतरंगातील अंधःकार नाहीसा करण्याचे उत्तरदायित्व आपल्यावर येऊन पडते याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. भारतासारख्या लोकशाही जीवनप्रणाली स्वीकारलेल्या राष्ट्राच्या संदर्भात ते अधिकच खरे आहे. आपल्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीत अनेकदा असमाधानाचा सल जाणवतो. तो घालविणे ही अग्रक्रमाची बाब आहे. समष्टीचे सुख हे खरे सुख. धार्मिक सणापेक्षा हा राष्ट्रीय सण.

दसरा दिवाळी हा आपल्या भारतीय सांस्कृतिक परंपरेतील इतरेतर द्वंद्वसमासनवरात्रापासून सुरू झालेल्या उत्सवाची सांगता होते ती विजयादशमीलास्नेहमय हातांनी सुवर्णवाटले जाते….सरस्वतीपूजनाचे हे दिवससर्जनशीलतेच्या देवतेचे, चौसष्ट कलांच्या देवतेचे पूजन करण्याची आपली डोळस परंपरा.

त्यानंतर कोऽ जागर्तिअसे पुकारत येणारी शरद पौर्णिमा….कोजागरी पौर्णिमा….वर्षाऋतूनंतरची पहिली पिठूर चांदण्याची पौर्णिमाकविमनातील उन्मेषून आलेल्या क्षणांचे चांदणे फुलविणारी पौर्णिमाअशी दीपमाला क्रमाक्रमाने निसर्गात….समाजमानसात साजशृंगार करीत येते.

अन् हा हा म्हणता म्हणता दिव्यांची आरास घेऊन येते ती दिवाळी. भारतीय संस्कृतीने हा दीपआमच्या हातात दिलेला आहे. दिवा लावणे ही कल्पना काव्यमय.. पण दिव्याने दिवा लावणे ही कल्पना त्याहून काव्यमय….दिवे अनेक प्रकारचे….अनेक विभ्रमांचे….पण पणतीतील दिवा पाहणे यासारखा आनंद दुसरा नाही. मातीचे आणि ज्योतीचे इतके निकटचे नाते अन्यत्र नाही. पार्थिवतेत वास करून अपार्थिवतेचे संपन्न लेणे नेत्रनिर्वाण देण्यासाठी येथे तत्पर असते. अंतरात्म्याला उजळून टाकणारी हीच असते दिवाळी….हीच असते दिवाळीनिदिध्यासाने हृदयाशी जोपासावी अशी! तिची अंतःप्रेरणा असते तिमिराकडून तेजाकडे जाण्याची!