–विष्णू सूर्या वाघ
खरंच, दिवाळी आता पूर्वीसारखी राहिली नाही!
मला अजून आठवतात बालपणातल्या दिवाळीचे दिवस. दसरा संपला की दिवाळीची लगबग सुरू व्हायची. बायका पोहे कांडण्याच्या तयारीला लागायच्या. माझी आई त्यात आघाडीवर असायची. आमच्या अंगणात तब्बल आठवडाभर सबंध वाड्याचं कांडप व्हायचं. बायका भल्या पहाटे उठायच्या. एका प्रचंड मोठ्या टोपात भात उकडलं जायचं. ‘भात’ म्हणजे टरफलासकट तांदळाचे दाणे. अंगणाच्या मेरेपलीकडे चार–पाच चुली मांडलेल्या असायच्या. चुलीवर मातीची कुयणी. उकडलेला भात या कुयण्यात टाकून कडक बनवला जायचा. मग त्याची रवानगी व्हायची ती थेट लाकडी वायनात. वायन म्हणजे उखळ. वायनातल्या गोट्यांवर धबाधब लयबद्ध तालात मुसळाचे प्रहार पडायचे. फोलपटांचा भुसा व्हायचा आणि आतल्या लालबुंद गोट्यांचं रूपांतर लाल पिवळसर पोह्यांत व्हायचं. वायनांतून नुकतेच बाहेर पडलेले पोहे तुपात आसडल्यानंतर स्वच्छ व्हायचे. स्टीलच्या पेल्यात गुळाचा गरमागरम काळा चहा घालून त्यात दोन मुठी पोहे घालून फुगवणं आणि चिमूटभर साखरेची पखरण करून मिटक्या मारीत खाणं हा आम्हा बच्चे मंडळींचा आवडता टाइमपास.
त्या काळी पोहे घरीच कांडले जायचे. ज्यांना परिस्थितीमुळे पोहे कांडणं जमायचं नाही, त्यांच्या घरी आई पोहे पोचते करायची. शहरी भागात राहणार्या वडिलांच्या काही मित्रांनाही दर दिवाळीला आमच्याकडून घरचे पोहे पाठवले जायचे. डॉ. सावळो केणी, विष्णू कुर्डीकर, रामचंद्र नार्वेकर अशा काहीजणांच्या घरी पोहे देऊन येण्याची जबाबदारी माझ्यावर होती.
माझे वडील हे उत्तम नाट्यकलाकार तर होतेच, पण त्याचबरोबर एक उत्कृष्ट हस्तकारागीरही होते – कागदाची फुलं बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. धेंडलो, सप्ताह, इंत्रूजाची लालखी इत्यादींसाठी ते कागदी फुलांचे गेंद व वेली बनवीत असत. पुढे ही कला मी त्यांच्याकडून शिकलो. श्रावणाच्या दिवसात आमच्या माटवातलं केळीच्या गब्यांचं मखर वडील अत्यंत कलात्मक पद्धतीने सजवीत असत. दिवाळी जवळ आली की, ते आकाशदिवा बनवण्याच्या तयारीला लागायचे. विविध आकाराचे, विविध प्रकाराचे आकाशदिवे बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. मला आठवतं, एकदा त्यांनी रथाच्या आकाराचा प्रचंड मोठ्ठा आकाशदिवा बनवला होता. आकाशदिव्याला रंगीत कागद चिकटवण्याच्या कामात मी वडिलांना मदत करीत असे. मग तो आकाशदिवा एका उंचावर बांधलेल्या दोरीला टांगला जायचा. आमच्या गावात वीज तशी उशिराच आली. त्यापूवी आकाशदिव्यात शेणाची खोबणी करून पणत्या पेटवण्याची पद्धत होती. वीज आल्यानंतर पणत्यांची जागा बल्बनी घेतली.
दिवाळी साधारण आठवड्यावर आली की गावातली जाणती मंडळी नरकासूराच्या तयारीला लागायची. त्याकाळी नरकासूर वडिलधारेच बनवायचे. तोही संपूर्ण गावासाठी एकच. थोरल्या भाटात गावच्या अधिकृत नरकासूराशिवाय दुसरा नरकासूर दिसता कामा नये असा जणू दंडकच होता. एकदा आम्ही मुलांनी वात्रटपणा करून दुसरा नरकासूर बनवला तर भर मध्यरात्री गावातल्या जाणत्यानी आमचा शिव्यांनी उद्धार करीत त्याला अक्षरशः फाडून टाकले. तेव्हापासून नरकासूर बनवण्याच्या भानगडीत आम्ही पडलो नाही.
अंकुश वेर्णेकर हे आमच्या गावातले प्रसिद्ध चित्रकार, पेंटर अंकुश या नावानेच ते ओळखले जायचे. गावच्या नरकासूराचे ते प्रमुख शिल्पकार. मुखवटाही तेच बनवायचे. आताप्रमाणे थर्मोकोलचे नरकासूर बनवण्याची पद्धत तेव्हा नव्हती. नरकासूर बनवण्यासाठी सुकलेलं गवत किंवा करड वापरायचे. हात, पाय, पोटाला आकार देण्यासाठी गोणपाटाचं कापड वापरलं जायचं. ते नंतर दाभणानं शिवून घेत. नरकासूराचा संपूर्ण पोशाख रंगीत कागदापासून बनवला जायचा. त्याच्या एका हातात तलवार व दुसर्या हातात ढाल दिली जायची. दिवाळ पहाटेच्या मध्यरात्रीपर्यंत नरकासूराची सजावट चालूच असायची. मध्यरात्रीनंतर ढोल ताशांचा ‘कटर्र घण् कटर्र घण्’ कडकडाट सुरू व्हायचा. गावच्या एका बाजूने नरकासूराची मिरवणूक निघायची तर दुसर्या बाजूने कृष्णाची. कृष्ण पालखीत बसून यायचा. पूर्वी कृष्णाची मूर्ती चिकणमातीपासून बनवीत व दिवाळीनंतर तिचे विसर्जन करीत. नंतर लाकडाची कायमस्वरूपी मूर्ती बनवण्यात आली. नरकासूरासाठी घणचे कटर तर कृष्णासाठी टाळ मृदंगाचं भजन. कृष्णाच्या पक्षात सारे म्हातारे कोतारे, तर नरकासूराच्या सैन्यात सगळे तरणेताठे. गावच्या मधोमध राममंदिराजवळ साधारण पाच वाजण्याच्या सुमाराला नरकासूर व कृष्ण आमने – सामने यायचे. अर्धा तास उभय गटांची धुमश्चक्री चालायची. नरकासूराला आग लावली जायची. नरकासूराला जाळल्यानंतर सगळे लोक घरी परतायचे आणि उंबर्यासमोर उभं राहून पायाच्या अंगठ्याखाली कारीट ठेचून फोडायचे. नंतर उटण्या–बिटण्यानं आंघोळ करून आईनं बनवलेल्या सात–आठ प्रकारच्या पोह्यांवर ताव मारला की झाली दिवाळी!
बालपणातल्या दिवाळीचे ते दिवस खरंच मंतरलेले होते. दिवाळीच्या तिसर्या दिवशी पाडवा यायचा. पाडव्याला आई जाडजूड पोळे बनवायची. ते पोळे आम्ही गोठ्यातल्या गुरांच्या गळ्यात नेऊन बांधायचो. रंगीत पिठाची वर्तुळं त्यांच्या पाठीवर काढायचो. झेंडूची फुलं ओवून त्या माळा त्यांच्या गळ्यात घालायचो. वडील गायींची पूजा करायचे. दुपारी धेंडल्याची मिरवणूक निघायची. ‘धे धेंडलो धेंडल्या पावस शेणलो’ असं म्हणत वाजत गाजत धेंडलो गावातून फिरायचा. ‘शेरभर तांदूळ एक नाल्लो, आरोवभर तांदूल दोन नाल्लो’ अशी तारस्वरातली साद दिली की घरातली कारभारीण शेरभर तांदूळ घेऊन यायची व आमच्या पिशवीत टाकायची. काहीजण नारळ द्यायचे, तर काहीजण गूळ. घराघरातून मिळालेल्या या धान्यांचं त्या त्या माटवात गोडसं शिजवंल जायचं. गोडशाचा महाप्रसाद नंतर सर्वांना वाटला जायचा.
मला आठवतं, दिवाळीच्या त्या दिवसांत प्रचंड थंडी असायची. अनेकवेळा रस्त्याकडेला शेकोट्या पेटवून लोक ऊब घेत बसलेले असायचे. नरकासूराच्या रात्री आम्ही मुलं सायकली घेऊन पिलार, मेरशी, कालापूर, करमळी इत्यादी गावांत भटकायचो व तिथले नरकासूर बघून यायचो. कधीकधी दिवाळीला पाऊसही पडायचा.
आता सगळंच हवामान बदललं आहे. अंगातून घामाच्या धारा वाहवणार्या ‘ऑक्टोबर हीट’चा सामना करीत हल्ली दिवाळी साजरी करावी लागत आहे. हवामानाचंच नव्हे तर दिवाळीचं एकूण सामाजिक पर्यावरणच बदलेलेलं आहे. पोहे कांडण्याचा जमाना कधीच संपला. कितीतरी जणांनी घरातली मुसळं कापून–फोडून सरपणात घातली. आता प्लास्टीकच्या पॅकेटमधले पोहे घरोघरी आणले जातात. नशीब, अजून पोहे कालवण्याची पद्धत शाबूत आहे. पुढंमागं बाजारातून थेट कालवलेले पोहे आणण्याचीही पद्धत रूढ होईल, कुणास ठाऊक!
जी गत पोह्यांची, तीच आकाशदिव्यांची. आता मुलांना आकाशदिवे बनवण्यात रस नाही. बाजारातून तयार आकाशकंदील आणले जातात. आता तर थेट चीनमधून आयात केलेल्या आकाशदिव्यांचा जमाना आहे. काराट्यांच्या पणत्या इतिहासजमा झाल्या. आता मेणाच्या पणत्या आल्या.
पूर्णपणे बदललेल्या या काळात खरी बरकत आली ती मात्र नरकासूरांना. दिवाळी हा नरकासूरांचाच उत्सव आहे की काय असे वाटण्याइतपत हल्ली दिवाळीचे वातावरण नरकासूरमय असते. शहरातल्या प्रत्येक सोसायटीत, प्रत्येक कॉलनीत एक–दोन नव्हे तर दहा–दहा नरकासूर बनवले जातात. नरकासूरांच्या प्रचंड मोठ्या स्पर्धा होतात. लाखो रूपयांची बक्षिसे नरकासूरांवरून ओवाळून टाकली जातात.
तरूणांचा बहुतेक वेळ आताशा नरकासूर बनवण्यात जातो. गावातील वाड्या–वाड्यावर स्वतंत्र नरकासूर उभा होतो. त्यासाठी आमदार–मंत्र्याकडून भरपूर देणग्या उकळल्या जातात. असे म्हणतात की, एकट्या ताळगाव मतदारसंघात एक राजकारणी दर नरकासूरामागे पंचवीस हजार रूपये देतो. या पंचवीस हजारांच्या आशेने दरवर्षी त्याच्या मतदारसंघात नरकासूरांची संख्या वाढत चालली आहे म्हणे!
यंदाच्या दिवाळीत दाबोळी मतदारसंघात निवडणूक लढवू पाहणार्या एका प्रस्थापित राजकारण्याने आपल्या एका वॉर्डमध्ये नरकासूराला तब्बल एक लाख रूपयांचे डोनेशन दिले. पोरांना आणखी काय हवं? नरकासूर बनवायला वीसेक हजार लागतील. बाकीचे चिकन–मटण–दारूत जातील. ‘चिकन–मटण–सोरो–आमचो उमेदवार बरो’ ही निवडणूक प्रचाराची पंचलाईन बनेल.
राजकारण्यांच्या सुदैवाने नरकासूर निर्माण करायला आता पूर्वीसारखी दिवाळीचीही आवश्यकता राहिलेला नाही. नरकासूरांचे उत्पादन बारमाही चालूच असते. वास्को ते वाळपईपर्यंत आणि पेडणे ते काणकोणपर्यंत रोज नवे नवे नरकासूर उभे राहतायत. नावेली, ताळगाव, सत्तरी अशा भागात तर नरकासूरांची उंची आभाळाला जाळून भिडली आहे. त्यांच्या भक्तगणांची संख्याही बेसुमारपणे वाढली आहे. यातले काही नरकासूर पृथ्वीचे लचके तोडण्यात वाकबगार आहेत. काही नरकासूरांना सिमेंट, खडी, कॉंक्रिटच्या बळावर नोटा खायची सवय झाली आहे. काहीजणांना हिरवे हिरवे डोंगर अलगद घशात घालण्याची चटक लागली आहे. काही नरकासूर रस्त्यावरून धावणार्या वाहनांना चटकमटक करून नाकातून पैशाचा धूर सोडताना दिसत आहेत. काही नरकासूर असेही आहेत की जे पाहता पाहता सरकारी गोदामातील स्वस्त धान्याच्या पोत्या फस्त करून टाकीत आहेत. प्रत्येक नरकासूराचे रूप वेगळे, वैशिष्ट्ये वेगळी, कारनामे वेगळे!
या सगळ्या गदारोळात कुठं बरं आहे आपला श्रीकृष्ण?
खेळण्यातल्या घिरघिर्यासारखं हातातलं सुदर्शन चक्र उगाचच गरागरा फिरवीत बिचारा श्रीकृष्ण हताशपणे नरकासूरांचा धूमाकूळ पाहात मुकाट्याने उभा आहे. या सगळ्या नरकासूरांचा सामना एकाचवेळी करणं आपल्या आवाक्याबाहेरचं आहे या कटू सत्याची जाणीव त्याला कधीच झाली आहे. कृष्णाला आपण कुटिल नीताचा जनक मानतो. पण सध्याचे नरकासूर कुटिल नीतीत कृष्णापेक्षा कितीतरी योजनं पुढे आहेत. कृष्णाच्या प्रजेलाही त्यांनी आपल्या बाजूने फितवलं आहे. कृष्ण अक्षरशः एकटा पडलाय.
या परिस्थितीतून कसली दिवाळी साजरी करणार आहोत आपण? कसले आकाशदिवे चढवणार आहोत आकाशात? कुठल्या तोंडानं म्हणणार आहोत ‘तमसो मा ज्योतिर्गमय?’
पणजीच्या मार्केटमधून परवा जात होतो. दोन–तीन दुकानांत विक्रीसाठी मांडून ठेवलेले नरकासूरांचे मुखवटे दिसले. बालपणींचा नरकासूर आठवला. गावठी पद्धतीनं बनवलेल्या त्या मुखवट्यावर क्रौर्याचा लेप असायचा. तो पाहूनच भीती वाटायची. आता काळ बदलला. नरकासूरांचे मुखवटे आता भीतीदायक वाटत नाहीत. ते ‘फ्रेंडली’ वाटतात. मनं निबर होत जाणार्या आजच्या या जमान्यात नरकासूर हा आपल्याच घरचा माणूस असल्यासारखा वाटतो. परवा दुकानात ते मुखवटे पाहिले आणि नकळत गजलेच्या या ओळी ओठांवर आल्या.