– दिलीप बोरकर
माणसाला किती जमिनीची आवश्यकता आहे? या प्रश्नाला खरं म्हणजे उत्तरच नाही. या पृथ्वीवर येताना काही एक न घेता येणारा आणि जाताना काही एक न घेता जाणारा माणूस आपल्या जन्म ते मृत्यू यामधील अत्यल्प प्रवासात जमेल तेवढी जमीन आपल्या नावावर करून घेण्यासाठी धडपडत असतो. ज्यांच्याकडे चतकोरही जमिनीचा तुकडा नाही, त्यांच्याकडे कधी कधी जमीनविषयक तत्त्वज्ञान ऐकू येते. त्यांच्या मतानुसार माणसाला तीन फूट रुंद आणि सहा फूट लांब जमिनीची आवश्यकता भासते.
ऐकण्यासाठी ही तत्त्वज्ञानरूपी मुक्ताफळे गोड लागली, तरी व्यवहारात एवढ्यासुद्धा जमिनीची माणसाला मुळात गरजच नसते. विद्युतदाहिनींच्या आजच्या युगात फक्त हिंदुधर्मीयच नव्हे; तर इतर धर्मीयसुद्धा आपल्यासाठी विद्युतदाहिनीचा वापर केला जावा अशी इच्छा आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवतात. विद्युत दाहिन्या असोत अथवा पारंपारिक सरणे असोत, तिथे शेवटी राहते ती पसाभर राख! ती जमीन कायमची अशी कोणाच्या नावावर राहत नसते. ज्यांचे मृत्यूनंतर दफन केले जाते त्यांचे खड्डेसुद्धा काही ठराविक काळानंतर उकरले जाऊन ती जमीन इतरांसाठी खाली केली जाते. असे असताना शेेवटी माणसाला जमीन हवी तरी कितीशी? फक्त काही फूटच या म्हणण्याला काडीचाही अर्थ राहिलेला नाही. तरीसुद्धा या जगात जेवढी युद्धे झालेली आहेत ती फक्त जमीन आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठीच. जमिनीच्या मालकी हक्कासाठी फक्त कुटुंबांमध्ये दुरावाच निर्माण झालेला नाही, तर रक्ताचे पाट वाहिले गेलेले आहेत.
अन्नासाठी आणि हिरव्या चार्यासाठी शोधासाठी दाही दिशा भटकणार्या मानवाने ज्या क्षणी स्थैर्याला मिठी मारली तेव्हापासून जमिनीवर हक्क सांगण्यास प्रारंभ झाला आणि आजतागायत ती संस्कृती जमिनीला घास मारून राहिलेली आहे.
आज गोव्यातील जमिनीचा भाव आकाशाला भिडलेला आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या बांधकाम उद्योगामुळे मोक्याच्या ठिकाणच्या जमिनी बिल्डरांनी आपल्या घशात टाकलेल्या आहेत. गोवा हे भारतातील नंदनवन आणि ‘सुशेगाद’ प्रदेश असल्याचा बोलबाला असल्याने इथल्या सदनिका देश–विदेशातील धनिकांनी दाम–दुप्पटीने विकत घेऊन ठेवलेल्या आहेत. आज गोव्यात ‘प्राइम लोकॅलिटी’ म्हटले जाते तिथल्या जमिनी शिल्लक राहिलेल्या नाहीत. म्हणूनच एकेकाळी गोव्यातील ज्या ठिकाणांना खेडेगाव अथवा ‘रान’ म्हटले जात होते तिथेसुद्धा जमीन हडप करणार्यांची दृष्टी गेलेली आहे. विकासाच्या नावाने जो काही उच्छाद गावात माजलेला आहे त्याची परिणती म्हणून गोव्यातील जमिनी परराज्यातील जमीन भक्षकांच्या उदरात गडप होत चाललेल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी दिल्लीस्थित वर्मा नावाची एक धनिक व्यक्ती माझ्या आगशी गावात येऊन जमीन खरेदीसाठी फिरत होती. गावातील शेतकर्यांनी पडीक ठेवलेल्या शेतजमिनी स्थानिक दलालांच्या मदतीने तोलण्याचे काम ती करायची. माझ्या घरच्या शेजार्यांची जमीन लाखो रुपयांना विकत घेण्याची त्याची चाललेली तयारी पाहून मी त्या व्यक्तीला त्या मागचे प्रयोजन विचारले. त्या धनिकास त्या कसदार शेतजमिनीत आज काही पेरायचे नव्हते. कधी तरी त्या ठिकाणी जुवारी नदीवर दुसरा पूल येणार, तिथे विकासाची कामे सुरू होतील आणि आपण सध्याची शेतजमीन रुपांतरित करून घेऊन तेथे उद्योग उभारणार आहोत, त्यासाठीच आज आपण त्या पडीक जमिनीसाठी पैसे पेरत असल्याचे तो सांगत होता. त्याच्या दूरदृष्टीची कदर करावी तेवढी थोडी असली तरी तो खरेदी करू पाहणार्या जमीन मालकाच्या एका हिस्सेदाराच्या मदतीने त्याची स्वप्ने धुळीस मिळविण्यात मला यश आले होते.
उदाहरणदाखल गोव्यात घडलेली फक्त एक घटना इथे मी दिलेली आहे. परंतु गोव्यात गावोगावी आज आपल्या मालकीच्या जमिनी विकण्याचे सत्र गोमंतकीयांनी चालविलेले आहे. साध्याभोळ्या बळीराजाला कोण्या एकेकाळी इंद्राने वामनबटूचे रुप घेऊन लुटले होते. त्याने बळीराजाकडे तीन पावले जमीन मागितली होती. वामनरुपाने आलेल्या इंद्राने नंतर आपले खरे विराटरूप धारण करून पहिल्या पावलाने बळीराजाची सर्व जमीन पादाक्रांत केली होती. दुसर्या पावलात संपूर्ण विश्व पायाखाली घेतलेले आणि शेवटी बळी राजाच्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवून त्याला जमिनीत गाडले होते.
इंद्रप्रस्थातील आणि इतर ठिकाणाहून आलेले कितीतरी इंद्र सध्या जमीन गिळंकृत करीत आहेत. ते कोठून आणि किती पैसा घेऊन येतात याची कल्पना गोव्यातील बळीराजांना नाही. साधाभोळा आमचा बळीराजा इंद्रप्रस्थातील म्हणजे दिल्लीतील इंद्रांच्या वामनरुपाला भाळतो आणि फसतो. आज कित्येक दुकाने, आस्थापनेच नव्हे तर सुपीक जमिनीसुद्धा गोव्यातील बळीराजाकडून त्यांना भुलवून, आमिषे दाखवून पादाक्रांत केलेली आहेत. आपण काय करतो हे आमच्या बळीराजांना माहीत नसल्या कारणाने ते आपणहून आपले माथे वामनरुपी इंद्रप्रस्थातल्या लोकांच्या पायाखाली देत सुटलेले आहेत. आपण या आपल्याच मातीत गाडले जाऊ याची सुतराम कल्पना आमच्या साध्याभोळ्या लोकांनाही नाही याचेच वाईट वाटते.
पेडणे तालुक्यातील लाखो चौरस मीटर जमीन मोपा विमानतळासाठी कामी आलेली आहे. विमानतळ झाल्यानंतर जवळपास उद्योगधंद्यासाठी बरकत येईल याची दूरदृष्टी असलेले कित्येक बिगरगोमंतकीय आसपासची जमीन विकत घेऊ लागलेले आहेत. एकदा जमीन विकली गेली म्हणजे त्या जमिनीवर गोमंतपुत्रांचा आणि सरकारचाही काडीचा अधिकार असणार नाही, कारण सगळा व्यवहार हा कायदेशीरपणे झालेला आहे. जी लाखो चौरस मीटर जमीन विकली गेली, तिचे पैसे आमच्या गोमंतकीय बंधुभगिनींना मिळाले असतीलही! पण येणार्या पिढीसाठी एखादा उद्योगधंदा सोडाच, स्मशानासाठी तरी काही चौरस मीटर जमीन मिळेल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही.
जमिनीसारखे मर्यादित नैसर्गिक स्त्रोत, हिरव्या नोटांच्या रंगांना भुलून इतरांच्या दाव्यास बांधण्याचे सत्र जे काही आम्ही सुरू केलेले आहे, त्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. काश्मीरप्रमाणे गोवा राज्यास खास दर्जा मिळण्याची शक्यता कमीच, कारण आमच्याकडे फुटीरतेचे शस्त्र नाही. म्हणून आम्हीच आता आमचे भविष्य घडविण्यासाठी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. आम्ही जमीन गोव्याबाहेर जाऊ देणार नाही, अशी शपथ गोमंतभूमीस स्मरून घ्यायला पाहिजे. जमीन मालकाने घेतली नाही तर गोमंतकीय जनतेने तशी जबरदस्ती करायला हवी. हा गोव्याच्या भवितव्याचा प्रश्न आहे.