छत्तिसगढ विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात माओवाद्यांनी बहिष्काराची हाक दिलेली असताना ६७ टक्के मतदान नोंद झाले. बस्तर आणि राजनंदगावमधील १८ मतदारसंघांत मतदान झाले.
निवडणूक आयोगाने माहिती देताना सांगितले की, दांतेवाडा जिल्ह्यात मतदान आटोपून परतणार्या एका पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात केंद्रीय राखीव दलाचा एक जवान शहीद झाला. दरम्यान, काल दिवसभरात विविध ठिकाणी पेरलेले दहा बॉम्ब हस्तगत करून निकामी करण्यात आले. बस्तर आणि राजनंदगाव या नक्षलबहुल भागांत काल दुपारी ३ वा.पर्यंत निवडणूक आटोपली. काही ठिकाणी पाच वाजेपर्यंत मतदान चालू होते. या मतदारसंघातील बहुतेक भाग हे घनदाट जंगलांत आहेत.
दरम्यान, ‘नोटा’ म्हणजेच ‘वरीलपैकी कोणीही उमेदवार नको’ हा पर्याय मतदान यंत्रांवर पहिल्यांदाच काल वापरण्यात आला.