जनतेच्या हिताचा विचार करूनच आपण ही मागणी करीत आहे. त्यामुळे आपला पक्ष त्यास विरोध करण्याचा प्रश्नच नाही, असे ते एका प्रश्नावर म्हणाले.
राज्यातील कोणत्याही मार्गावर वाहन चालविताना डाव्या बाजूला येणे अशक्य झाले आहे. प्रत्येकजण डाव्या बाजूनेच पुढे जात आहे व पोलीस त्याच्यावर कोणतीही कारवाई करीत नाही, असे राणे यांनी सांगितले.
अमली पदार्थांच्या गैरव्यवहारांच्या बाबतीत आपण व आपला पक्ष गंभीर आहे. या प्रकरणात गुंतलेले राजकारणी असो, पोलीस असो किंवा अन्य कोणीही असो त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी त्यासाठी सरकारला आपल्या पक्षाचा पाठिंबा असेल, असे राणे यांनी सांगितले.
आपल्या मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याला अमली पदार्थाच्या विरोधात जनजागृती करण्यास सांगितले आहे. अमली पदार्थ गैरव्यवहार व नायजेरियन मृत्यू प्रकरण हा आंतरराष्ट्रीय विषय आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. या प्रश्नावर एकमेकांवर दोषारोप करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. हा विषय राज्याचा असल्याने येथील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याने केंद्राला दोष देऊन चालणार नाही, असे ते म्हणाले. आमदार मिकी पाशेको यांनी विधानसभेत सादर केलेला अंमली पदार्थ प्रकरणीचा अहवाल आपल्याला मिळालेला नाही. तो आपण मिळवणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.
सरकार विजेची बिले वेळेवर वितरित करीत नसल्याने ग्राहकांना त्रास झाला आहे. पाच ते सहा महिन्याची एकाच वेळी चार ते पाच हजार रुपयांची बिले दिली जातात. त्यामुळे ग्राहकांनी ती फेडणे कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने सर्वसामान्य गरिब ग्राहकांचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. साखळी येथील त्रिपुरारी पोर्णिमेच्या प्रश्नावर कला आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री अज्ञानातून वक्तव्य करीत असल्याची टीका राणे यांनी केली. त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव गेल्या पाचशे वर्षापासून सुरू आहे, असे ते म्हणाले.
चांगल्या अधिकार्यांसाठी दिल्लीत प्रयत्न : राणे
चालू महिना अखेर आपण दिल्लीला जाणार असून गोव्याला चांगले आयपीएस अधिकारी पाठविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे प्रयत्न करणार असल्याचे विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी काल सांगितले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्याला विश्वासात घेतलेच पाहिजे, असे कारण नाही. हा राज्याचा विषय आहे. जनतेने आम्हाला निवडून दिलेले असल्याने राज्याला चांगले अधिकारी मिळावे म्हणून प्रयत्न करणे हे कर्तव्य असल्याचे राणे म्हणाले.