काणका-म्हापसा येथील म्हापसा-कळंगुट मार्गावर असलेल्या ब्रिजेश बार समोरील रस्त्यावर रविवार दि. १० रोजी रात्री उशिरा दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन तीन युवक जागीच ठार झाले. या दोन मोटारसायकलपैकी एका मोटारसायकलवर तिघेजण तर दुसर्या मोटारसायकलवर दोघेजण बसले होते. दोघा जखमींना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम्. एच्. ०९ बी-वाय- ९७७२ ही हुंडाई इनिकॉन मोटारसायकलवरून म्हापशाहून रवींद्र चाळू गुरव (२१) आजगर-कोल्हापूर, राहुल श्रीनिवास जोशी (२६) अकोला-महाराष्ट्र सध्या धुळेर-म्हापसा येथे राहणारे आणि कोलवाळ येथील ग्रॅन्ड मार्क कंपनीमध्ये कामाला जात असलेले दोघे युवक म्हापशाहून कळंगुटला जात होते तर कळंगुटहून म्हापशाकडे येणारी जीए- ०३- एल ०४४८ ही स्टनर सीबीझेड ही मोटारसायकलवरून पराग पटेल, सांगली सध्या रा. काणका व त्याच्या मागे बसलेले मुस्तकी जोदर अलमोंडर (२२) रा. खोर्ली-म्हापसा घाटेश्वर नगर (मूळ कोलकता), काली उल्ला अब्दुल जोलीम (२०) परगन कोलकाता सध्या रा. म्हापसा हे कळंगुटहून म्हापशाकडे येत असताना रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास काणका ब्रिजेश बारजवळ पोहोचताच तेथील रस्त्यावर दोन्ही मोटारसायकलमध्ये जोरदार धडक बसली. अपघातात ठार झालेले रवींद्र चालू गुरव (२१), राहुल श्रीनिवास जोशी (२६) व पराग पटेल यांची डोके फुटली तसेच पाय मोडून हाडे बाहेर आली आणि गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले तर जखमी झालेले मुस्तकी जोदर अलमोंडर व काली उल्ला अब्दुल जोलीम हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर म्हापसा जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आल्यावर घरी पाठविण्यात आले तर मृतदेह उत्तरणीय तपासणी नंतर काल नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
मयत रवींद्र गुरव व राहुल जोशी हे कोलवाळ येथील ग्रॅन्ड मार्क येथील कंपनीमध्ये कामाला होते तर मयत पराग पटेल व जखमी झालेले मुस्तकी जोदर अलमोंडर व काली उल्ला अब्दुल जोलीम हे म्हापसा क्लिनिक समोर असलेल्या दत्तप्रसाद बिल्डिंगमध्ये सराफी कामगार म्हणून काम करत असत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गावस व हवालदार लवू परब यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास करीत आहेत.