- प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट
कष्ट करण्याची ताकद, जिद्द आणि प्रामाणिकपणा जर असेल तर मनात योजलेल्या कार्यात निश्चितच यश संपादन करू शकतो; नि केलेल्या कार्यामुळे जनमानसात निश्चितच आदरभाव निर्माण होऊन केलेल्या कार्याच्या स्मृती जाग्या होत राहतात.
– पूर्वार्ध –
कष्ट करण्याची ताकद, जिद्द आणि प्रामाणिकपणा जर असेल तर मनात योजलेल्या कार्यात निश्चितच यश संपादन करू शकतो; नि केलेल्या कार्यामुळे जनमानसात निश्चितच आदरभाव निर्माण होऊन केलेल्या कार्याच्या स्मृती जाग्या होत राहतात. भारदस्त व्यक्तिमत्त्व, तेजस्वी नि सदा हसरा चेहरा, समोरच्या व्यक्तीलासुद्धा आपल्या मनातील विचारांचा थांगपत्ता लागू न देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पांडुरंग दत्ताराम राऊत हे होय. आजवरच्या त्यांच्या कार्यप्रणालीचा थोडक्यात घेतलेला हा मागोवा.
निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या नि नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असलेल्या साळ या गावचे पांडुरंग राऊत हे सुपुत्र आहेत. गोमंतभूमीतील डिचोली तालुक्यात साळ हा गाव येतो. श्री. राऊत हे म्हापशाचे रहिवासी असून म्हापसा ही त्यांची कर्मभूमी आहे. बालपण ते आजपर्यंत ते म्हापशाचे स्थायिक असून बालपणापासून इथेच रमले. वडील दत्ताराम राऊत हे नोकरीनिमित्त म्हापशातच राहू लागल्याने पूर्ण कुटुंब इथेच वास्तव्यास होते. त्यावेळी साळमध्ये साधनसुविधा नसल्यामुळे, शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे म्हापशात राहाणे योग्य होते व त्यामुळेच भविष्याचा विचार करून पूर्ण कुटुंब म्हापशामध्ये राहिले. आईवडिलांची साथ असल्यामुळे योग्य संस्कार होऊ लागले नि योग्य मार्गदर्शन प्राप्त होऊ लागले. वडिलांच्या योग्य मार्गदर्शनाचा, विचारांचा फायदा झाला.
शिक्षण झाल्यानंतर श्री. राऊत यांनी एका खाजगी क्षेत्रात ‘नित्यानंद ट्रान्सपोर्ट’मध्ये नोकरी केली. सतत दहा वर्षे प्रामाणिकपणे नोकरी केली व 1975 मध्ये स्वतःचा व्यवसाय करण्याचे मनात ठरविले. दहा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असल्याने ट्रान्सपोर्ट क्षेत्रात नशीब अजमावण्याच्या दिशेने पाऊल टाकून ‘राऊत रोडवेज’ नावाने स्वतःचा वाहतुकीचा व्यवसाय म्हापशामधून सुरू केला. गोव्यातील प्रमुख शहरांत आज ‘राऊत रोडवेज’च्या शाखा आहेत. इतकेच नाही तर भारताचा आर्थिक कणा समजल्या जाणार्या मुंबई शहरात एक शाखा उघडली. आज याच मुंबईत तीन शाखा कार्यरत आहेत. ‘राऊत रोडवेज’च्या नावाने माल वाहतूक व्यवसायात उतरलेले गोव्यातले ते पहिले गोवेकर ठरले. तत्पूर्वी गोव्यात मालवाहतूक करणारी यंत्रणा बाकीच्या राज्यांतून सांभाळली जात होती नि गोवेकर त्यात कार्यालयात काम करायचे. हा व्यवसाय प्रामाणिकपणे करीत आले व कष्ट करून या व्यवसायात संपूर्ण गोव्यात पार्सल सर्विसमध्ये ठसा उमटविला. व्यवसायात प्रामाणिक असणे ही शिदोरी होय.
ते म्हणतात, गोव्यातील तमाम व्यापार्यांनी विश्वास ठेवल्यामुळेच ट्रान्स्पोर्टमध्ये ‘नंबर वन’ म्हणून नाव कमावले. ‘राऊत रोडवेज’चे गोव्यात नाव अधिकांश व्यापार्यांच्या ओठावर होते. त्यात माझेही नाव जनमानसात ओळखले जाऊ लागले. अशावेळी सन 1989 मध्ये गोव्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मगो पक्षाच्या डिचोली मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांनी माझ्या नावाची उमेदवार म्हणून शिफारस केली. बर्याच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळचे अध्यक्ष रमाकांत खलप यांना भेटून गळ घातली. तसेच रमाकांत खलप यांनी पूर्ण विचारांती उमेदवारीही दिली. मगो कार्यकर्त्यांत हुरूप आला. राजकारणाचा तेवढा अनुभव नव्हता पण कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे 1989 च्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवड झाली. त्यावेळी मगोची ध्येयधोरणे व मराठी भाषेसाठी चळवळ चालली होती, त्याचीही निवडून येण्यास मदत झाली. निवडून आल्यानंतर कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाला उभारी मिळाली. राजकारणाबरोबर सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्यास वाव मिळाला व आमदार म्हणून निवडून आल्यामुळे या कार्यक्षेत्रात पुढे जाण्यास संधी मिळाली. त्यावेळी 1990 सालच्या गोव्यातील राजकारणाच्या घडामोडीत नवीन सरकार सत्तेवर आले आणि त्यात मंत्री होण्याची संधी प्राप्त झाली. डिचोली मतदारसंघाचा विकास करण्यास वाव मिळाला. राजकारणात उभारी मिळाल्यामुळे पर्यटनमंत्री बनलो. मतदारसंघाच्या विकासाबरोबर सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्यास वाव मिळाला. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी ज्ञानप्रसारक मंडळ, डिचोली या संस्थेची स्थापना करून ग्रामीण क्षेत्रातील मुलांना दहावी आणि पुढे बारावीपर्यंत शिक्षण घेण्यास मदत झाली. पूर्वप्राथमिक ते शालान्त परीक्षेपर्यंत (दहावी) असे शिक्षण घेण्यास खोलपेवाडी- साळ येथे ‘शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय’ या नावाने विद्यालयाची सुरुवात केली. गोव्यातील शिवाजीराजे नावाने असलेले हे एकमेव विद्यालय होय. नाव देण्याचा मुख्य हेतू म्हणजे प्रत्येक मातेने ‘माता जिजाऊ’सारखे आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार करावेत नि प्रत्येक मुलाने जीवनात शिवाजीसारखे घडावे. तसेच मुळगाव येथे ज्ञानप्रकाश मंडळ उच्च माध्यमिक विद्यालयाची सुरुवात केली. पूर्वी या ग्रामीण भागात 80 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण व्हायचे. ज्ञानप्रकाश मंडळ, डिचोलीने शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले व त्यासाठी योग्य त्या शिक्षकांची शिकविण्यासाठी निवड केली. प्रत्येक शिक्षक योग्य ते ज्ञान, संस्कार देत असल्यामुळे विद्यार्थ्यांत आमूलाग्र बदल झाले नि दोन्ही विद्यालयांनी हे शिक्षकांच्या व व्यवस्थापन मंडळाच्या जोरावर साध्य केले. आज दोन्ही विद्यालयांचा 100 टक्के उत्तीर्ण असा निकाल येत आहे, त्यामुळे इतर विद्यालयांत बदल घडला.
मंत्री झाल्यामुळे शिक्षणाबरोबर डिचोली मतदारसंघाचा विकास घडवून आणण्यासाठी विकास आराखडा तयार करून डिचोली एक टुमदार शहर आणि ग्रामीण भागाचा विकास करण्यास वाव मिळाला. डिचोली मतदारसंघात रस्त्याचे जाळे विणले, वीजपुरवठ्यात योग्य ते बदल घडवून आणीत ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत व्हावा याकडे लक्ष दिले. नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी, तोसुद्धा डिचोली शहरापासून ग्रामीण भागात पाणीपुरवठा व्हावा यासाठी पडोसे जल शुद्धीकरण प्रकल्पाकडून या डिचोली मतदारसंघाला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी कार्यान्वित केली. तिळारी धरणाचे पाणी शेतीसाठी गावोगाव पोचावे यासाठी तिराळीचे पाणी जलसंसाधन खात्याद्वारे शेतकर्यांच्या शेतीपर्यंत जलवाहिनी टाकून पोचवण्यासाठी प्रयत्न केले व पोचविण्यात यशही मिळविले. त्या तिळारीच्या पाण्याचा शेतकर्यांना फायदा होऊन शेतकरी विविध प्रकारचे उत्पन्न घेत आहेत.
डिचोली शहर तसेच डिचोली मतदारसंघातील ग्रामीण भागात जोडमार्गाची जोडणी केली. वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी इतर तालुक्यांप्रमाणे डिचोली तालुक्यात रस्ता वाहतूक अधिकार्याचे कार्यालय कार्यान्वित केले. लोकभाषेचा आदर व सन्मान करणारे धोरण राबविले. दुग्ध उत्पादन, कुक्कुट पालन यांसारख्या लघुउद्योगावर रोजगारनिर्मिती केली. सुशासन व सुप्रशासन राबविले. तसेच भेसळ, भ्रष्टाचार आणि प्रदूषणयुक्त गोव्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून जनसामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहिले आहेत.
1999 साली परत एकदा डिचोली मतदारसंघातून निवड करण्यात आली नि या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी मिळाली. डिचोली मतदारसंघाचा, विशेषकरून डिचोलीचा विकास घडवून आणण्यासाठी आराखडा तयार केला त्यात रवींद्र भवन, क्रीडा संकुल, सामुदायिक आरोग्य केंद्र म्हणून रुग्णालय श्रेणी सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. रुग्णालय श्रेणी सुधारणेसाठी पायाभरणी कार्यक्रमही पार पाडला. पण नंतरच्या कालखंडात मी नसल्यामुळे हे तिन्ही मुख्य प्रकल्प साखळी-वाळपई व होंडा येथे स्थलांतरित करण्यात आले. त्यावेळचे आमदार किंवा डिचोलीच्या विकासाच्या मोठमोठ्या गोष्टी करणार्या राजकीय पुढार्यांनी लक्ष न दिल्यामुळे वरील तिन्ही प्रकल्प डिचोली मतदारसंघाबाहेरच गेले. येथील कलाकार, क्रीडापटू आणि आजारी लोकांची परिस्थिती बघून मनाला दुःख होते, त्याचे शल्य आजही उरी आहे.