-ः पाथेय ः- द्रष्टे पुरुष विषग्वर्य डॉ. दादा वैद्य

0
567
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

विसाव्या शतकाच्या प्रारंभी गोमंतभूमीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वसंस्कृती, स्वभाषा आणि समाजाच्या सम्यक अंगांनी सुधारणा हे आपल्या आयुष्याचे व्रत मानून अबोल वृत्तीने रचनात्मक कार्य करणार्‍या डॉ. दादा वैद्य यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी गोमंतभूमीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वसंस्कृती, स्वभाषा आणि समाजाच्या सम्यक अंगांनी सुधारणा हे आपल्या आयुष्याचे व्रत मानून अबोल वृत्तीने रचनात्मक कार्य करणार्‍या द्रष्ट्या समाजसुधारकांमध्ये विषग्वर्य डॉ. दादा वैद्य यांचे अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल. ते प्रख्यात आयुर्वेदाचार्य, साहित्यिक, संपादक आणि समाजसुधारक तर होतेच; पण तत्कालीन समाजमानसाची नेमकेपणाने नाडीपरीक्षा करणारे विचारवंत होते. कशी होती त्यावेळची परिस्थिती? सारीकडेच अंधार होता. अज्ञानाचा, दारिद्य्राचा आणि स्वत्वाच्या अभावाचा. पोर्तुगीज हीच आपली मातृभाषा, पोर्तुगिजांचे राष्ट्रवीर तेच आपले राष्ट्रवीर, इतकेच काय तर पोर्तुगाल हाच आपला मायदेश अशी सामाजिक मानसिकता होत चालली होती. तिच्यात बदल होणे ही काळाची गरज होती. गोव्याच्या सुदैवाने 1910 साल हा पुढील सामाजिक परिवर्तनाचा प्रारंभबिंदू ठरला. मृगाची पहिली सर येताच नांगरणीचा हंगाम सुरू झाला पाहिजे याचे भान फारच थोड्या लोकांना असते. ज्यावेळी ज्या गोष्टी या भूमीत घडायला हव्या होत्या; त्या घडल्या म्हणूनच गतकाळातील या कृतिशील प्रज्ञावंतांना कृतज्ञतेची अंजली वाहिली पाहिजे, मानवंदना द्यायला पाहिजे, असे प्रांजळपणे वाटते. पुढील कालखंडात गोमंतकीयांनी साहित्यशारदेच्या मंदिरात काव्य, नाट्य, कथा, कादंबरी, व्याकरण, शब्दकोश, संस्कृतिकोश, विश्वचरित्रकोश, इतिहास, तत्त्वज्ञान, चित्रकला, संगीत इत्यादी अंगांची चिरंतर उपासना केली. याचे श्रेय दादा वैद्य आणि त्यांच्या समकालीनांना द्यायला हवे.

‘सर्व संग्रह’, ‘सत्संग’, ‘प्रभात’, ‘भारत’ ही नियतकालिके म्हणजे राष्ट्रवादाची आणि वाङ्मयनिर्मितीची प्रस्फुरणे होत. मुद्रणकलेचा फारसा विकास त्या काळात झालेला नसतानाही जीवनाचा पृथक अंगांनी विचार करणारी नियतकालिके डॉ. दादा वैद्यांनी सुरू केली. ‘विद्याप्रसार’, ‘पथ्यबोध’, ‘प्राचीप्रभा’ या नियतकालिकांबरोबरच मुख्यत्वे स्त्रियांसाठी वाहिलेल्या ‘हळदकुंकू’ या नियतकालिकामागे समाजप्रबोधनापलीकडे ÷अन्य प्रेरणा कोणती होती? तत्कालीन समाजजीवनात प्रकट केलेले हे मोठे धाडसच होते. पण डॉ. दादा वैद्यांनी तेवढ्यापुरती आपली जीवनदृष्टी सीमित ठेवली नव्हती. त्यांच्या लेखणीत सव्यसचित्व होते. ‘काव्यतरंगिणी’, ‘स्थूलतनुवर्णन’, ‘मृत्युंजय’ (नाटक), प्रबोद्यसुधाकर (टीका), प्रकृती-विकृती (प्रहसन), ‘स्फुरणगीते’, ‘आत्मबोध’ व ‘सुकन्याचरित्र’ या पुस्तकांमधून त्यांचे लेखनकौशल्य तर दिसून येतेच; शिवाय समाजहितैषी वृत्तीही दिसून येते. केवळ कलात्मकता हे त्यांच्या लेखनाचे प्रयोजन नव्हते. त्यांच्यासमोर त्या काळाचे आव्हान होते. उद्बोधनाचा हेतूही त्यांना डोळ्यांसमोर ठेवावा लागला होता. कुटुंबनियोजनाच्या समस्येकडेही त्यांनी आपले लक्ष वेधले होते.

विषग्वर्य डॉ. दादा वैद्य यांच्या वाङ्मयीन कार्याइतकेच त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मौलिक स्वरूपाचे आहे.

2 ऑक्टोबर 1911 रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर डॉ. रामचंद्र पांडुरंग वैद्य ऊर्फ डॉ. दादा वैद्य, सीताराम विश्वंभर केरकर आणि विनायक रामचंद्र सरज्योतिषी या द्रष्ट्या व्यक्तींनी ‘गोवा विद्याप्रसारक मंडळ’ तसेच ‘कॉलेजियो आंतोनिओ जुझे द आल्मेद, लिगा द प्रोपगांदा द इन्स्त्रुसांव ए गोवा’ म्हणजे आजचे ‘ए. जे. द. आल्मेदा हायस्कूल’ची फोंडा येथे स्थापना केली. या शिक्षणसंस्थेच्या स्थापनेमागचा हेतू विशद करताना डॉ. दादा म्हणाले होते ः

“अज्ञान्यांनी सज्ञान व्हावे, निरक्षरांनी साक्षर व्हावे, साक्षरांनी सुशिक्षित व्हावे, सुशिक्षितांनी विचारवंत व्हावे, विचारवंतांनी आचारवंत व्हावे व आचार-विचारवंतांनी अज्ञान, दारिद्य्र व दौर्बल्य हे आज समाजास ग्रासणारे तीन शत्रू, त्यांविरुद्ध सामना देऊन विजय मिळवावा अशा माझ्या आकांक्षा आहेत.”

समाजाच्या पायाभूत विकासाची डॉ. दादा वैद्य यांची दृष्टी किती मूलगामी स्वरूपाची होती आणि भविष्यकालीन क्षितिज त्यांना कसे खुणावत होते याची या विचारांतून कल्पना येते.

ही शिक्षणसंस्था म्हणजे राष्ट्रवादी विचारांची गंगोत्री होती हे गोमंतकाच्या त्यानंतरच्या ऐतिहासिक घटनांनी दाखवून दिलेले आहे. क्रांतिकारी चळवळीत भाग घेतलेले दत्तात्रय विष्णू आपटे आणि हरी गणेश फाटक यांचे या शिक्षणसंस्थेच्या उभारणीत मौलिक स्वरूपाचे कार्य आहे. त्याचबरोबर शंकरराव देशपांडे, जयकृष्ण नारळे आणि श्रीधर अनंत घोर शास्त्री या शिक्षकांचा येथे आवर्जून उल्लेख करावा लागेल.

या संस्थेला डॉ. आंतोनिओ जुझे द आल्मेदा यांचे नाव का बरे दिले असेल? यासंबंधीचा खुलासा करणे आवश्यक ठरेल. डॉ. आंतिनिओ द आल्मेदा हे पोर्तुगीज नेते होते. ते उदारमतवादी होते. 1910 साली पोर्तुगालमध्ये प्रजासत्ताकाची स्थापना झाली. त्यावेळी या नेत्याने गोव्यातील तत्कालीन पोर्तुगीज राजवटीवर येथील पार्लमेंटमध्ये कडक टीका केली. प्रजेची धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात जी गळचेपी चालविली होती तिला त्यांनी वाचा फोडली. परिणामी गोव्यातील जुलमी कायदे हटवून या क्षेत्रात येथील जनतेला स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. आल्मेदा यांच्याविषयीचा आदरभाव प्रकट करण्याच्या हेतूने त्यांचे नाव या शिक्षणसंस्थेला देण्यात आले.

या शिक्षणसंस्थेने गेल्या एकशे नऊ वर्षांत मिळविलेले यश देदीप्यमान स्वरूपाचे आहे. तिचा अनेक अंगांनी विस्तार आणि विकास झालेला आहे. गोवामुक्तीपूर्व काळातील संग्रामात येथून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. मुक्तीनंतरच्या काळात येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत शैक्षणिक यश प्राप्त केले आहे. शिवाय अन्य क्षेत्रांतही येथील विद्यार्थी चमकले आहेत. बोरी, खांडेपार, सावईवेरे आणि बांदिवडे या गावांत ‘गोवा विद्या प्रसारक मंडळा’च्या शाखा निर्माण झाल्या आहेत. जनमानसाच्या शैक्षणिक आशा-आकांक्षा पूर्ण करणारी अद्ययावत शिक्षणसंस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. पूर्वसूरींच्या स्वप्नांची पूर्ती त्यामुळे झाली आहे.

डॉ. दादा वैद्य यांनी आपल्या 88 वर्षांच्या आयुष्यात काय काय केले? त्यांनी आयुर्वेदिक प्रयोगशाळा उभारली. मयडे येथे कौलांचा कारखाना सुरू केला. पणजी व मडगाव येथे आयुर्वेदिक औषधालये सुरू केली. नाट्यक्षेत्राला प्रतिष्ठा नसलेल्या काळात नाटकमंडळी काढून नाट्यकलेला प्रोत्साहन दिले. आयुष्याच्या उत्तरायणात ते संन्यस्त वृत्तीने राहू लागले.

एकच शल्य मनाला बोचते. भारत स्वतंत्र झालेला त्यांना पाहता आला नाही. त्यापूर्वीच 6 मार्च 1947 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.