संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, काल लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ऑपरेशन महादेव’विषयी माहिती दिली. पहलगामचा हल्ला अत्यंत भयंकर आणि भीषण होता. त्यावर चर्चा होते आहे, ती झालीही पाहिजे. ऑपरेशन सिंदूरच्या आधी मी ‘ऑपरेशन महादेव’ची माहिती देतो, असे अमित शहा म्हणाले. ऑपरेशन महादेवमध्ये सुलेमान शाह उर्फ हाशिम मुसा, हमझा अफगाणी आणि जिब्रान हे तीन पाकिस्तानी दहशतवादी भारतीय सैन्य दल, सीआरएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारले गेले. ह्या तीन दहशतवाद्यांनीच पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला होता, असे शहा यांनी स्पष्ट केले.
सुलेमान हा लश्कर ए तोयबाचा कमांडर होता. पहलगाम हल्ला आणि गगनीर हल्ल्यात त्याचा सहभाग होता. हमझा अफगाणी लश्कर ए तोयबाचा अतिरेकी होता. जिब्रानही याच प्रकारातला दहशतवादी होता. मी आज संसदेत हे सांगतो आहे की ज्यांनी बैसरानच्या खोऱ्यात आपल्या नागरिकांवर हल्ला केला, त्यामागे हे तिन्ही पाकिस्तानी दहशतवादी होते. या तिघांचाही खात्मा करण्यात आला, अशी माहिती शहा यांनी दिली.
ऑपरेशन महादेवची सुरुवात 22 मे 2025 ला झाली. दुपारी एक वाजता पहलगामचा हल्ला झाला, त्यानंतर त्याच दिवशी म्हणजेच 22 एप्रिलला मी संध्याकाळी साडेपाचला पहलगामला भेट दिली, असे शहांनी नमूद केले.
ऑपरेशन महादेव कसे राबवले?
23 एप्रिलला आम्ही एक बैठक घेतली. जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर, सीआरपीएफ यांची ही संयुक्त बैठक होती. त्यात आम्ही पहिला निर्णय केला की देशावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या एकाही दहशतवाद्याला पाकिस्तानात पळून जाऊ दिले जाणार नाही आणि आपण कुणालाही पळून जाऊ दिले नाही त्यांना ठार केले. 22 मे रोजी इंटेलिजन्स ब्युरोला एक महत्त्वाची माहिती मिळाली. एका गावात दहशतवादी उपस्थित असल्याचे त्यांना कळले. त्यानंतर 22 मे ते 22 जुलै या कालावधीत दहशतवाद्यांचे सिग्नल आपण तपासले. 22 जुलैला आपल्याला मोठे यश मिळाले; कारण सेन्सॉरच्या माध्यमातून ते हेच दहशतवादीच असल्याचे समजले. त्यानंतर पॅरा मिलिटरीचे जवान, लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्त कारवाई सुरू केली आणि तीन दहशतवाद्यांचा सोमवारी आपण खात्मा केला. दहशतवाद्यांची रितसर ओळख पटवण्यात आली. कारण एनआयएने या दहशतवाद्यांना जेवण पोहचवणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले होते. चार जणांनी ओळख पटवली की ज्या तिघांचा खात्मा केला तेच पहलगाम हल्ल्यामागील दहशतवादी होते, असेही अमित शहा म्हणाले.