Home अंगण सोनपावलांचा श्रावण

सोनपावलांचा श्रावण

0
  • सुनेत्रा कळंगुटकर

कृष्णश्यामल आषाढ सरतो आणि श्रावणाची सोनपावलं धरतीवर उमटू लागतात. आषाढाचा पाऊस मनसोक्त पिऊन झाडं तृप्त झालेली असतात. ही तृप्ती त्यांच्या पानापानांवर, फांद्या-डहाळ्यांवर दिसत असते. एकीकडे असा निसर्गाचा उत्सव सुरू असतो आणि दुसरीकडे अनेक सण-उत्सवांनी श्रावण खुलतो…

कृष्णश्यामल आषाढ सरतो आणि श्रावणाची सोनपावलं धरतीवर उमटू लागतात. आषाढाचा पाऊस मनसोक्त पिऊन झाडं तृप्त झालेली असतात. ही तृप्ती त्यांच्या पानापानांवर, फांद्या-डहाळ्यांवर दिसत असते…
सोनेरी पंखांचा श्रावणपक्षी धरतीवर उतरतो आणि ऊनपावसाचा खेळ सुरू होतो. अधूनमधून सोनेरी उन्हं पडत असतात आणि मधूनच पावसाची सर येत असते. आषाढात सचैल भिजलेली झाडं आपलं अंग वाळवतात. झाडांच्या पानांवर तजेलदार हिरवा रंग असतो. पानापानांवर पडलेले पावसाचे थेंब उन्हाने चमचमू लागतात. पानापानांवर जणू काही हिरेच विखुरलेले आहेत असं वाटत असतं. आकाशात इंद्रधनू उमललेलं असतं. उन्हं पडल्यावर पक्षी आनंदित होऊन भिरभिरतात… किलबिलतात… गातात. भिजलेली पिसे वाळवत विजेच्या तारांवर बसतात. त्यांचे सगळे लक्ष मात्र आपल्या घरट्याकडे असते. या ऊनपावसात दूर जंगलात कुठेतरी माकडाचे लग्न लागत असावे…
आषाढाचं पाणी पिऊन तृप्त झालेली जाई, सोनचाफा, पारिजातक अशी झाडं फुलांनी बहरू लागतात. जाईला आता बहर आलेला असतो. लाखो नाजूक सुगंधी कळ्यांनी जाईची वेल बहरते. जाईच्या नाजूक देहावर उमललेली पांढरीशुभ्र फुलं आसमंतात सुगंधाची उधळण करत असतात. जाईच्या इवल्याशा फुलांत दडलेल्या सुगंधाचे मनाला आश्चर्य वाटते. सोनचाफ्याच्या लाटांसारख्या लांबट हिरव्या पानांमधून हळूच सोनेरी पिवळ्या रंगाच्या कळ्या डोकावतात आणि पाहतापाहता सोनचाफा पिवळ्या रंगाच्या देखण्या सुगंधी फुलांनी बहरून जातो. सोनचाफ्याच्या फुलांकडून सुगंधाचा नजराणाच सृष्टीला दिला जातो. सोनचाफा आपल्या सुगंधाने मनामनाला वेड लावतो.

पारिजातक पांढऱ्या पाकळ्यांच्या आणि केशरी देठाच्या स्वर्गीय फुलांनी बहरतो. प्राजक्ताच्या रात्री फुललेल्या फुलांचा सडा पहाटे झाडाच्या तळाशी पडतो. जमिनीवर सांडलेली पांढऱ्या रंगाची व केशरी देठाची ही लहानलहान फुलं इतकी कोमल असतात की, खूप हळुवारपणे ती उचलावी लागतात. खाली गळून पडलेल्या त्या फुलांकडे पाहून असे वाटते की जणू आभाळ रात्रभर रडत होते आणि आभाळाचेच अश्रू प्राजक्तफुलांच्या रूपाने खाली सांडलेले आहेत.
सगळीकडे रानफुलं, गवतफुलं फुललेली असतात. सगळी सृष्टी उत्सव साजरा करीत असते. श्रावणात एकीकडे असा निसर्गाचा उत्सव सुरू असतो आणि दुसरीकडे अनेक सण-उत्सवांनी श्रावण खुलतो. श्रावणाच्या सुरुवातीलाच नागपंचमी येते. गावातील मूर्तीकारांनी नागांच्या मूर्ती बनवलेल्या असतात. मूर्तीकारांकडून नागमूर्ती आणून घरात मातीचे नाग पुजले जातात. अळवाच्या पानावर पुजला गेलेला नाग खराच आहे असे बालमनाला वाटत असते आणि एक अनामिक भीती मनात निर्माण होत असते. वाटत असते की, आता हा सळसळत जाईल. पाऊस पडायला लागल्याबरोबर जमिनीतून वर आलेली हळदीची रोपं तरारून वाढलेली असतात. लांब मोठी सुगंधी अशी हळदीची पाने मोरपिसाऱ्यासारखा आपला पिसारा फुलवून उभी असतात. परसबागेत जणू एक मोरच आपला पिसारा फुलवून उभा आहे असे भासत असते. नागपंचमीला घरात या हळदीची पाने वापरून तांदळाच्या पिठाच्या पातोळ्या बनवल्या जातात.
नागपंचमीनंतर पौर्णिमेला नारळीपौर्णिमा असते. समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा केली जाते. घरातील सर्वजण नवीन जानवे घालतात. त्याच दिवशी बहीण-भावाच्या प्रेमाचा उत्सव असलेला रक्षाबंधनही साजरा केला जातो.
नारळीपौर्णिमेनंतर श्रीकृष्णजन्माष्टमी साजरी होते. अष्टमीच्या रात्री बारा वाजता कृष्णजन्माचा उत्सव साजरा केला जातो. मूर्तीकारांकडून बालकृष्णाची मूर्ती आणून पुजली जाते. बाळकृष्णाला पाळण्यात घातलं जातं. बाहेर खूप पाऊस कोसळत असतो. अशा या पावसातच रात्री कृष्णजन्म झाला होता. कंसाच्या कारागृहात असलेल्या देवकीने कृष्णाला जन्म दिला होता आणि वसुदेवाने पूर आलेली यमुना नदी पार करून त्याच रात्री कृष्णाला आपला मित्र नंद याच्या घरी सुखरूप पोचवले होते.

श्रावणात नागपंचमी, नारळीपौर्णिमा, श्रीकृष्णजन्माष्टमी या सणांबरोबरच अनेक व्रतवैकल्ये केली जातात. मंगळागौरी, आयतारपूजन हेही साजरे होत असतात. देवळांमधून श्रावणी सोमवार आणि अन्य वार साजरे होतात. भजन-कीर्तन होत असते. त्यानंतर प्रसादाचे द्रोण वाटले जातात. श्रावणात सगळीकडे पवित्र आणि उत्सवी असे वातावरण असते.
श्रावणाच्या या सौंदर्यात कवींच्या प्रतिभेलाही बहर येतो. श्रावणाच्या सौंदर्याचे वर्णन करणाऱ्या कविता कवींना स्फुरतात. कविवर्य पाडगावकर लिहून जातात-
श्रावणात घन निळा बरसला
रिमझिम रेशीमधारा
उलगडला झाडांतुन अवचित
हिरवा मोरपिसारा
असा हा श्रावण मनामनाला आनंद देणारा, सगळ्या सृष्टीला प्रसन्नतेचे वरदान देणारा असतो. म्हणूनच हा सोनपावलांचा श्रावण सर्वांना हवाहवासा वाटत राहतो.