सुंदर माझं गाव!

0
689
  • प्राजक्ता प्र. गावकर (नगरगांव-वाळपई)

 

खेड्यातील लोक मनाने सोशिक, हळवे व दिलदार स्वभावाचे असतात. आदर कसा करावा हे खेडेगावातील लोकांपासूनच शिकावे. दारात येणारा माणूस आपला असू दे किंवा परका, त्याला ‘या.. बसा..’ असे सांगून प्यायला पाणी देऊन पोटभर जेवण वाढल्याशिवाय जाऊ देत नाहीत.

खेडेगाव हा चार अक्षरांचा एक शब्द. पण या शब्दाच्या उच्चारानेच मन आनंदित होते. हे खरेच की खेड्यात गैरसोई फार असतात. जसे की बाजार, डॉक्टर, गाड्यांची पंचाइत वगैरे. शाळा पण सातवी किंवा असलीच तर दहावीपर्यंत. पुढील शिक्षणासाठी शहरातच जावे लागते.

सकाळी बाजाराला गेलेल्यांना दुपारशिवाय बस नाही. कधी कधी संध्याकाळपर्यंत बसची वाट पहात बसावे लागते. कारण गावात येणारी आणि परत जाणारी एकच बस असते. डॉक्टरांच्या बाबतीतही तेच. गावात कुणी आजारी पडले तर डॉक्टर नाहीत. गरोदरपणात अडलेल्या बाईला दवाखान्यात न्यायचे तर गाड्यांची कमतरता. अशा एक ना दोन अनेक अडचणी असतात. पण खेडेगाव तो खेडेगावच.

खेडेगावाची सर शहराला येणार नाही. शहरी वातावरण तप्त, उष्ण, सदा धावपळीचे, दगदगीचे. दिवस उजाडला की पळापळीला सुरुवात होते ती रात्री एक-दोन वाजेपर्यंत थांबायचे नाव नाही. तसेच तिथे जरी सर्व ताबडतोब मिळते तरी अनंत अडचणी असतात. आता हेच पहा- माझ्या मामांचे गाव बेळगांव शहरात गांधीनगर येथे आहे. मामा, मामी त्यांची मुले, सुना, नातवंड, मामांची आई असे मोठे  कुटुंब आहे. घर पण दोन-तीन मजली आहे. सर्व सुखसोई आहेत पण आठ-आठ दिवस पाण्याचा पत्ता नाही आणि वरुन प्यायचे व वापरायचे पाणी फक्त नळालाच येणार. मग ‘पाण्यासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा..’, असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर येते. बाकी डॉक्टर गल्लोगल्ली आहेत. दुकाने कोपर्‍या- कोपर्‍यावर आहेत. पण पाणी नको का? शहरात हे असेच चित्र दिसते.

खेड्यात मात्र आपण नदी, झरा, विहीर इत्यादी ठिकाणचे पाणी भरु शकतो. नळाचीच वाट पहायला हवी असे काही नाही. आता तर ठिकठिकाणी बोअरवेलसुद्धा उपलब्ध केलेल्या आहेत. मग मनात विचार येऊन जातो- गड्या अपुला गांव बरा!

कारण गावातलें वातावरण सर्वांनाच भूरळ घालणारे असते. उगीचच नाही सांगत, कामानिमित्त शहरात राहणारी माणसे सणासुदीला, उन्हाळ्याच्या सुट्टीला आपल्या गावी परत पळत येतात. येतात आणि मन शांत होईपर्यंत एकेक दोन दोन महीने ठाण मांडून राहतात. कारण गावाचे वातावरणच असते मुळी शांत. शहरातला गोंधळ- कलकलाट इथे नसतो.

गावाभोवती सुंदर निसर्ग असतो. उन्हाळ्यात ऊन असतेच पण त्यातही वार्‍याची शीतल झुळुक अंगावर येते. त्यामुळे उन्हाचे काहीच वाटत नाही. खेड्यातली थंडी पण औरच असते. अंगाला आतून बाहेरुन कडकडा कापायला लावणार नाही तर ती थंडी कसली? कुठे मिळेल तिकडे शेकोटी करुन टोळक्यांनी… घोळक्यांनी लोक बसतात. साहजिकच त्यातल्या त्यात जरा वयस्कर म्हातारे लोक म्हणतात, ‘‘कुडकुड्यांचा शी मरे, सोसानारे बाबा’’ तर खेड्यातली थंडी ही अशी असते. दुपारचे बारा वाजले तरी अंथरुणातून बाहेर यायला कां कू करायला लावील. गरम गरम चहा घेत चुलीकडे बसूनच रहावेसे वाटते. ती खेडेगावची थंडी.

आता पावसाचे काय सांगायचे. खेड्यातला पाऊस म्हणजे आकाश फाटल्यागत ओततो तसा पडतो. असा की कुठे.. पाहाल तिकडे पाणीच पाणी. इतका जोरदार पडतो.. थांबायचे नावच नाही. खुप पडतो खुप पडतो आणि बरोबर दाट धुके. या धुक्यात सर्वच वाटा हरवतात. समोरासमोर असलेले घरही दिसत नाही.

पावसाची रिमझिम चालूच असते. काहीजणांना बरे वाटते तर काही लोकांना मात्र कामासाठी बाहेर जायचे असते. त्या लोकांच्या तोंडी, ‘‘काय बाबा पाऊस लागता हा रे, कमी जावूचो ना काय? कामाक जावक दिनाना. शेतार जावक नको?’ असे शब्द येतात.

एवढा पाऊस पडतो म्हणूनच तर खेडेगांव निसर्गसंपन्न असतो. गुरांना चारा मुबलक प्रमाणात मिळतो. त्यामुळे दुधदुभतेही भरपूर. भेसळीशिवाय. नाहीतर शहरात भेसळ केल्याशिवाय एक जिन्नस मिळेल तर शपथ.

त्याशिवाय खेड्यातील लोक मनाने सोशिक, हळवे व दिलदार स्वभावाचे असतात. आदर कसा करावा हे खेडेगावातील लोकांपासूनच शिकावे. दारात येणारा माणूस आपला असू दे किंवा परका. त्याला ‘या.. बसा..’ असे सांगून प्यायला पाणी देऊन पोटभर जेवण वाढल्याशिवाय जावू देत नाहीत. आलेल्या व्यक्तीला, ‘‘खुंयसन इल्यात? कोणगेर जातल्यात? आधी जेवा पोटभरुन’’. असा प्रेमळ आग्रह करत असतात.

त्याउलट शहरात कुणी आहे का घरात? असे विचारत आलेल्या व्यक्तीला. चेन लावलेल्या दारातूनच एका डोळ्याने पाहात, ‘‘कोण पाहिजे तुम्हाला? तुम्ही विचारता ती व्यक्ती इथे राहात नाही. सॉरी’’, असे बोलून आलेल्या व्यक्तीच्या नाकावरच धाडकन् दार लावून मोकळे होतात.

तर अशा रिमझिम पडणार्‍या पावसात खेड्यातील घरात चुली पेटवल्या असल्या की फारच नयनरम्य दृश्य पहायला मिळते. वरून पाऊस आणि घराच्या छपरातून धुर बाहेर पडण्यासाठी धडपड करतोय. कल्पना करा… किती सुंदर वाटते ते दृश्य!! माझी बहीण मुंबईला राहते. ती मला म्हणायची, ‘‘माई, तुमच्या तिथे पाऊस पडतोय का गं?’’ मी हो म्हणाले. लगेच ती म्हणाली. ‘‘चुल पेटवली का? मला इथून तुझ्या घरातला धुर पावसात बाहेर पडतो आहे ते दिसतंय.’’ आता सांगा मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात कुठले हे नयनरम्य दृश्य बघायला मिळणार म्हणूनच खेड्यातली घरे कौलारु असूनही सिमेंटच्या घरांपेक्षा कितीतरी उबदार वाटतात.

माझे आजोळ एक खेडेगावच आहे. ‘उसप’ हे माझे गाव. दोडामार्ग शहरापासून जरा जवळच आहे. ते पूर्णपणे निसर्गाने नटलेले आहे. आम्हीपण गणेशोत्सवाला उसपला जायचो. माझ्या बाबांना घरातले आणि गावातले सर्व लोक बाबाच म्हणतात आणि काकांना भाई.

आम्ही बसमधून उतरताच जो तो विचारु लागे, ‘‘बाबा, भाई इल्यात? बरे आसन मा?’’ खेडेगावात असे आपुलकीनं विचारपूस करतात लोक. पण शहरात शेजारच्या फ्लॅटमध्ये कुणी आले तर बाहेर येण्याऐवजी दार बंद करतात. हा खेडेगावातील व शहरातील फरक.

खेड्यात सर्व सण उत्साहात साजरे करतात. सर्वांच्या घरी येतात… जातात. सर्वांची आपुलकीने चौकशी करतात. संकटकाळी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात.

म्हणूनच खेडेगाव सोडून पहिल्यांदाच शहरात पाय ठेवणार्‍याला भांबावल्यासारखे होते. कां.. तर इथे आपले कुणीही नाही असा एकाकीपणाचा विचार मनात येऊन माणूस भयभीत होतो. शिक्षणासाठी दूर शहरात राहणार्‍या मुलांच्या मनात मग आपला गाव आपल्याला बोलावत आहे.. असे वाटते. त्यांच्या मनात मग शब्द जुळून येतात ते असे.

माझा गाव स्वप्नात येतो,

मला बोलावित राहतो.

भेटावयास ये ये म्हणतो

भेटून जा ये ये म्हणतो.

माझा गाव दुरवर

कृष्णानदीच्या काठावर

जवळ आहे डोंगरघाट

तेथे झाडी लागे दाट

डोंगरावरती माझी शाळा

मला तिचा भारी लळा…