॥ मनःशांती उपनिषदातून ॥ निरामय देहा-मनानं शतायुषी होऊ या…

0
198
  • प्रा. रमेश सप्रे

 

आज डॉक्टर्स- रुग्णालयं- औषधं खूप झाली पण त्या मानानं आरोग्य धोक्यात आलं. आयुष्याची वर्षं वाढली, पण वाढलेल्या वर्षात आयुष्य जगणं अवघड होऊन बसलं. शिवाय पैसा वाटेल तितकी महागडी औषधं खरेदी करु शकेल पण आरोग्य नाही विकत घेऊ शकणार.

 

‘आयुष’ आरोग्य पुरवणीच्या या नव्या सदराचं नाव ठेवताना काही विचार मनात होता. ‘उपनिषदातून मनःशांती’ असं शीर्षक सरळ सोपं झालं असतं. पण संस्कृतमध्ये अशा जोड शब्दांचा अर्थ लावताना ‘प्रथम पद प्रधान’, ‘द्वितीय पदप्रधान’ आणि ‘उभयपद प्रधान’ असा विचार केला जातो. म्हणजे दोन शब्द असलेल्या या शीर्षकात पहिला शब्द अधिक महत्त्वाचा मानला तर ‘मनःशांती’ हा शब्द महत्त्वाचा ठरतो. खरं तर हेच साध्य आहे माणसाच्या जीवनाचं नि त्यासाठी साधन किंवा माध्यम आहेत उपनिषदं. तसं पाहिलं तर मनःशांती नि उपनिषदं  दोन्ही शब्द सारख्याच योग्यतेचे आहेत. पण मानवजातीचं प्रमुख उद्दिष्ट मनःशांती हेच आहे.

शांती, समाधान, आनंद या गोष्टी शेतात पिकत नाहीत. झाडावर लागत नाहीत. खाणीतून निघत नाहीत नि मुख्य म्हणजे कारखान्यात किंवा प्रयोगशाळेत बनवता येत नाहीत. हे लक्षात घेऊन ऋषीमुनी नि साधुसंतांनी आनंद, शांती यांचा शोध आपल्या आतच घेण्याची युक्ती शिकवली. त्यासाठी अमोघ मार्गदर्शन केलं. त्यांचं शिकवणं आत्मप्रचीतीवर आधारित असल्याने आजही तितकंच ताजं नि प्रभावी आहे. हा आतला शोध- अंतर्यात्रा असली तरी प्रत्यक्ष अनुभव बाहेरच्या जगात नि जीवनातच घ्यायचा असतो. म्हणून जीवनातली कर्तव्यं (स्वधर्म) पार पाडत असताना मन शांत, आनंदात कसं ठेवायचं याचाही उपदेश (खरं तर समुपदेशन) त्यांनी आपल्या वचनातून, ग्रंथातून केला जो आजच्या जीवनाशीही सुसंगत आहे.

हेच पहा ना – आपण वाढदिवसाच्या प्रसंगी ‘दीर्घायुष्य नि उत्तम आरोग्य लाभो’ ही शुभकामना व्यक्त करताना म्हणतो- ‘जीवेत् शरदः शतम्‌|’ पण स्वतःसाठी संकल्प करताना काय म्हणायचं? ऋषी म्हणतात ‘जीवेम शरदः शतम्‌|’ ‘पश्येम शरदः शतम्‌|’ असं म्हणण्यात ‘शतम् म्हणजे शंभर वर्षं (दीर्घायुष्य) तर ‘शरदः म्हणजे उत्तम आरोग्य, समृद्धी, तृप्ती यांनी युक्त असं जीवन जगावं. नुसतं जगू नये तर शंभर वर्षं निर्मळ दृष्टीनं बघावं, तसेच स्वच्छ श्रुती, रुची, स्पर्श यांनी युक्त असावं. आपली स्मृती (स्मरणशक्ती) तीक्ष्ण किंवा तल्लख असावी. विचारशक्ती स्पष्ट असावी. असं आयुष्यच खरं सार्थकी लागलेलं मनुष्यजीवन आहे.

आजच्या काळाबद्दल म्हटलं जातं ना की – आज डॉक्टर्स- रुग्णालयं- औषधं खूप झाली पण त्या मानानं आरोग्य धोक्यात आलं. आयुष्याची वर्षं वाढली, पण वाढलेल्या वर्षात आयुष्य जगणं अवघड होऊन बसलं. शिवाय पैसा वाटेल तितकी महागडी औषधं खरेदी करु शकेल पण आरोग्य नाही विकत घेऊ शकणार.

आजुबाजूला पाहिलं तर कोरोना, निपा, झिका यासारखे नवेनवे विषाणू निर्माण होताहेत. विषाणूंना देश, धर्म, संस्कृती कशाच्याही सीमा रोखू शकत नाहीत. लगेच जगभर पसरतात. कॅन्सर, एड्‌ससारखे असाध्य रोग तर अल्झायमरसारखे स्मृतिभ्रंशामुळे जिवंतपणी मेल्यासारखं जगण्याची अवस्था, अतिवेगानं घसरणारी रोगप्रतिकारक शक्ती आणि या सर्वांना आमंत्रण देणारी सदोष, भोगवादी, चंगळवादी जीवनशैली! काय होणार आहे मानवजातीचं? हा विचार सर्व क्षेत्रातील विचारवंत जगभर करू लागलेयत.

या पार्श्‍वभूमीवर उपनिषदातील ऋषींची जीवनदृष्टी कशी होती? मनःशांतीसाठी निश्चित उपाय कोणते? – यावर सहचिंतन करुया.

* कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः |

– म्हणजे या लोकात (जीवनात) कर्मं करीतच शंभर वर्षं जगण्याची इच्छा करावी. अर्थ स्पष्ट आहे- कर्मं करत, कार्यरत असताना, सर्व इंद्रियं मन-बुद्धी नि बुद्धीच्या स्मृती, विचार यासारख्या शक्ती शाबूत (कार्यक्षम) असलेल्या अवस्थेत शंभर वर्षं जगण्याचा संकल्प करावा. त्याची पूर्ती होण्यासाठी आवश्यक अशी जीवनपद्धती स्वीकारावी. म्हणजे हे साध्य करण्यासाठी कोणते बदल आपल्यामध्ये, आपल्या जीवनचर्येमध्ये घडवले पाहिजेत हे पाहण्यापूर्वी एक मजेदार कथा पाहू या.

एक माणूस रात्रीच्या आश्रयासाठी एका श्रीमंत व्यापार्‍याकडे येतो. चांगलं आदरातिथ्य केलं गेल्यामुळे दुसर्‍या दिवशी निघताना त्या व्यापार्‍याला म्हणतो, ‘मी मृत्युदेवता यम आहे. माझी सेवा केल्यामुळे मी अतिप्रसन्न झालोय. तुला हवं ते माग’. यावर तो व्यापारी म्हणाला, ‘तू खरंच यम असशील तर मला अमर बनव.’ यम उद्गारला, ‘ते माझ्या हातात नाही. पण तुला आणखी वैभव, उदंड आयुष्य नि उत्तम आरोग्य मी देऊ शकतो.’. तो व्यापारी हे ऐकून म्हणाला, ‘हरकत नाही. दे मला दीर्घायुष्य. पण एकच कर की मला माझ्या मृत्यूची सूचना खूप पूर्वी दे. म्हणजे मी व्यापाराची आवराआवर निरवानिरव करून तो माझ्या मुलांच्या हातात सोपवीन. मग शांतपणे मरायला तयार होईन.’ यम म्हणाला ‘तथास्तु’|

खूप वर्षं जातात. एके रात्री यम पुन्हा साध्या माणसाच्या वेशात येऊन व्यापार्‍याला म्हणतो, ‘ओळखला का मला? खूप वर्षांपूर्वी आपण भेटलो होतो.’ हे ऐकून व्यापार्‍याला तो प्रसंग आठवतो. प्रेमानं यमाला म्हणतो, ‘या या यमराज. आत या, रहा आरामात काही दिवस.’ यावर यम म्हणतो, ‘आज राहायला आलो नाही. तुला न्यायला आलोय’. व्यापारी उद्गारतो, ‘पण पूर्वसूचना देण्याचं आपलं ठरलं होतं ना?’ ‘तशा चार सूचना पत्रं पाठवून तुला दिल्या होत्या. तू ती पत्रं वाचली नाहीस यात माझा दोष नाही. तेव्हा आता वेळ भरत आलीय तेव्हा चला माझ्याबरोबर.’ यावर व्यापारी म्हणतो, ‘कोणती चार पत्रं? मला तर एकही मिळालं नाही.’ हसून यम म्हणतो, ‘वेड्या, माझी पत्रं काही तुमच्यासारखी शब्दात लिहिलेली नसतात. पण ती वाचता मात्र नक्की येतात.’

व्यापार्‍याच्या चेहर्‍यावरील आश्चर्याचा भाव पाहून यम म्हणतो, ‘हे बघ मित्रा, तू तुझ्या वयाची चाळीस वर्षं पुरी केलीस, तेव्हा मी पहिलं पत्र पाठवलं. तुझी दृष्टी अधू केली.’ पण तू ते पत्र वाचलंस नाहीस. डॉक्टरकडे जाऊन चाळीशी (चष्मा) आणलास नि नको ते पाहण्याचं काम करतच राहिलास. दुसरं पत्र पाठवलं तू पन्नाशीत प्रवेश केलास तेव्हा. तुझे केस पांढरे करायला (पिकवायला) सुरवात केली. पण तेही पत्र तू वाचलं नाहीस. गेलास बाजारात नि आणलास कलप (केसांना लावायचा रंग) नि पुन्हा केस काळे बनवलेस. नि ‘अभी तो हम जवान हैं’ असं म्हणत जीवनाचा उपभोग घेतच राहिलास. त्यानंतर आली तुझी साठी. तुझे दात पाडायला सुरवात केली मी. शेवटी तू उरलेले दात पाडून दातांची कवळी बसवून नको ते, नको तितकं खातच राहिलास. आता सत्तरीत प्रवेश केलास तेव्हा मी चौथं पत्र पाठवलं. तुझी श्रुती (म्हणजे ऐकण्याची क्षमता) कमी केली. तेही पत्रं न वाचता तू डॉक्टरकडे गेलास नि ऐकण्याचं यंत्र घेऊन आलास. मित्रा, मी पाचवं पत्र पाठवत नाही. सरळ माझ्याबरोबर त्या जीवाला घेऊन जातो. तेव्हा आता चला.’

शेवटच्या क्षणापर्यंत जीवनाचा उपभोग घेणं हेच उद्दिष्ट ठेवल्यामुळे तो व्यापारी जसा एवढी संधी मिळूनही सावध झाला नाही, त्यानं अंतर्मुख होऊन विचार केला नाही.

उपनिषदातील ऋषी म्हणूनच संकल्प करताना म्हणतात- ‘सर्व इंद्रियांनी कर्म करत असताना, सार्‍या इंद्रियांच्या शक्ती कार्यक्षम असताना शंभर वर्षं जगण्याची इच्छा करावी. त्यासाठी एकच प्रभावी मार्ग म्हणजे कर्मं करावीत नि सारी कर्मं परमेश्‍वराला अर्पण करून टाकावी.’ खरंच ‘यत् यत् करोमि तत् तत् अखिलं शंभो तवाराधनम् ॥ किंवा ‘करोमि यत् यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि॥ ही खरी शतायुषी होण्याची युक्ती आहे. आरोग्य नि आनंदयुक्त दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

याच विषयावर सहचिंतन (चर्चा) चालू असताना एक विचार पुढे आला. ऋषींचं ठीक होतं. त्याकाळी हवा- पाणी- प्रकाश- आकाश- अन्नधान्य एकूणच पर्यावरण नि वातावरण खूपच शुद्ध होतं. आजच्या तुलनेत तर जमीन-अस्मानाचा फरक वाटावा इतकं! आजचे निपा- झिका- कोरोनासारखे विषाणू त्यावेळी नव्हते. सर्व प्रकारचं प्रदूषण जवळजवळ नव्हतंच. ध्वनिप्रदूषण तर अभावानंच (म्हणजे युद्ध, सण उत्सव इ. प्रसंगी) आढळायचं. रासायनिक प्रदूषण तर जवळजवळ नव्हतंच. पैसा हे परब्रह्म नव्हतं, तर गुरुः साक्षात परब्रह्म सर्वत्र आढळायचं. अनुभवायला मिळायचं. जग तापलेलं (ग्लोबल वॉर्मिंग) नव्हतं. नद्या निर्मळ पाण्यानं वाहणार्‍या जीवनसरिता होत्या. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ म्हणजे एक जीव हा दुसर्‍याचं जीवन असतो. याचा अर्थ अरण्यात रानटी पशू एकमेकांना खाऊन जगतात. मोठे मासे लहान माशांना गिळतात. माणूस तर सर्वाहारी (सर्व प्रकारचे आहार करणारा (ऑम्निव्हरस) प्राणी आहे. पण हे फक्त जगण्याच्या पातळीपुरतंच होतं. एरवी ‘भूता परस्परें पडो मैत्र जीवांचे’ ही मानवाच्या, मानव्याच्या (मानवतेच्या) पातळीवरील वस्तुस्थिती असायला हवी. म्हणूनच ज्ञानोबांनी असं पसायदान मागितलं. असो.

आजच्या काळात शंभर वर्षं जगणं हा शाप की वरदान? इंद्रियं कार्यक्षम ठेवून जगणं तर आणखीनच अवघड. पण म्हणूनच हे एक आव्हान म्हणून स्वीकारायला हवं. ऋषीमुनींच्या काळातही मनाचा तोल जाणारे, विषयांच्या आहारी जाणारे, कामवासनेनं आंधळे झालेले ऋषीमुनी होतेच की! राम- रावण, कंस- कृष्ण, विदुर- शकुनी अशा दोन्ही परस्परविरुद्ध स्वभावांची मंडळी होतीच ना? म्हणजे निसर्गाची साथ नि साद निरामय, आरोग्ययुक्त जीवनासाठी आवश्यक आहे. पण यापलीकडे, देह- इंद्रियं यांच्या पलीकडे असलेलं अंतःकरण- मन- बुद्धी- चित्त – आत्मा- हेच मानवाचं खरं स्वरूप आहे, जे ठरवलं तर बाहेरच्या भ्रष्टाचारी वातावरणात सदाचारी राहू शकतं. बाहेरून होणारे सर्व इंद्रियांवरचे आघात नि जीवनातल्या बर्‍या- वाईट अनुभवांचे प्रहार स्वीकारुनही अखंड आनंदात असणारे सत्पुरुष- महात्मे आजच्या काळातही आहेत. भले त्यांची संख्या कमी असेल!

यासाठी सार्‍या उपनिषदात अन् उपनिषदांचं सारभूत उपनिषद असलेल्या गीतेत एक महत्त्वाचा उपाय सुचवलेला असतो, जो इथंही सुचवलाय (ईशावास्योपनिषदात)-

* एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥

आरोग्ययुक्त, निरामय शतायुषी जीवनाचा मूलमंत्र आहे- कर्माचं बंधन लागणार नाही, कर्मफळाची वासना उरणार नाही अगदी निर्लेप जीवन जगायचं. स्वयंपाकाची निर्लेप भांडी (नॉन्‌स्टिक युटेन्सिल्स) विज्ञान-तंत्रज्ञानानं बनवली. पण त्यात बनवलेल्या रुचकर, पोष्टिक पदार्थांचा दीर्घकाल आस्वाद घेण्यासाठी जी मनःशांती- स्थिरबुद्धी- चित्तशुद्धी आवश्यक ती मिळवण्यासाठी ऋषीमुनींचेच नि आत्मसाक्षात्कारी व्यक्तींचेच पाय धरावे लागतील.

पत्रं- पुष्पं- फलं- तोयं देवाला अर्पण करण्याची कृती सोपी आहे. शिवरात्रीला शिवलिंगावर सहस्त्रविल्वार्चन (हजार बेलपत्रांची पूजा) करणं सोपं आहे. तसंच एकादशीच्या दिवशी विष्णूवर – शाळिग्रामावर – सहस्त्रतुलसीदलं अर्पण करणं त्याहून सोपं आहे. कारण बेलाची पानं मिळवायला तुलसीपत्रांपेक्षा अधिक शक्ती खर्च करावी लागते. म्हणून महत्त्व अर्पण करण्याच्या वस्तूला किंवा कृतीला नाही तर ते मनोभावे, समर्पित वृत्तीनं केलं गेलं पाहिजे. हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून भगवंत गीतेत- पान-फूल-फळ किंवा पाणी अर्पण केलं तरी त्याचा मी प्रेमानं स्वीकार करतो, पण ते अर्पण कसं केलं पाहिजे?- ‘यो मे भक्त्या प्रयच्छति’ जो मला भक्तिभावानं, निष्काम भावनेनं अर्पण करतो त्याचा मी सप्रेम स्वीकार करतो. म्हणून निर्लेप वृत्तीनं, पाण्यातल्या कमलदलाप्रमाणे इंद्रियं कार्यक्षम, मनबुद्धी पवित्र राखून दीर्घायुषी (शतायुषी) बनण्याचा संकल्प करु या. भीष्मपितामह नि श्रीकृष्णाच्या निरामय दीर्घ जीवनाचं रहस्य हेच आहे. भीष्मांनी स्वतःसाठी ना राज्य भोगलं ना देहसुख अनुभवलं तर वासुदेव कृष्णाला आयुष्यात काहीही चिकटलं नाही नि कृष्ण कशालाही चिकटला नाही- ना रुक्मिणीला- ना राधेला – ना गोपींना – ना अर्जुनाला- ना उद्धवाला… इतकंच काय पण त्याचा श्‍वास असलेल्या बासरीतही चिकटून राहिला नाही. खरंय ना?