देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काल ३९ वर गेली. केरळात काल ५ कोरोनाचे संशयित रुग्ण आढळून आल्याने ही वाढ झाली आहे. केरळमध्ये आढळून आलेले सदर संशयित गेल्या महिन्यात इटली येथून भारतात आले होते. मात्र ते सर्वजण विमानतळावरील तपासणी टाळण्यात यशस्वी ठरले होते.
दरम्यान केरळच्या के. के. शैलजा यांनी सांगितले की राज्यात आणखी काही कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यांनी पुढे सांगितले की २९ फेब्रुवारी रोजी व्हेनिस-दोहा कतार विमानाने आलेले व १ मार्च रोजी दोहा येथून कोचीला आलेल्या सर्व प्रवाशांनी राज्याच्या आरोग्य अधिकार्यांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केरळच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे की संबंधितांनी याबाबत टाळाटाळ केल्यास ती बाब गुन्हेगारी स्वरुपाची ठरणार आहे. तसेच पोलिस खात्याने तशी बाब बेकायदा ठरत असून संबंधितांना दंड केला जाईल असे स्पष्ट केले आहे.