नगरविकास मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते, म्हापसाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा (बाबूश) आणि उपसभापती तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यातील आरोप- प्रत्यारोपांची भाजपने गंभीर दखल घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी भाजप मुख्यालयात आज मंगळवारी लोबो आणि डिसोझा यांची संयुक्त बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली.
उपसभापती मायकल लोबो यांनी म्हापसा येथे पत्रकारांशी बोलताना नगरविकास मंत्री डिसोझा यांच्यावर मतदारसंघातील समस्यांच्या प्रश्नावरून जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकास्त्रामुळे नगरविकास मंत्री डिसोझा संतप्त बनले असून त्यांनीही उपसभापती लोबोंना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. उपसभापती लोबोंनी आपला मतदारसंघ सांभाळावा आणि अनैतिक गोष्टींना आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा खोचक सल्ला नगरविकास मंत्र्यांनी दिला होता.
बार्देश तालुक्यातील या दोन्ही भाजप नेत्यांमध्ये जुंपल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई न झाल्यास लोकसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यात पुन्हा सुसंवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.